औरंगाबाद प्रतिनिधी । संपूर्ण देशाच्या बहुतांश भागात यंदा पावसाने उशिरापर्यंत जोरदार हजेरी लावली. तसेच उशिरा झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. याचा सर्वात मोठा परिणाम कांद्याच्या उत्पनावर झाला. घाऊक बाजारात कांद्याची आवक घटल्याने कांद्याची दरवाढ मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले. राज्याप्रमाणे औरंगाबाद मध्ये देखील कांद्याचे दर गगनाला भिडले होते. मात्र आता काही प्रमाणात कांद्याचे दर झाल्याचे पाहण्यात येत आहे.
तब्बल १०० रुपये किलोपर्यंत गेलेला कांदा गुरुवारी कमी झालेला पाहायला मिळाला. येथील किरकोळ बाजारात दर्जेदार कांद्याचा भाव किलोमागे ५० ते ६० रुपये होता. तर हलक्या प्रतीच्या कांद्याचा भाव हा ३० रुपये किलो आहे. मागणी आणि पुरवठ्याचे गणित बिघडल्याने कांद्याच्या दरात सारखा चढउतार सुरू आहे. सात ते आठ दिवसांपूर्वीच येथील किरकोळ बाजारातही कांद्याने शंभरी गाठली होती.
जादा दरामुळे सर्वासामान्य ग्राहकांनी कांद्याकडे पाठ फिरवली होती. दरम्यान, ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या आणि हॉटेलातील अनेक पदार्थातून गायब झालेल्या कांद्याचा तोरा गेल्या चार ते पाच दिवसांपासून हळूहळू खाली येऊ लागला आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच येत्या काही दिवसात कांद्याचे दर आणखी येतील असा विश्वास कृषी उत्पन्न बाजार समितीने व्यक्त केला आहे.