हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज सभागृहामध्ये लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत NDA चे उमेदवार ओम बिर्ला (Om Birla) निवडून आले आहेत. ओम बिर्ला यांना एकूण 13 पक्षांनी पाठिंबा दिला होता. त्यांच्या विरोधात इंडिया आघाडीचे उमेदवार के. सुरेश हे उभे राहिले होते. के. सुरेश (K. Suresh) यांच्या नावाचा प्रस्ताव ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी मांडला होता. मात्र 13 पक्षांनी ओम बिर्ला यांच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे आता पुन्हा एकदा ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्ष पदासाठी निवड झाली आहे.
आज ओम बिर्ला यांची आवाजी मतदानाने लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडणुकीनंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी हस्तांदोलन करत त्यांचे अभिनंदन केले. यानंतर पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना आसनापर्यंत पोहचवले. महत्त्वाचे म्हणजे, NDA कडून ओम बिर्ला तर इंडिया आघाडीकडून के. सुरेश यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.
या दोन्ही नावांसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर ओम बिर्ला यांच्या नावाला अधिक मते मिळाली असल्याची घोषणा
अध्यक्ष बर्तृहारी महताब यांनी केली. यानंतर 18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली असल्याचे जाहीर झाले. दरम्यान, ओम बिर्ला यांच्या अर्जाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, ललन सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान त्यांच्यासह इतर मंडळींनी अनुमोदन दिले होते.