सातारा | मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्नशासकीय कोरोना रुग्णालयातील (सिव्हिल हॉस्पिटल) 31 प्राध्यापक, 10 पुण्यातील आणि सोलापुरातील दोन असे सातारा जिल्ह्याला 43 डाॅक्टरांची टीम मिळणार आहे. डॉक्टरांची सातारा येथे नव्याने होणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयात बदली करण्यात आली आहे. तसे आदेश वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालकांनी दिले आहेत. त्यांच्या शिफारसीनुसारच त्यांची प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे.
सातारा येथे १०० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असणारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नव्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे. त्यासाठी ५१० पदे भरण्यात येणार आहेत. त्यामध्ये डॉक्टरांचाही समावेश आहे. त्यामुळे पुणे, सोलापूर व मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ४३ डॉक्टरांच्या बदल्या सातारा येथील महाविद्यालयात करण्यात आल्या आहेत. तसा आदेश देण्यात आला आहे.
यामध्ये पुण्यातील दहा, सोलापुरातील दोन व मिरजेतील ३१ डॉक्टरांचा समावेश आहे. यामध्ये औषध वैद्यकशास्त्र, शल्यचिकित्सा शास्त्र, शरीररचना शास्त्र, जीव रसायन शास्त्र विभागातील डॉक्टरांचा समावेश आहे. सदरील डाॅक्टरांना तात्काळा सातारा येथे हजर रहावे, असे आदेशात म्हटले आहे.