औरंगाबाद – एसटी महामंडळातील रोजंदारीवरील नव्या चालक तथा वाहक असलेल्या 107 कर्मचाऱ्यांना बेकायदेशीरपणे संपात सहभागी झाल्यावरून सेवा समाप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे दोन दिवासांत तेरा कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू संपात सहभागी झालेल्या चालक तथा वाहकांनी 24 तासांच्या आत कर्तव्यावर हजर होण्याची सूचना नोटिसीद्वारे देण्यात आली आहे. रुजू न झाल्यास सेवा समाप्त करण्यात येईल, असा इशारा महामंडळाने दिला आहे. औरंगाबाद विभागात 107 कर्मचाऱ्यांना अशा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे गेल्या दोन दिवासांत 13 कर्मचारी निलंबित करण्यात आले आहे.
आतापर्यंत एकूण 61 कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले असल्याची माहिती विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिला. दरम्यान, रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीच्या नोटिसा बजावल्या असल्या तरी वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या पाठबळामुळे संपात सहभागी राहण्यावर कर्मचारी ठाम राहणार असल्याचे समजते.