हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Maharashtra Assembly Election 2024) महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीकडून जोरदार तयारी सुरु असतानाच प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्याकडून तिसऱ्या आघाडीची मोट बांधण्याचे काम चाललं आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे. तिसऱ्या आघाडीबाबत लवकरच एक बैठक होणार आहे. मात्र तत्पूर्वी या तिसऱ्या आघाडीत एमआयएमला एंट्री मिळणार नाही असं बच्चू कडू ( Bachchu Kadu) यांनी स्पष्ट केलं आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, “तिसऱ्या आघाडीने आम्ही महाशक्ती निर्माण करू. हि शक्ती जनतेची शक्ती असेल. उद्या आमची एक बैठक आहे. या बैठकीत राजू शेट्टी, छत्रपती संभाजीराजे, प्रकाश आंबेडकरांचे चुलत भाऊ राजदत्त आंबेडकर आणि इतर काही मुस्लिम संघटना असतील. ही एक वैचारिक बैठक असून यात आमचे सर्व मुद्दे स्पष्ट होतील. हे मुद्दे घेऊन आम्ही निवडणूकीला जाऊ. एमआयएमची प्रखरता पचवणं आम्हाला सहज शक्य होणार नाही. लोकांनाही ते शक्य होणार नाही. आमचा मुद्दा धर्म जातीच्या पलीकडे आणि कष्टकरी शेतकरी यांचा आहे. त्यामुळे धार्मिक कटूता निर्माण करणाऱ्या कोणत्याही पक्षापासून दूर राहण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे बच्चू कडू म्हणाले.
दरम्यान, यापूर्वी एमआयएमने महाविकास आघाडीसोबत सुद्धा आघाडी करण्याची इच्छा व्यक्त केली, माजी खासदार इम्तियाझ जलील यांनी तशी इच्छा बोलून दाखवली होती. मात्र महाविकास आघडीतील कोणत्याही नेत्याकडून त्यांना अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. त्यातच आता बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीत सुद्धा एमआयएमला स्थान नसेल तर स्पष्टच सांगुन टाकलं आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत एमआयएमला एकला चलो चा नारा द्यावा लागेल अशी परिस्थिती आहे.