कराड | सातारा जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र चाफळ, गोंदवले व फलटण येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिरामध्ये यावर्षीचा श्रीराम नवमी जन्मोत्सव कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने व ठराविक पुजारी मानकरी व भक्तगणांच्या उपस्थितीत पार पडला.
गेल्या अनेक वर्षापासून गुढीपाडव्यापासून दहा दिवस चाफळच्या श्रीराम मंदिरात चालणारा श्रीराम नवमी उत्सव यावर्षी साधेपणाने साजरा करण्यात आला. बुधवारी पहाटेपासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरू असतात. मात्र गेल्या वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे मंदिरात चार पुजारी यांच्या हस्ते विविध धार्मिक कार्यक्रम तसेच श्रीरामाचे भजन आरती स्तोत्र पठण कार्यक्रम होऊन साध्या पध्दतीने यात्रा पार पाडली जात आहे. दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी मंदिराच्या गाभाऱ्यात मोजक्या भक्तगणांच्या उपस्थित श्रीराम जन्मोत्सवाचा विधि पार पडला.
https://www.facebook.com/SataraBreakingNews/videos/4117671718253007
चाफळ येथील ऐतिहासिक श्रीराम जन्मोत्सव हा मंदिराच्या गाभाऱ्यात ठराविक वैदिक ब्राह्मण व श्रीराम देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक धनंजय सुतार व विश्वस्त अनिल साळुंखे, एल. एस. बाबर, कऱ्हाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील, उंब्रजचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड, मानकरी मारुती साळुंखे, मानसिंग साळुंखे व सुहासिनी वैदिक महिला हे या जन्मोत्सव सोहळ्यासाठी उपस्थित होते.
श्रीराम जन्म सोहळ्यासाठी फुलांनी सजवलेल्या आकर्षक पाळण्यामध्ये श्रीरामाची मूर्ती वैदिक पूजाअर्चा करून पाच सुवासिनींच्या हस्ते ठेवण्यात आली. त्यानंतर विधीवत श्रीरामाचे जन्म स्तोत्र पठण करून सर्वांनी श्रीरामाच्या मूर्तीवर फुलांचा वर्षाव करत श्रीराम जन्मोत्सव साजरा केला. दशमीला सूर्योदयापूर्वी होणारा रथ उत्सव सोहळा कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आला आहे. या दिवशीही कोणत्याही प्रकारे ग्रामस्थांनी विनाकारण बाहेर पडू नये असे आवाहन विश्वस्त अनिल साळुंखे यांनी केले आहे.
गोंदवलेत मंदिर परिसरात शुकशुकाट
सातारा | सनईचा सूर नाही… ना कीर्तन व प्रवचनाची पारायणे… परंतु श्री ब्रह्मचैतन्यांच्या श्रीरामाचा जन्मकाळ मंगलमय वातावरणात आज साजरा करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेतल्याने भाविकांविना सलग दुसऱ्या वर्षी गोंदवल्यातील मंदिर परिसरात शुकशुकाट होता.
श्री ब्रह्मचैतन्य महाराज हे श्रीराम भक्त होते. त्यांनी भारतात अनेक ठिकाणी राममंदिरांची स्थापना करून रामनामाचा प्रसार केला. गोंदवल्यातही त्यांनी दोन श्रीराम मंदिरांची स्थापना केली आहे. त्यामुळे श्रींच्या भक्तांप्रती येथील श्रीराम नवमी सोहळा मोठा भक्तिमय असतो. ग्रामयात्रा असणाऱ्या या सोहळ्याला गुढीपाडव्यापासून सुरुवात होते.
फलटणमध्ये रामनवमी शासन निर्देशाप्रमाणे साजरी
फलटण | येथील पुरातन श्रीराम मंदिरात संस्थानकालीन परंपरेनुसार रामजन्मोत्सव व रामनवमी कार्यक्रम धार्मिक वातावरणात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन निर्देशाप्रमाणे साध्या पद्धतीने संपन्न झाला. श्रीमंत सगुणामाता आईसाहेब महाराज यांनी त्यांच्या सन १७७४ ते १७९४ या कालावधीत येथील गादीवर असताना येथे श्रीराम मंदिराची उभारणी केल्यापासून गेली सुमारे २२५ वर्षाहून अधिककाळ श्रीराम मंदिरात रामनवमी उत्सव प्रतीवर्षी परंपरागत पध्दतीने साजरा केला जातो. श्रीमंत सगुणामाता आईसाहेब महाराज यांनीच मुधोजी मनमोहन राजवाड्या शेजारी भव्य देखण्या श्रीराम मंदिराची उभारणी केली आहे.
रामनवमी उत्सवानिमित्त मानकरी वेलणकर कुटुंबातील अनिल वेलणकर व मान्यवरांनी मुधोजी मनमोहन राजवाड्यातून राजघराण्याच्या देवघरातील प्रभू श्रीरामाची मूर्ती आणून ती मंदिरातील प्रभू श्रीराम, सीतामातेला भेटविल्यानंतर महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्त्यजितराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे सुपूर्द केली त्यांनी सदर मूर्ती सजविलेल्या पाळण्यात ठेवल्यानंतर रामजन्माचा पाळणा उपस्थितांनी म्हंटला. देवस्थान ट्रस्टचे कारभारी दशरथ यादव यांनी स्वागत केले.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा