हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चला हवा येऊ द्या मालिकेचे दिग्दर्शक आणि सूत्रसंचालक निलेश साबळे यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची माफी मागितली आहे. चला हवा द्या मधील एका एपिसोड मध्ये नारायण राणे यांची हुबेहूब नक्कल करणारे पात्र दाखवण्यात आले होते. त्यावरून निलेश साबळे आणि संपूर्ण टीम ने राणेंची माफी मागितली.
झी टीव्ही वर नुकत्याच झालेल्या ‘दिवाळी अधिवेशन’ या कार्यक्रमात राणे यांचे हुबेहूब पात्र दाखविण्यात आले होते. या पात्रावर राणे समर्थकांनी आक्षेप नोंदविला होता. अनेक कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या होत्या. परिणामी राणे समर्थक आणि कार्यकर्त्यांनी झी टीव्ही आणि साबळे यांना फोन करून संताप व्यक्त केला होता. त्यामुळे आज साबळे व टीमने राणे यांची भेट घेतली.
‘झी मराठी’ वरून प्रसारित होणारा ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम खूपच लोकप्रिय आहे. कार्यक्रमातून हिंदी- मराठी सिनेमांचे प्रमोशन केले जात असल्याने अनेक मोठे कलाकार यात सहभागी होतात. कार्यक्रमातून राजकारणी लोकांवर व्यंगात्मक टीका केली जाते. राजकीय नेत्यांवर खुमासदार शैलीत कधी टीका तर कधी त्यांचे कौतुक केले जात असल्याने हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे.