नितीन देसाईंच्या जाण्याने 300 तरुणांवर बेरोजगारीची वेळ; ND स्टुडिओतील कर्मचाऱ्यांवर मोठे संकट

nitin desai
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांच्या जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नितीन देसाई यांनी अचानकपणे आत्महत्येसारखं टोकाचे पाऊल उचलल्यामुळे याचा धक्का सर्वांनाच बसला आहे. 2 ऑगस्ट रोजी देसाई यांनी आपल्या कर्जत येथील एनडी स्टुडिओत गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या स्टुडिओला त्यांनी मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने उभे केले होते. आता नितीन देसाई यांच्या जाण्यामुळे स्टुडिओत काम करणाऱ्या 300 पेक्षा जास्त तरुणांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.देसाईंच्या जाण्याने स्टुडिओत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

एनडी स्टुडिओत काम करणारे अनेक कर्मचारी आजूबाजूच्या गावातील आहेत. मात्र स्टुडिओला लागून असलेल्या हातानोली गावातील 80 टक्के लोक फक्त या स्टुडिओवरच अवलंबून आहेत. एनडी स्टुडिओ हा त्या गावातील लोकांच्या उदरनिर्वाहाचा भाग आहेत. या गावातील शंभर पेक्षा जास्त लोक एनडी स्टुडिओत काम करण्यासाठी जातात. मात्र आता देसाई यांच्या जाण्याने स्टुडिओज बंद पडला आहे.सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एनडी स्टुडिओत काम करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. या स्टुडिओत आजूबाजूच्या वाड्यातील तब्बल 200-300 लोक या ठिकाणी काम करण्यासाठी येतात. हातोनोलीसह कातकरी वाडी, मोरबे गाव, वावरले, आसरा, जांभिवली अशा ठिकाणाहून लोक स्टुडिओत काम करण्यासाठी येत असत. त्यामुळे आता नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्यानंतर या स्टुडिओचे पुढे काय होणार हा प्रश्न सर्वच कामगारांना पडला आहे.

गावातील लोकांना रोजगार मिळावा यासाठी नितीन देसाई यांनी आजूबाजूच्या परिसरातील तरुणांना स्टुडिओमध्ये काम दिले होते. यामुळे 300 पेक्षा जास्त कुटुंब फक्त या स्टुडिओवर अवलंबून आहेत. आता हा स्टुडिओ बंद पडला तर या सर्व कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे. या पार्श्वभूमीवर स्टुडिओ चालू ठेवून आमचा रोजगार तसाच टिकून राहावा अशी विनंती या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, दोन ऑगस्ट रोजी जेव्हा एक कर्मचारी सकाळच्या वेळी स्टुडिओमध्ये गेला तेव्हा त्याने देसाई यांनी गळभास लावून घेतल्याचे दृश्य पाहिले. यानंतर त्याने ताबडतोब पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणी कोणतीही सुसाईड नोट किंवा संशयास्पद गोष्ट आढळून आली नाही. आता नितीन देसाई यांच्या पोस्टमार्टम अहवालात देखील त्यांचा मृत्यू गळफास घेतल्यामुळे झाला असल्याचे उघड केस आले आहे.