कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कोरोना संसर्ग नियंत्रणात यावा यासाठी गर्दी करू नये असे आवाहन केल्यानंतरही पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथील बाजारपेठेत नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. तेव्हा विनाकारण फिरणाऱ्यावर तसेच गर्दी करणाऱ्या नागरिकांच्यावर ढेबेवाडी ग्रामपंचायतीने आरोग्य आणि पोलिस यंत्रणेच्या माध्यमातून बाजारपेठेत ऑन द स्पॉट कोव्हीड टेस्ट व लसीकरण अशी संयुक्त मोहीम राबविलेली आहे.
पाटण तालुक्यातील ढेबेवाडी ही मोठी बाजारपेठ आहे. येथे भागातील लोक कामानिमित्त ये- जा करतात. अनेकदा कारवाईचा बडगा उभारूनही सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथे दर मंगळवारी भरणाऱ्या आठवडा बाजारावर नियंत्रण आणण्यासाठी बाजारात विक्रेत्यांकडील लस घेतल्याच्या प्रमाणपत्राची तपासणी आणि ऑन द स्पॉट कोव्हीड टेस्ट व लसीकरण अशी संयुक्त मोहीम राबविण्यात येत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठवडा बाजार बंद ठेवण्याबाबत प्रशासनाचे आदेश असतानाही ढेबेवाडीत मात्र दर मंगळवारी भरणारा बाजार प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी ग्रामपंचायत व पोलीस यंत्रणेकडून दर मंगळवारी येथे दंडात्मक कारवाईसह नवनवीन उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तरीही त्याचा फारसा उपयोग झालेला नाही, त्यामुळे बाजारात येणाऱ्या विक्रेत्यांच्या लसीकरण प्रमाणपत्राची तपासणी, कोरोना चाचणी व लसीकरण अशी संयुक्त मोहीम सणबुर प्राथमिक आरोग्य केंद्र, ढेबेवाडी ग्रामपंचायत व पोलिस यांच्यामार्फत राबवली जात आहे.