फलटण प्रतिनिधी| अनमोल जगताप
दिल्लीत व मुंबईत सत्तांतर झाले म्हणून फलटणमध्ये कुणी सत्तांतराची स्वप्ने बघू नयेत. जोवर जनता आमच्या पाठीशी आहे तोवर कुणाच्या बापाची हिंमत होणार नाही, की इथे सत्तांतर होईल. कोणाला कुणाची कितीही नावे घेऊ द्या, कितीही नेते आणुद्या इथं राज्य फक्त फलटणच्या श्रीरामाचेच राहणार बाकी कुणाच इथं चालू शकणार नाही, असा इशारा आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिला.
फलटण येथील शुक्रवार पेठत आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात रामराजे यांनी खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांच्यावर टीका केली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व माजी नगरसेवक, शुक्रवार पेठ तालीम मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. पुढे रामराजे म्हणाले, “आता निवडणुकाजवळ आल्यात त्यांना पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने सगळे जण खच्चून ओरडू लागले आहेत. ते माझ्या दृष्टीने क्षुद्र आहेत. त्यांच्यामध्ये क्षमता नाही. त्यांच्या मतदारसंघात त्यांच्याबद्दल लोक काय बोलतात हे आपणास चांगले माहिती आहे. त्यामुळे दांडगी हौस, राक्षसी महत्त्वाकांक्षा व काम करण्याची ताकद व इच्छा नसणाऱ्यांसोबत जाऊन जनतेला चालणार नाही. ”
नीरा-देवघर प्रकल्पाबाबत म्हणाले, “या प्रकल्पाचे आपणच सगळे केले आहे. मीच त्याचे भूमिपूजन केले, टेंडर काढले, 66 किलोमीटर पाणी आणले. आता कालवे काढायला जमिनीच्या किमती वाढल्याने पाइपलाइनद्वारे पाणी नेण्यात येणार आहे. त्याचे टेंडरही झाले असेल. महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील असतानाच हा निर्णय झाला आहे. कष्ट माझे आणि आयत्या पिठावर यांच्या रेघोट्या आहेत. “फलटणची संस्कृती वेगळी आहे. येथे जातीय, धार्मिक तेढ नाही. फलटण शहर आधुनिक शहर बनविण्यासाठी तुमची ताकद पाठीशी राहणे आवश्यक आहे. माझ्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त जनतेने नगरपालिका व तालुक्यात ताकदीने माझ्या पाठीशी उभे राहावे असे आव्हाने रामराजे यांनी केले.