हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील अनेक भागांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, कारण महाराष्ट्रातील धरणांमध्ये केवळ 41 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. विशेषतः पुण्यातील परिस्थिती अत्यंत गंभीर असून, पुणेकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलशयांमध्ये केवळ 36.31 टक्के पाणीसाठा उरला आहे. पावसाळा सुरु होण्यासाठी अजून खूप कालावधी बाकी आहे , अशा परिस्थितीमध्ये जलसाठ्यामधील पाणी कमी होणे , हि चिंताजनक बाब आहे. यासाठी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे अत्यावश्यक ठरणार आहे.
महाराष्ट्रात लहान मोठी मिळून एकूण 2 हजार 997 धरणे –
महाराष्ट्रात लहान मोठी मिळून एकूण 2 हजार 997 धरणे असून, त्यांची एकत्रित साठवण क्षमता 40,498 दशलक्ष घनमीटर आहे. मात्र, यामध्ये केवळ 30,034 दशलक्ष घनमीटर म्हणजेच सुमारे 42 टक्केच पाणीसाठा उरलेला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 35.16 टक्के पाणीसाठा होता, त्यामुळे यंदाचे प्रमाण थोडे जास्त असले तरी परिस्थिती गंभीरच आहे.
टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू –
राज्य सरकारने ग्रामीण अन अर्थ-ग्रामीण भागांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु केला आहे. एका आकडेवारीनुसार, सध्या राज्यात 223 टँकर कार्यरत आहेत, जे 178 गावे आणि 606 वाड्यांना पाणीपुरवठा करत आहेत.
जिल्ह्यानुसार पाणीसाठ्याची स्थिती –
अमरावती – 50.09% – सर्वाधिक समाधानकारक स्थिती
कोकण – 49.96%
नाशिक – 43.9 %
नागपूर – 41.49%
मराठवाडा – 40.49%
पुणे – 36.31% – सर्वात कमी साठा
पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन –
राज्यभरात तापमान झपाट्याने वाढत असून, पावसाला अजून वेळ असल्यामुळे प्रशासनाने नागरिकांना पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन केले आहे. सर्व जिल्ह्यांतील पाणी साठ्यांवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे आणि गरज पडल्यास आणखी टँकर सेवा वाढवण्याची तयारीही प्रशासनाने केली आहे.