हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील ठाकरे सरकारने मला रुग्णालयातच मारण्याची योजना आखली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत केला. एखाद्या व्यक्तीला चुकीचं इंजेक्शन, चुकीचं औषध देऊन देऊन कायमस्वरूपी संपवून टाकायचे, याला ठाकरे सरकार म्हणतात असा आरोप नितेश राणे यांनी केला.
नितेश राणे म्हणाले, कोल्हापूरच्या रुग्णालयात असताना मला अँजिओग्राफी करण्याचा गरज आहे, असे सांगण्यात आले होते. मी म्हटले की, मला तसं काही वाटत नाही. माझा बीपी, शुगर लेव्हल कमी होती. तरीही मला सर्व गोष्टी कळत होत्या. त्यातील काही लोक आमच्याही ओळखीचे होते. सगळेच सरकारच्या बाजूचे नसतात. एका पोलिस कर्मचाऱ्याने मला येऊन सांगितले की, ‘राणेसाहेब अँजिओग्राफी करू नका. त्यानिमित्ताने शरीरात इंक टाकावी लागते. ती इंक टाकून तुम्हाला मारण्याचा प्लॅन आहे, त्यामुळे तुम्ही अँजिओग्राफीला कोणत्याही परिस्थितीमध्ये होकार देऊ नका.
विरोधी पक्षातील नेत्यांना सभागृहातच येऊ द्यायचं नाही. त्यांना जिवंत ठेवायचे नाही. असा प्रकार आपल्या राज्यात सुरु आहे असा आरोप नितेश राणे यांनी केला. नुसतं षडयंत्रच रचायचं नाही, तर चुकीचं इंजेक्शन, त्यांच्या शरीरात चुकीची औषधे सोडायची आणि त्यांना कायमस्वरुपी संपवून टाकायचे, याला म्हणतात ठाकरे सरकार. या प्रकरणात लक्ष घालण्याची गरज आहे असेही ते म्हणाले.