नवी दिल्ली । इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाला दहशतवादी हल्ल्याचा धोका आहे. किवी संघाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. असे असूनही, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात लीसेस्टरमध्ये आज होणारा तिसरा एकदिवसीय सामना वेळापत्रक आणि वेळेनुसारच खेळवला जाईल. गुप्तचर संस्थांनी तपास केल्यानंतर न्यूझीलंड क्रिकेटने हा धोका विश्वासार्ह मानला नाही. असे असले तरी, न्यूझीलंड महिला संघाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यापूर्वी, न्यूझीलंडच्या पुरुष क्रिकेट संघाने सुरक्षेच्या कारणास्तव अचानक त्यांचा पाकिस्तान दौरा रद्द केला होता.
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या मते, न्यूझीलंडच्या टीम मॅनेजमेंटच्या एका सदस्याला टीमच्या हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवण्याची धमकी देण्यात आली होती. एवढेच नाही तर न्यूझीलंडला परतताना या टीमच्या फ्लाइटमध्ये बॉम्ब ठेवण्याबाबतही इशारा देण्यात आला होता. परिणामी, न्यूझीलंड महिला संघ सोमवारपासून हॉटेलमध्येच कैद झाला. यानंतर पोलीस आणि दहशतवादाशी संबंधित एजन्सींना पाचारण करण्यात आले. काही तासांसाठी तिसरा एकदिवसीय सामना रद्द होईल असे वाटत होते. कारण न्यूझीलंड संघाने सरावही केला नव्हता. मात्र, न्यूझीलंड बोर्डाने या मुद्द्यावर म्हटले होते की, संघाला सोमवारी प्रवास करावा लागेल. त्यामुळे सराव सत्र घेण्यात आले नाही.
ECB ला मिळाले धमकीचे ई-मेल
न्यूझीलंड क्रिकेट प्रवक्त्याने पुढे सांगितले की,” रिपोर्ट नुसार, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला न्यूझीलंड क्रिकेट संघाबाबत खोटा ई-मेल मिळालेला आहे. मात्र, हा ई-मेल विशेषतः न्यूझीलंड संघाच्या संदर्भात नव्हता. तरीही त्याला गांभीर्याने घेतले गेले आणि छाननी करून खोटे असल्याचे मानले गेले. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी न्यूझीलंडचा संघ लिसेस्टरला पोहोचला असून खबरदारीचा उपाय म्हणून टीमच्या हॉटेलभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मात्र, काही खेळाडू अजूनही घाबरलेले आहेत.
इंग्लंडनेही पाकिस्तान दौरा रद्द केला
आता न्यूझीलंडनंतर इंग्लंडनेही आपला पाकिस्तान दौरा रद्द केला आहे. यानंतर न्यूझीलंड बोर्डाने म्हटले होते की,”त्यांच्याकडे संघावर दहशतवादी हल्ल्याची गुप्त माहिती आहे.” या इनपुटनंतरच दौरा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच वेळी, ECB नेही असे म्हटले आहे की,”ज्या भागात आधीच दहशतवादी हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे तेथे प्रवास करणे आणि दौरा चालू ठेवणे खेळाडूंवर अतिरिक्त दबाव वाढवेल, जे आधीच कोरोना प्रोटोकॉल आणि बायो-बबलच्या दबावाखाली आहेत.
इंग्लंड महिला संघाने पहिले 2 एकदिवसीय सामने जिंकले
दोन्ही देशांमध्ये 5 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड महिला संघ 2-0 ने पुढे आहे. या मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना आज म्हणजेच 21 सप्टेंबरला लेसेस्टर येथे, चौथा 23 सप्टेंबरला डर्बीमध्ये आणि पाचवा सामना 26 सप्टेंबर रोजी कॅन्टबरी येथे खेळला जाईल.