पुणे- बंगळूर महामार्गावर भरधाव ट्रव्हल्सने चाैघांना उडविले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या शिरवळ येथील थांब्यावर प्रवाशांना भरधाव आलेल्या ट्रव्हल्सने वाहनाना उडविले. यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले. शिरवळ पोलिसांनी ट्रव्हल्स चालकाला ताब्यात घेतले आहे.

शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एका खासगी कंपनीमध्ये मुलाखतीसाठी आलेल्या मयूर रवींद्र रावे (वय- 23, सध्या हिंजवडी, पुणे. मूळ रा. चिखली, जि. बुलडाणा) हा तरुण कंपनीमधील मुलाखत संपवून पुणे येथे जाण्याकरिता खासगी कंपनीमधील अधिकारी रणजित राजाराम कुंभार (वय- 32, रा. सातारा) यांच्यासमवेत शिरवळ हद्दीमधील महामार्गावर पुण्याला जाणाऱ्या दिशेला वाहनांची प्रतीक्षा करीत होता. दरम्यान, कर्नाटकहून पुणे बाजूकडे निघालेल्या भरधाव ट्रव्हल्स (एआर- 02- ए- 9691) चालक गुरुराज तमन्ना कुलकर्णी (वय- 26, रा. फत्तेपूर, तालीकोट, जि. विजयपूर, कर्नाटक) याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन महामार्गावर फिरत वाहनांची प्रतीक्षा करीत असलेल्या लोकांच्या अंगावर गेले.

यामध्ये मयूर रावे, रणजित कुंभार (रा. पुणे), निकिता दत्तात्रय जाधव (वय- 23, रा. अतिट, ता. खंडाळा) व दुकानाचे साहित्य खरेदी करण्याकरिता पुणे याठिकाणी निघालेल्या सुंदर सुरेश मोदी (वय- 28, रा. शिरवळ, ता. खंडाळा) यांना जोरदार धडक दिली. या धडकेत चारही प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच शिरवळचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी नागरिकांच्या मदतीने गंभीर जखमींना शिरवळ येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले. बसचालक गुरुराज कुलकर्णी याला शिरवळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस अंमलदार अरुण भिसे-पाटणकर तपास करीत आहे.

Leave a Comment