नवी दिल्ली । कोरोनामुळे आर्थिक संकटात रुतून बसलेल्या देशाच्या अर्थचक्राला आता गतीमान करायला हवं. अशा वेळी आणखी एक लाॅकडाऊन अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक ठरेल, असा इशारा रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिला. करोनाच्या लढाईत गरिबांना दोन वेळच्या अन्नाची सोय करण्यासाठी सरकारला किमान ६५ हजार कोटींची आवश्यकता आहे, असे अर्थतज्ञ तसेच रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी सांगितले. आता लाॅकडाऊन उठवण्याबाबत ठोस निर्णय घेऊन दैनंदीन जीवन सुरळीत करण्याला सरकारने प्राधान्य द्यायला हवे, असे राजन यांनी सांगितले. लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर देशातील उद्योगधंदेही बंद आहेत. त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. यादरम्यान काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी राजन यांच्याशी व्हिडिओ चॅटद्वारे संवाद साधला.
यावेळी राजन लॉकडाउन सह अन्य समस्यांवर भाष्य केलं. शून्य संख्येवरच लॉकडाउन उघडला जाईल असं वाटत असेल तर ते अशक्य आहे, असं मत राजन यांनी राहुल यांच्याशी बोलताना व्यक्त केलं. तसच त्यांनी सद्यस्थितीत गरीबांची मदत करणं महत्त्वाचं असल्याचं सांगत यासाठी सरकारनं ६५ हजार कोटींचा निधी देणं आवश्यक असल्याचं राजन यांनी सांगितलं. देशात करोना बळींची संख्या एक हजारांवर गेली आहे. करोना रोखण्यासाठीचा देशव्यापी लाॅकडाऊनचा दुसरा टप्पा ३ मे रोजी संपणार आहे. करोनामुळे होणाऱ्या अर्थसंकटाशी कशा प्रकारे सामना करावा याबाबत गांधी यांनी राजन यांच्याशी संवाद साधला. राजन म्हणाले की भारताची अर्थव्यवस्था २०० लाख कोटींची आहे. त्यापैकी ६५ हजार कोटी हे गरिबांच्या अन्नपुरवठ्यासाठी वापरायला हवेत. कोरोनाने साऱ्या जगासमोर आव्हान उभं केलं आहे. करोना रोखण्यासाठी नियमांपलिकडे जाऊन कामं करावं लागेल.
केंद्राला सरकारला प्राधान्यक्रम ठरवावा लागेल. अर्थचक्राला पुन्हा गती देण्यासाठी व्यापक विचार करावा लागेल. लाॅकडाऊनमुळे अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प आहे. त्यामुळे त्याला चालना देण्यासाठी सरकारने प्राधान्यक्रम ठरवून उपाययोजना कराव्यात, असे राजन यांनी यावेळी सुचवले. आणखी एक लाॅकडाऊन अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक ठरेल, असे इशारा त्यांनी दिला. बाजारपेठ पुन्हा खुली केल्याने कोरोनाबाधीतांची संख्या शुन्य होईल, हे समजणं चुकीचे आहे, मात्र सोशल डिस्टन्सिंगचे पालन महत्वाचे राहील, असे राजन यांनी सांगितले. नजिकच्या काळात चांगल्या दर्जाच्या नोकऱ्या निर्माण कराव्या लागतील. कोरोनाच्या संकट काळात जागतिक बाजारपेठेला पुरवठा करणारे केंद्र बनण्याची संधी भारताला आहे, असेही राजन यांनी म्हटलं.