औरंगाबाद | वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने राज्यातील सलून दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयास महाराष्ट्र नाभिक महामंडळासह समाज बांधवांनी तीव्र विरोध करण्यास सुरुवात केली आहे. औरंगाबादेत शासन निर्णयाची होळी केल्यानंतर आता राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय नाभिक महामंडळाने घेतला असल्याची माहिती मराठवाडा विभागीय अध्यक्ष विष्णू वखरे यांनी दिली. ३० एप्रिल २०२१ पर्यंत सलून दुकाने बंद संदर्भात सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे नाभिक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. वर्षभरापासून नाभिक बांधव संकटग्रस्त अवस्थेत आहेत.
मागील वर्षीच्या लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्यातील १६ सलून व्यावसायिकांनी आत्महत्या केल्या. यावर्षी सलून व्यावसायिकांवर भयावह परिस्थिती आहे. याचा निषेध म्हणून औरंगाबादेत शासन निर्णयाची होळी करण्यात आली. आता नाभिक महामंडळाने आक्रमक पवित्रा घेत राज्यभर विविध मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. इतर व्यावसायिकांप्रमाणे सलून दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत उघडण्यास परवानगी द्यावी, या मुख्य मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे.
१० एप्रिलला शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन, १४ एप्रिलला थाळी-घंटानाद आंदोलन, १८ एप्रिलला दुकानासमोर शासनाचा निषेध व्यक्त करणारे फलक हाती घेऊन आंदोलन तर २२ एप्रिलला मुंडन आंदोलन करून शासनाने घेतलेल्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला जाणार आहे. हे सर्व आंदोलन राज्यभर प्रत्येक सलून दुकानांच्या समोर सकाळी ११ वाजता लोकशाही मार्गाने, जमावबंदी आदेशाचे पालन करून केले जाणार आहे.
आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन नाभिक महामंडळाचे प्रदेश अध्यक्ष दत्तात्रय अनारसे, प्रदेश कार्याध्यक्ष अंबादास पाटील, प्रदेश सरचिटणीस दिलीप अनर्थे, प्रदेश कोषाध्यक्ष घनश्याम वाघ, मराठवाडा विभागीय अध्यक्ष विष्णू वखरे, प्रदेश संघटक सुनील पोपळे, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सुधाकर आहेर, शहराध्यक्ष संभाजी वाघ, अप्पासाहेब दळवी, नवनाथ घोडके, सोमनाथ दळवी, मोहन वाघ, कृष्णा ठाकरे, सागर वाघ, अशोक ठाकरे, शांतीलाल जंगम, संतोष मगर, अक्षय बेलकर, संजय औटे, सुदाम पंडित, सोमनाथ दळवी, अतुल शेजुळ, दत्ता कापसे, अशोक वाघ, प्रतीक वाघ, भूषण ठाकरे, गणेश जाधव यांच्यासह समाज बांधवानी केले आहे.