फलटण | गावठी दारू तयार करून तिची विक्री करण्यात येत असलेल्या भिलकटी (ता. फलटण) येथे ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून घटनास्थळावरून 1 लाख 11 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आला आहे. याप्रकरणी चौघांविरुध्द गुन्हा दाखल झाला असून, यापैकी एकास अटक करण्यात आली आहे. सनी सोनवणे, पोपट गुंजाळ, किशोर आवारे (तिघेही रा. मंगळवार पेठ, फलटण), संदीप दिगंबर बनकर (रा. भिलकटी, ता. फलटण) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून, यापैकी संदीप बनकर यास अटक करण्यात आली आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, भिलकटी येथील बनकर यांच्या शेताजवळ नीरा उजवा कालव्या नजीकच्या झाडीत काल सकाळी अकराच्या सुमारास छापा टाकला त्यावेळी तेथे त्यांना सनी सोनवणे, पोपट गुंजाळ, किशोर आवारे हे गावठी हातभट्टीच्या दारूचे मिळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून प्लॅस्टिकचे कॅन, इलेक्ट्रिक मोटार, केबल वायर, बॅरल, जर्मलची घमेली, ताट, बाभळीच्या साली, गुळाच्या ढेपा, नवसागर व एक मोटारसायकल, तयार गावठी हातभट्टीची 40 लिटर दारू असा एक लाख 11 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. याठिकाणी एक हजार 800 लिटर रसायन व 50 किलो वजनाचा गूळ पोलिसांनी पंचांसमक्ष जागेवर नष्ट केला.
सर्व संशयितांना संदीप बनकर याने जागा उपलब्ध करून दिली होती. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे, पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.