हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहून या पत्रात त्यांनी कोविड योद्ध्यांच्या प्रश्नांबद्दल मुख्यमंत्र्यांना जाब विचारत अनेक सवालही उपस्थित केले आहेत. कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा सुरु केला तेव्हा आम्ही करुन दाखवलं असं म्हणत श्रेय घेतलं, मग आता हा विमा बंद पडला आहे, त्याचं श्रेय कुणाला द्यायचं असा सवाल आमदार नितेश राणे यांनी केला आहे.
काय आहे नितेश राणे यांचे पत्र-
आपले सरकार कोविडमधील आपल्या कामगिरीबाबत स्वतःच्याच कौतुकाचे पोवाडे गातात आणि इतकेच नाही तर आपल्या सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार कोविड काळातील कामगिरीसाठी ‘सर्टीफिकेट ऑफ कमिटमेंट अवार्ड’ प्राप्त करून घेतात. पण जे खरे कोविड वॉरिअर म्हणजे जे महापालिकेचे कर्मचारी आपल्या जीवाची आणि आपल्या कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता तत्परतेने कर्तव्यासाठी घराबाहेर पडतात. अशा कर्मचाऱ्यांसाठी आपण काय करत आहात? आपल्या हस्ते सुरू करण्यात आलेली गटविमा योजना पूर्णपणे बंद पाडण्यात आली आहे. हे आपणास माहित नाही का
जेव्हा ही योजना सुरु केली तेव्हा याचे श्रेय आपण व आपल्या पक्षाने घेतले होते.आम्ही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पाच लाखांपर्यंतच्या विम्याचे कवच दिले, अशाप्रकारच्या बातम्या वृत्तपत्रातून तसेच इतर माध्यमातून प्रकाशित केल्या. मग जेंव्हा ही योजना बंद झाली आहे, तर मग याचे श्रेय कुणाला द्यायचे? आपण आणि आपला महापालिकेतील सत्ताधारी पक्ष जसे ‘करून दाखवले’चे श्रेय घेतात, त्याचप्रमाणे ‘बंद करून दाखवले’ याचेही श्रेय घेणार का?” असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.