औरंगाबाद | आजघडीला कोरोनाची दुसरी लाट आता ओसरु लागली असली तरी, लवकरच तीसरी लाट धडकणार असल्याचा दावा तज्ञांकडून केला जात आहे. शिवाय या लाटेत मोठ्या प्रमाणावर लहान मुले संक्रमित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सर्वच खासगी रुग्णालयात ताप असलेल्या मुलांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. मनपाच्या वतीने हॉस्पिटल्सना तशा सुचेना देण्यात येणार असून त्यासाठी त्यांना कोरोना चाचणी किट देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी मनपाने आत्तापासूनच कंबर कसली आहे. याबाबत शासनस्तरावरून वेळोवेळी आढावा घेण्यात येत आहे. त्यात प्रत्येक कोवीड सेंटरमध्ये १५ टक्के खाटा राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात येणार आले आहेत. मनपाने गरवारे समुहाच्या मदतीने लहान मुलांसाठी स्वतंत्र कोवीड सेंटर सुरू केले आहेत. लवकरच हे सेंटर कार्यान्वित होतील, असे मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ नीता पाडळकर यांनी सांगितले. कोरोनाची तिसरी लाट कधी येऊ शकते. शिवाय सध्या सर्दी, ताप, खोकला आदी आजारांची शहरात साथ सुरू आहे. शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये दररोज असे अनेक लहान मुले उपचारासाठी येत आहेत. त्यामुळे आजारी असलेल्या सर्व मुलांच्या कोरोना चाचण्या तिथेच करण्यात येणार आहेत. यासाठी सर्व खाजगी हॉस्पिटल्सना कोरोना चाचणी किट उपलब्ध करून दिल्या जातील, असे मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पडळकर यांनी सांगितले.
१२५ खाटांचे स्वतंत्र कोवीड सेंटर –
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन मनपाने गरवारे समुहाच्या मदतीने १२५ खाटांचे स्वतंत्र कोवीड सेंटर उभारले आहे. शिवाय एमजीएममध्ये १०० बेडचे कोवीड सेंटर उभारले जाणार आहे. मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये देखील बालकांसाठी ५० बेड ठेवले जाणार आहेत. तिसरी लाट आलीच तर शहरात सर्वांसाठी एकूण ७७३३ बेड उपलब्ध आहेत, असे डॉ. पडळकर यांनी सांगितले.