कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून कराड तालुक्यातील विठ्ठलवाडी (तुळसण) येथे एकावर चाकूने वार केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. याप्रकरणी पंडीत आत्माराम चव्हाण (वय 46, रा. विठ्ठलवाडी, तुळसण) यांनी कराड ग्रामिण पोलिसात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शंकर बाळकृष्ण चव्हाण (रा. विठ्ठलवाडी, तुळसण) असे गुन्हा नोंद झालेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पंडीत चव्हाण हे शेती करतात. 24 जून रोजी पंडीत चव्हाण व त्यांचा ट्रॅक्टर ड्रायव्हर मारुती बबन चव्हाण शेतात नांगरणी करीता ट्रॅक्टर घेवुन जात असताना शंकर चव्हाण यांने पंडीत चव्हाण यांना शिवीगाळ केली होती. त्यावर मारुती चव्हाण याने पोलीस ठाण्यात शंकर चव्हाण याच्या विरुध्द तक्रार दिली होती.
शुक्रवारी 2 जुलै रोजी रात्री आठ वाजता पंडीत चव्हाण तसेच मारुती चव्हाण हे सुनिल एकनाथ करांडे यांच्या कपड्याच्या दुकानासमोर थांबले असताना शंकर चव्हाण तेथे आला. व त्याने तुम्हाला लय मस्ती आली आहे अशी शिवीगाळ करून चाकूने पंडीत चव्हाण यांच्यावर वार केले. तसेच मारुती चव्हाण यांना शिवीगाळ केली. हल्ल्यात पंडीत चव्हाण जखमी झाले असून चव्हाण यांना खाजगी रूग्णालयात दाखल केले.