सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
किल्ले पांडवगडावर फिरण्यासाठी गेलेल्या एक मुलगा तब्बल 80 फूट कड्यावरून खोल खाली दरीत कोसळ्याची घटना आज सकाळी घडली. यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली असून उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील वाई येथील कु. विनायक राजपुरे हा मित्रासोबत आज सकाळी फिरण्यासाठी गेला होता. तो मित्रांसोबत पांडेवाडी मार्गे गड चढला. मात्र, गड उतरत असताना विनायकचे मित्र पांडेवाडी मार्गे पुढे गेले तर विनायक चुकीच्या वाटेने गडाच्या पश्चिमेस असणाऱ्या कड्याच्या दिशेने गेला. तिथून तो पुढे जात असतानाखाली असलेल्या 80 फूट खोल दरीत खाली पडला. त्यात त्याला गंभीर दुखापत झाली.
खोल दरीत पडल्यानंतर त्याने फोन करून याबाबतची माहिती आपल्या मित्रांना दिली तसेच मोबाईलवरून त्याचे लोकेशन सेंड केले. नंतर त्याच्या मित्रांनी याबाबतीत माहिती जवळच्या नातेवाईकांना दिली. नातेवाईकांनी ही माहिती आणि लोकेशन वाईतील गिर्यारोहण संस्थाना दिली. संस्थेतील सदस्यांनी त्वरित गुंडेवाडी मार्गे पांडवगडाकडे धाव घेतली. तसेच गुगल मॅपच्या लोकेशनवरून त्याची शोधा-शोध चालू झाली.
अखेर काही तासानंतर गिर्यारोहकांनी विनायकला शोधून काढले. दरम्यान या घटनेत विनायकच्या उजव्या हाताला दुखापत झाली असून त्याला पुढील उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. या रेस्क्यू मोहिमेसाठी गुंडेवाडी युवक व ग्रामस्थ, शिवसह्याद्री करिअर अकॅडमी, योद्धा ट्रेकर्स, भटकंती सह्याद्रीची परिवार, महाबळेश्वर ट्रेकर्स या संस्थेतील सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.