औरंगाबाद – शेवगाच्या शेंगा तोडताना विजेचा धक्का बसल्याने एका ३९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात घडली. विजय पांडुरंग नाथभजन असे 39 वर्षीय मृताचे नाव आहे.
या प्रकरणी मृताचा भाऊ विकास यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, विजय हे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात कंत्राटी कामगार म्हणून गेल्या दोन महिन्यांपासून कामाला होते. सकाळी विजय यांना त्यांच्या सुपरव्हाइजरचा कॉल आला होता. शेंगा तोडण्यासाठी लवकर या म्हणून त्यांचा तगादा सुरु असल्याने विजय सकाळी साडेनऊ च्या दरम्यान घरातून गेले.मात्र तेथे शेंगा तोंडत असताना अचानक त्याना विजेचा धक्का लागला आणि ते जमिनीवर बेशुद्ध पडले. सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तो पर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. घाटीतील डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रविवारी अभियांत्रिकी महाविद्यालयाला सुट्टी असते. विजय यांची देखील रविवारी सुट्टी होती मात्र तरी देखील महाविद्यालयात परिसरातील शेवंगाच्या शेंगा तोडण्यासाठी वारंवार विजय यांना बोलविण्यात आले होते. विजय यांना तीन अपत्ये असून त्यांच्या घरात विजय हे एकटेच घराचा गाडा चालवत असे.त्यांच्या मृत्यूने घरातील कर्ता पुरुष गेल्याने परिवारावर उपासमातिची वेळ आली असून मृताच्या वारसांना नोकरीत सामावून घाव्ये अशी मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली आहे.