सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके
अनेक दिवस रामराजे हे देवेंद्र फडणवीस यांच्या दरवाज्यात आम्हाला भाजपमध्ये घ्या, म्हणून हेलपाटे मारतायत. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी नकार दिल्याने त्यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याचा गौप्यस्फोट खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी केला. दरम्यान, यामुळेच त्यांनी आपल्या बॅनरवरून अनेकदा घड्याळ व शरद पवार यांना गायब केले आहे.
फलटण आयोजित पत्रकार परिषदेत रणजिंतसिंह नाईक- निंबाळकर बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे आ. रामराजे नाईक- निंबाळकर यांचा चांगलाच समाचार घेतला. पुढे ते म्हणाले, मी ज्या वेगाने विकासकामे करीत आहे, त्याचा आमदार रामराजेंना धक्का बसला आहे. त्यातून ते सावरावेत, यासाठी आपण नीरा- देवघर, रेल्वेसह सर्व आणलेल्या विकासकामांचे श्रेय रामराजे यांना देत आहे. मला जनतेच्या हिताची कामे करायची आहेत. त्यामुळे श्रेयवादात पडायचे नाही, असे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. दरम्यान धोम-बलकवडीच्या माध्यमातून तालुक्यात चारमाही वाहणारा कालवा लवकरच आठमाही होणार आहे. महाबळेश्वर येथील सोळशी प्रकल्पाच्या माध्यमातून तेथे दोन टीएमसीचे धरण प्रस्तावित असून, त्यास केंद्र व राज्य सरकार अनुकूल आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास गेला, तर धोम- बलकवडीचा तालुक्यातील कालवा बारमाही वाहील. अन्य भागासही पाणी उपलब्ध होईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
खा. रणजिंतसिंह नाईक- निंबाळकर म्हणाले, “महाबळेश्वरच्या पायथ्याशी देवसरे गावाजवळ सोळशी नदीवर धरण प्रस्तावित आहे. या धरणातील पाणी बोगद्याद्वारे वाई तालुक्यातील धोम जलाशयामध्ये सोडण्यात येणार आहे. नीरा-देवघर प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लावल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे आगामी काळासाठी आणखीन काय हवेय का? अशी विचारणा केली होती. त्यावर आपण त्यांच्याकडे सोळशी प्रकल्पाची मागणी केली. या प्रकल्पाचा अभ्यास जलतज्ज्ञांनी केला आहे. या प्रकल्पातील पाण्यामुळे फलटण तालुक्यातील धोम बलकवडीचे कालवे बारमाही वाहतील. या प्रकल्पातील पाणी धोम- बलकवडीच्या माध्यमातून कोरेगाव व माण-खटाव तालुक्यांसही मिळणार आहे.”
पाणी वाटप लवादानुसार एक ते दोन टीएमसीचे धरण बांधले, तर कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे आपण हे धरण प्रस्तावित केले आहे. नीरा देवघर प्रकल्प ज्याप्रमाणे धूळखात एका कोपऱ्यात पडला होता. त्याचप्रमाणे सोळशी धरण प्रकल्पाची फाइलही धूळखात पडली होती; आपण ती पुढे कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून हा धरण प्रकल्प नक्कीच पूर्णत्वास जाईल, असा विश्वास श्री. नाईक- निंबाळकर यांनी या वेळी व्यक्त केला.