‘पगार नाही तोवर काम बंद’… पुण्यातील जम्बो कोविड सेंटरचा नर्सिंग स्टाफ रस्त्यावर; वेतन थकवले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । कोरोना काळात ज्यांचा ‘कोविड योद्धा’ म्हणून गौरव केला गेला त्याचे आर्थिक शोषण आता व्यवस्थेकडून होत आहे. पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावरील जम्बो कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आपले आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप केला आहे. कोविड काळात जीवाचं रान करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळं थकीत पगार मिळावा या मागणीकरिता कंत्राटी परिचारिका आणि वॉर्डबॉय यांनी बुधवारी जम्बो रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोरच ‘रास्ता रोको’ करीत आंदोलन केले.

या आंदोलनात तब्बल 90 कर्मचारी सहभागी झाले होते. जम्बो रुग्णालय सुरु झाले तेव्हा ‘लाईफ लाईन’ या एजन्सीकडे काम देण्यात आले होते. परंतु, अल्पावधीतच या एजन्सीच्या कामाचा बोजवारा उडाला. अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले. त्यांच्याकडून काम काढून घेतल्यानंतर ‘मेडब्रोस हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड’ या एजन्सीकडे काम देण्यात आले. या कंपनीने लाईफलाईनचे काही कर्मचारी तसेच भरतीद्वारे 300 च्या आसपास नर्सिंग स्टाफ भरला.

सहा महिन्यांच्या करारावर नियुक्त करण्यात आलेल्या या कर्मचाऱ्यांना 35 हजार रुपये वेतन निश्चित करण्यात आले होते. परंतु, सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात निम्माच पगार देण्यात आला. तर, नोव्हेंबरचे वेतन अद्याप मिळालेले नसल्याचे आंदोलकांनी सांगितले. याशिवाय पालिकेने आमच्यासाठी दिलेला 12 हजारांचा बोनसही एजन्सीने लंपास केला.दर महिन्याला अवघे दहा ते पंधरा हजार रुपये हातामध्ये टेकवले जात आहेत.

पूर्ण पगाराची मागणी केल्यानंतर दमदाटी, शिविगाळ केली जात असून याबाबत आवाज उठविताच रुग्णालयाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून बाहेर काढून टाकण्यात येते. सातत्याने अन्याय होत असल्याने परिचारिका आणि वॉर्डबॉय यांनी शेवटी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. जम्बोमध्ये येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होऊ नये तसेच त्यांना अडचण होऊ नये याची खबरदारी आंदोलनादरम्यान घेण्यात आली. आंदोलनात सहभागी झालेल्यांव्यतिरिक्त अन्य परिचारिका रुग्णालयात प्रत्यक्ष काम करीत होत्या.

‘पगार नाही तोवर काम बंद’
जोपर्यंत पगार मिळत नाही तोपर्यंत कामावर रुजू होणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. आंदोलनादरम्यान कर्मचा-यांनी ‘पगार आमच्या हक्काचा’, ‘कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे’, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दिवाळीपुर्वी जम्बोमधील डॉक्टरांनी वेतन मिळत नसल्याच्या तक्रारीवरुन आंदोलन केले होते. त्यावेळी पालिकेच्या अधिका-यांनी मध्यस्थी करित त्यांना वेतन देण्याची व्यवस्था केल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. आता पुन्हा परिचारिकांनी आंदोलन केल्याने जम्बो रुग्णालयासमोरील अडचणी अजुनही संपल्या नसल्याचे समोर आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’