हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीबाबत चर्चा सुरु असतांना दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार हे काका- पूतनेही एकत्र येणार का या चर्चाना जोर आलाय. मागच्या काही दिवसांत पवार काका- पुतण्याच्या सततच्या भेटीगाठीमुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार या शक्यतांना बळ मिळत आहे. त्यातच आता खुद्द शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत बाबींबाबत मोठं विधान केलं आहे. पक्षातील काही नेत्यांना वाटत कि अजित पवारांसोबत (Ajit Pawar) जावं, तर दुसऱ्या गटाला वाटते की आम्ही थेट किंवा अप्रत्यक्षपणे भाजपसोबत जाऊ नये अशी माहिती शरद पवारांनी दिली. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
शरद पवार म्हणाले, आमच्या पक्षातील नेतेमंडळींत २ मतप्रवाह आहे. त्यातील एक गट असा आहे ज्याला वाटत कि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससोबत आम्ही एकत्र यावं, तर दुसऱ्या गटाला मात्र भाजपसोबत जायलाच नको, त्यापेक्षा पुन्हा एकदा इंडिया आघाडीला एकत्र करूया असं वाटत. तसंच संसदेत विरोधी पक्षात बसायचं की नाही हे सुप्रिया सुळे यांनी ठरवावं असं सूचक वक्तव्य पवारांनी या मुलाखतीत केलंय. पवारांच्या या वक्तव्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचे वारे वाहू लागलेत का अशा चर्चा रंगल्यात.
मागच्या काही दिवसांत तुमच्या आणि अजित पवारांच्या भेटीगाठी सातत्याने वाढताना दिसतायत याबाबत विचारलं असता, त्या भेटीगाठी राजकारणासाठी नव्हत्या . शैक्षणिक संस्थांसह अनेक संस्था आहेत जिथे आम्ही त्यांच्यासोबत, एनडीएसोबत, डाव्या पक्षांसोबत काम करतो आणि आम्ही ते करत राहू असे शरद पवारांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, मागच्या काही दिवसापासून शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील भेटीगाठी वाढल्या आहेत. एप्रिल महिन्यात, दोन्ही नेते ३ वेळा भेटले. २१ एप्रिल रोजी पुण्यातील साखर संकुलात आयोजित एका तांत्रिक चर्चासत्रात शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र दिसले. त्यापूर्वी १२ एप्रिल रोजी रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर दिसले. एवढच नव्हे तर त्याच्या आधी अजित पवार यांचे पुत्र जय यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमालाही काका- पुतणे एकत्र आले होते. राजकारणात काहीही होऊ शकतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार हे कालही माझे दैवत होते, आजही आहेत अशा प्रकारचं भाष्य काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यामुळे दोन्ही पवार एकत्र येणार या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असतात.