पैशासाठी वृध्द सासू- सासर्‍यांचा मावस जावयाने केला खून, दोघांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

खटाव तालुक्यातील विसापूर येथील निकम दांपत्याच्या खुनाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सतीश विजय शेवाळे (वय- 47, रा. शनिवार, पेठ, सातारा) व त्याचा साथीदार सखाराम आनंदा मदने ( वय- 43, रा. पारले उत्तर, ता. कराड) या दोघांना अटक केली. संशयितास 10 ते 15 दिवसांनंतर आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. या खुनाचा छडा लागला असून तपास पथकाने या ज्येष्ठ नागरिकांच्या दुहेरी खुनाचा गुन्हा उघडकीस आणून अभिनंदनीय कामगिरी केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी दिली.

याबाबत पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिलेली माहिती अशी, दि. 8 ते 9 जुलै रोजी खटाव तालुक्यातील विसापूर येथील हणमंत भाऊ निकम (वय- 68) व त्यांच्या पत्नी कमल हणमंत निकम (वय- 65) या ज्येष्ठ दांपत्याचा खून झाला होता. या घटनेमुळे विसापूर परिसरात खळबळ उडाली होती. या ज्येष्ठ नागरिकांना कोणी कशासाठी मारले असेल, चोरीचा उद्देश होता की आणखी काय ? असे प्रश्‍न निर्माण झाले होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने या खुनाचा छडा लावण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना दिल्या होत्या.

https://fb.watch/ewYn7bFybE/

त्यानुसार या खुनाचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस हवालदार मंगेश महाडिक, पोलीस नाईक अमोल माने, अजित कर्णे, शिवाजी भिसे यांचे खास पथक तयार करण्यात आले होते. प्रथम दर्शनी या घटनेत हा खून कोणी असेल हे स्पष्ट होत नव्हते. त्यासाठी गुन्हा घडल्यापासून पथकाने विसापूर, पुसेगावात तळ ठोकला होता. या दरम्यान तांत्रिक मुद्दयांचे विश्‍लेषण करताना एकाच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्याने त्या संशयितास गौरीशंकर कॉलेजजवळ ताब्यात घेतले. सतीश विजय शेवाळे असे या संशयिताचे नाव होते. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने या गुन्ह्याच्या कबुली दिली तसेच कराड तालुक्यातील साथीदाराच्या मदतीने आर्थिक कारणासाठी हा खून केला असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी मग सतीश शेवाळे व सखाराम मदने यांना ताब्यात घेतले असून त्यांना पुढील कारवाईसाठी पुसेगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मावस जावयाने केला घात

मृत निकम दांपत्याबरोबर आरोपी सतीश शेवाळे याचे नाते मावस जावयाचे होते. मात्र, काही आर्थिक कारणाने शेवाळे अडचणीत आला होता. त्यातूनच मग निकम दांपत्याला लूटण्याची योजना आखली. त्यासाठी शेवाळेने सखाराम मदने या साथीदाराची मदत घेतली आणि दोघांनी मिळून विसापूर येथे निकम दांपत्याचा खून केला. मृत कमल निकम यांच्या बहिणीचा जावई असलेल्या सतीश शेवाळे या नात्याची बूज न राखता केवळ स्वत: आर्थिक अडचणीत असल्याने अडचण सोडवण्यासाठी हे कृत्य केले आणि त्यामुळे निकम दांपत्यांना दुर्देवाने खुनासारख्या घटनेस सामोरे जात स्वत:चा जीव गमवावा लागला.

आरोपी करणार होता आत्महत्या

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या खुनाचा तपास करत असताना आणखी नवीन पैलू समोर आला असून सतीश शेवाळे हा निकम दांपत्याचा खून केल्यापासून तणावाखालीच होता. पोलीस आता आपल्याला पकडतील या भीतीपोटी तो सैरभैर झाला होता. आता काय करायचे, आता आपले काय होणार यातूनच त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. आपल्यानंतर कुटुंबाचे काय होणार या भीतीतून त्याने चार ते पाच दिवसांपूर्वी विमा पॉलिसीही काढल्या होत्या. त्याचा आत्महत्या करण्याचा निर्णय पक्का झाला होता मात्र त्याच्या संशयास्पद हालचालीमुळेच तो स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाच्या हाती लागला आणि मग त्याने केलेल्या कांडाची कुबली त्याने पोलिसांना दिली.

तपास पथकाचे पोलीस अधिक्षकांकडून अभिनंदन
निकम दांपत्याच्या खुनाचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील व पथकाने अथक प्रयत्न करुन ज्येष्ठ नागरिकांचा दुहेरी खुनाचा अतिसंवेदनशील व क्लिष्ट गुन्हा उघडकीस आणला. आरोपीने आत्महत्या करण्यापूर्वीच त्याला ताब्यात घेतले अन्यथा या खुनाचा तपास अपुराच राहिला असता. त्याला वेळीच ताब्यात घेवून हा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल व अपर पोलीस अधिक्षक अजित बोऱ्हाडे यांनी तपास पथकाचे अभिनंदन केले. या तपासात कोरेगावचे उपविभागीय पोलीस अधिक्षका गणेश किंद्रे तसेच पुसेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांनी व त्यांच्या पथकाने या तपासात मोलाची कामगिरी केली असल्याचे बंन्सल यांनी सांगितले.

या कारवाईत पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, हवालदार मंगेश महाडिक, साबीर मुल्ला, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, संतोष सपकाळ, पोलीस नाईक अमोल माने, अजित कर्णे, शिवाजी भिसे, अमित सपकाळ, प्रवीण कांबळे, स्वप्नील माने, गणेश कापरे, मुनीर मुल्ला, मयूर देशमुख, मोहसीन मोमीन, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, रोहित निकम, वैभव सावंत यांनी सहभाग घेतला होता. तर सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. एस. शेळके, कॉन्स्टेबल यशवंत घाडगे, सुशांत कदम यांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने तांत्रिक माहिती तपास पथकास पुरवली होती.