मलाही अनेकदा वर्णभेदाचा सामना करावा लागलाय; क्रिस गेलचा धक्कादायक खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वेस्ट इंडिज । अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिस कोठडीमध्ये मृत्यू झाला होता. २५ मे रोजी घडलेल्या या घटनेचे पडसाद आता संपूर्ण अमेरिकेत पसरत आहेत. जॉर्जला न्याय मिळावा यासाठी लाखो अमेरिकन नागरिक रस्त्यावर येऊन वर्णभेदाविरुद्ध घोषणाबाजी करत आहेत. जागतिक पातळीवर या घटनेचा निषेध होत असताना, वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ख्रिस गेलनेही क्रिकेटमध्ये वर्णद्वेष होत असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.

गेलने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर याबाबत एक पोस्ट टाकत याबाबत आपलं मत मांडलं आहे. “इतरांप्रमाणे प्रत्येक कृष्णवर्णीय व्यक्तीच्या आयुष्यालाही तितकंच महत्व आहे. वर्णद्वेष करणाऱ्या लोकांनी आम्हाला मूर्ख समजणं बंद करावं. कधी-कधी आमच्यापैकी काही लोकं इतरांना वर्णद्वेष करण्याची संधी देत असतात, आपल्याला कमी लेखणं थांबवा असं आवाहन मी करेन. मी आतापर्यंत अनेक देश फिरून आलोय, मी कृष्णवर्णीय असल्यामुळे मलाही भेदभावाचा सामना करावा लागला आहे. विश्वास ठेवा वर्णद्वेष हा फक्त फुटबॉलमध्ये नाही तर तो क्रिकेटमध्येही आहे. अनेक संघांमध्ये हा प्रकार होतो.” अशा आशायचा संदेश गेलने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर लिहीला आहे.

दरम्यान, क्रिकेटच्या मैदानावरही याआधी अनेकदा वर्णद्वेषाच्या घटना घडल्या आहेत. इंग्लंडचा नवोदीत अष्टपैलू खेळाडू जोफ्रा आर्चरला न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामन्यात वर्णद्वेषी टिपण्णी ऐकावी लागली होती. आर्चरने सोशल मीडियावर याचा खुलासा केला होता. जॉर्जच्या मृत्यूनंतर अमेरिकेत हजारो नागरिक रस्त्यावर उतरले असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रदर्शन करणाऱ्या नागरिकांविरोधात सैन्यदल रस्त्यावर उतरवण्याचा इशारा दिला आहे. जॉर्ज फ्लॉयड याच्या मृत्यूप्रकरणात ट्रम्प यांनी घेतलेल्या भूमिकेवरही अमेरिकेत संताप व्यक्त होतो आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”