हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| अयोध्येतील राम मंदिराचे (Ram Mandir) उद्घाटन होऊन अवघे काही दिवसच झाले आहेत. परंतु या मंदिराचे बांधकाम जुने होण्यापूर्वीच मंदिराच्या शेतातून पाणी गळत असल्याचा दावा मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास (Satyendra Das) यांनी केला होता. परंतु त्यांचा हाच दावा राम मंदिराच्या निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र (Nripendra Mishra) यांनी फेटाळून लावला आहे. मंदिराच्या छतातून पाणी गळण्याला दुसरे कारण आहे, असे नृपेंद्र मिश्र यांनी सांगितले आहे.
आचार्य सत्येंद्र दास यांच्या दाव्याला फेटाळत नृपेंद्र मिश्र यांनी माहिती दिली आहे की, “राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर पाणी पडत आहे ही बाब सत्य आहे. कारण की, मंदिराचा दुसरा मजला पूर्णपणे उघडा आहे. मी देखील मंदिराच्या पहिल्या मजल्यावर पावसाचे पाणी पडताना पाहिले आहे. असे काहीतरी घडेल याची आम्हालाही कल्पना होती. याला कारण की दुसरा मजला पूर्णपणे उडला आहे. त्यामुळेच पावसाचे पाणी थेट पहिल्या मजल्यावर पडत आहे”
त्याचबरोबर, “सध्या राम मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम सुरू आहे. या मजल्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या मजल्याचे काम हाती घेतले जाईल. त्यानंतर यावर्षीच्या शेवटापर्यंत तेही काम पूर्ण होईल. पहिल्या मजल्यावर बांधकाम सुरू असल्यामुळे मंदिराच्या गर्भगृहात नाली बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मंदिरातले पाणी हाताने काढले जात आहे. परंतु, पाणी गळण्याचा मंदिराच्या डिझाईनशी काहीही संबंध नाही. फ्लोअर उघडा असल्याने पाणी खाली पडतच असते” अशी माहिती देखील नृपेंद्र मिश्र यांनी दिली आहे.
दरम्यान, गेल्या शनिवारी-रविवारी अयोध्यामध्ये मुसळधार पाऊस पडला होता. यामुळे शहरातही पाणी साचले होते. अशातच राम मंदिराच्या उद्घाटनाला सहा महिने पूर्ण झाले नसतानाही पहिल्याच पावसात मंदिराच्या छतातून पाणी गळत असल्याचे बाब समोर आली. तसेच राम मंदिरात रामलल्लाची मूर्ती ज्या गर्भगृहात आहे, तेथे देखील पाणी साचल्याची माहिती सत्येंद्र दास यांनी दिली. परंतु, हे पाणी साचण्यामागे वेगळेच कारण असल्याचे नृपेंद्र मिश्र यांनी सांगितले आहे.