सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात असलेल्या प्रतापगडावरील अफझल खानाच्या कबरीची जागा सर्वांसाठी खुली करा, अशी मागणी माजी आमदार नितीन शिंदे यांनी केली असून त्यासाठी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
महाबळेश्वर येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शासनाने अफझलखानाच्या कबरीला दिलेला पोलीस बंदोबस्त मागे घ्यावा. तसेच ही जागा सर्वसामान्यांना खुली करून या ठिकाणी अफजलखान वधाचे शिल्प उभारून त्यावर मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत महाराजांचा पराक्रम लिहावा. यासाठी लवकरच श्री शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलन सुरू करीत आहेत, असे माजी आमदार नितीन शिंदे यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे अफझलखानाचे आणि त्याच्या अंगरक्षकाचे थडगे सर्वांसाठी खुले करावे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध करून जो पराक्रम केला होता, त्याचे स्मरण भावी पिढीला राहावे म्हणून प्रशासनाने या ठिकाणी सर्वांना जाण्याची परवानगी द्यावी. त्यासाठी पुन्हा एकदा श्री शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलन सुरू केलं जाईल, असंही शिंदे यांनी सांगितलं.