औरंगाबाद | एखाद्या व्यक्तीला कधी आणि कोणत्या कारणावरून येईल हे काही सांगता येत नाही. घरासमोर उभ्या असणाऱ्या व्यक्तीला कारने कट मारल्यानं ‘कार हळू चालव’ अशी समज दिल्याचा एका तरुणाला भलताच राग आला आहे. या रागाच्या भरात आरोपीनं आपल्या दोन भावांसोबत मिळून एका व्यक्तीची हत्या केली आहे. याप्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याच्या दोन भावांना अटक केली असून, या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मोहंमद शफियोद्दीन अब्दुल रेहमान असं हत्या झालेल्या 50 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. तर सादीक ऊर्फ मुन्नाजान मोहंमद (28), शेख जावेदजान मोहंमद शेख (32) आणि शेख अथर जाफर बेग (38) असं अटक केलेल्या तीन आरोपींनीची नावं आहेत. आरोपी सादीक हा गुरुवारी मध्यरात्री आपल्या कारने वेगानं जात होता. दरम्यान त्यानं आपल्या घरासमोर उभ्या असलेल्या मोहंमद रेहमान यांना कारने कट मारला. यामुळे घाबरलेल्या रेहमान यांनी कारचालक सादीकला ‘कार हळू चालव’ अशी समज दिली. याचा राग आल्यानं सादीकनं रेहमान यांच्याशी रस्त्यावरचं वाद घातला. पण तेथील काही लोकांनी मध्यस्थी करत दोघांचा वाद मिटवला. यानंतर सादीक तेथून निघून गेला. पण घरी गेल्यानंतर त्यानं त्याच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती आपल्या नातेवाईकांना दिली. त्यानंतर सादीकचे नातेवाईक शेख जावेदजान, मोहंमद शेख आणि अथर शेख पुन्हा घटनास्थळी आहे.
यावेळी आरोपींनी शफियोद्दीन याना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात शफियोद्दीन रक्तबंबाळ झाले. या घटनेनंतर काही नागरिकांनी त्यांना अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण त्यांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना औरंगाबादला नेण्याचा सल्ला देण्यात आला. पण वाटेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. या प्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास अजिंठा पोलीस करत आहेत.