कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना आणि कृष्णा कृषी विकास परिषदेच्या माध्यमातून 22 डिसेंबर 2022 रोजी जयवंतराव भोसले (आप्पा) यांच्या जयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन आयोजित करणार असल्याची माहिती कृष्णा सहकारी बॅंकेचे चेअरमन डाॅ. अतुल भोसले यांनी दिली.
कराड येथील कृष्णा अभिमत विद्यापीठ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी कृष्णा कृषी विकास परिषदेच्या अध्यक्षपदी शेतीमित्र अशोकराव थोरात यांची निवड करण्यात आली. यावेळी कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, संचालक जितेंद्र पाटील, दयानंद पाटील, धोंडीराम जाधव, बाजीराव निकम, संजय पाटील, निवासराव थोरात, वसंतराव शिंदे, संभाजीराव पाटील, विलास भंडारे, सयाजी यादव, जे. डी. मोरे, शिवाजी पाटील, बाबासो शिंदे, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, वैभव जाखले आदी उपस्थित होते.
डाॅ. अतुल भोसले म्हणाले, कृषी विकास परिषदेच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी काम केले जाईल. परदेशात शेतीत होणारे बदल, टेक्नालाॅजी यांचा फायदा आपल्या येथील शेतकऱ्यांना फायदा व्हावा, असा उद्देश कृषी प्रदर्शनाचा आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे या प्रदर्शनासाठी मार्गदर्शन घेण्याचाही प्रयत्न राहील. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत डाॅ. सुरेश भोसले बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आलेली आश्वासने पूर्ण करण्यात येत आहेत. सभासदांचे हित जोपण्यासाठी कृषी परिषदेची व पाणी परिषदेची स्थापना करण्यात आलेली आहे.