जिल्हा परिषदेच्या गैरव्यवहार प्रकरणी चौकशी चे आदेश

औरंगाबाद – जिल्हा परिषदेमध्ये गेल्या अनेक वर्षात विविध विभागातील विविध योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. यात जुनी पाणीपुरवठा योजना तसेच टँकर घोटाळा व घरकुल योजने संदर्भात समिती नेमून चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या वतीने देण्यात आले आहे.

नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभेत जिल्हा परिषद सदस्य यांनी 2018 ते 2020 या काळामध्ये करोडो रुपयांचा टँकर घोटाळा झाला असून, 62 कोटी 80 लाखाचे पेमेंट ठेकेदाराला करण्यात आले असल्याचे निदर्शनास आणून दिले. तर मागील विविध काळात पाणीपुरवठा योजनांच्या कामांना मंजुरी मिळाली असून त्यात अनेक ठिकाणी योजना अपूर्ण आहेत. जिल्ह्यांमध्ये 74 योजना अपूर्ण आहेत. यातील 36 योजना पूर्ण झाल्या असून बाकीच्या योजना अपूर्ण आहेत तर काही योजनांमध्ये अपहार झाल्याचे समोर आले आहे. या संदर्भात पाणी पुरवठा विभाग विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची समिती नेमली आहे. तर टँकर घोटाळ्यासंदर्भात कार्यकारी अभियंता यांची समिती नेमण्यात आली असल्याचे गटणे यांनी सांगितले.

दरम्यान 2016 ला गंगापूर तालुक्यात घरकुल योजनेमध्ये साधरणतः तीन कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. यात पात्र लाभार्थींना याचा मोबदला देण्यात आलेला नाही, तर लाभार्थींचे खोटे बँक खाते तयार करून संबंधितांनी अपहार केला आहे. काही बँकांचे अधिकारी कर्मचारीही यात सहभागी असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांचे अधिकारी व जिल्हा परिषदेचे लेखा व वित्त अधिकारी यांची समिती नेमली आहे.