व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

‘आझादी का अमृत महोत्सव’ निमित्ताने शहरात विविध उपक्रमांचे आयोजन

औरंगाबाद – आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने केंद्र शासन आणि राज्य शासनातर्फे ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने स्मार्ट सिटी औरंगाबाद आणि महानगरपालिका औरंगाबाद यांच्या तर्फे २६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. जनसहभागातून हे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. शहरातील शाळा, महाविद्यालये, एनजीओ, सरकारी आणि खाजगी संस्था इत्यादींचा सहभाग या उपक्रमात अपेक्षित आहे. सर्वांच्या सहभागातून हा उपक्रम राबवला जाणार आहे.

२२ सप्टेंबरला झालेल्या विभाग प्रमुख आणि स्मार्ट सिटी औरंगाबादचे अधिकारी यांच्या बैठकीमध्ये ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरीकरणाच्या निमित्ताने शासनाने दिलेल्या निर्देशानुसार २६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत घेण्यात येणाऱ्या उपक्रमांविषयी चर्चा करण्यात आली. यामध्ये उपक्रमाच्या स्वरूपानुसार त्याची मांडणी, नियोजन करण्यासाठी विविध अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. यावेळी मनपा आयुक्त व प्रशासक आणि औरंगाबाद स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय ह्यांचा सोबत शहर अभियंता सखाराम पानझडे, सहायक आयुक्त नंदकिशोर भोंबे, उपायुक्त संतोष टेंगले, सौरभ जोशी, उप अभियंता ए बी देशमुख, स्मार्ट सिटी चे स्नेहा बक्षी, स्नेहा नायर, आदित्य तिवारी, किरण आढे आणि अर्पिता शरद ह्यांची उपस्थिती होती. २ ऑक्टोबर रोजी या महोत्सवाच्या निमित्ताने सायकल रॅली आणि फ्रीडम वॉकचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवात ‘स्वच्छ भारत मिशन’ अभियाना अंतर्गत ‘स्वच्छता’ हा विषय केंद्रस्थानी ठेवून विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यामध्ये शहरी भागात स्वच्छ भारत मिशन, शहरातील कॅनॉट परिसरात स्ट्रीटस् फॉर पीपल, सेंट्रल नाका ते एमजीएम आणि सलीम अली सरोवर ते टीव्ही सेंटर रोडवर सायकल फॉर चेंज म्हणजेच सायकलिंग ट्रॅक ची निर्मिती, स्मार्ट सिटी औरंगाबाद आणि महानगरपालिका औरंगाबाद यांनी जानेवारी महिन्यापासून सुरू केलेल्या खाम नदी पुनरूज्जीवन प्रकल्प अंतर्गत खाम नदी परिसरात खेळाचे मैदान बनवणे, वृक्षारोपण करणे, नदी काठावर स्ट्रीट लाईट बसवणे, पेंट युवर सिटी अंतर्गत खाम नदीकाठी वसलेल्या घरांच्या बाहेरील भिंती रंगवणे, महानगरपालिकेच्या जलकुंभाची रंगरंगोटी करणे, पेंट युवर स्ट्रीट अंतर्गत शहरातील रस्ते आणि चौक येथे रंगरंगोटी करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर आणि घाटी रुग्णालय परिसरातील रस्त्यांची रंगरंगोटी करणे इत्यादी उपक्रमांचा समावेश आहे. यासाठी स्मार्ट सिटी औरंगाबाद, महानगरपालिका औरंगाबाद यांनी उपक्रमानुसार अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात हे उपक्रम राबवले जाणार आहेत.

राष्ट्रगानचा विश्व विक्रम –
सर्वात जास्त लोकांनी एकाच वेळेस म्हटलेले भारताचे राष्ट्रगान असा जागतिक विक्रम करण्याचा प्रयत्न औरंगाबाद शहर करणार आहे. अझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी ऑक्टोबर 2 ला सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांवर पूर्ण शहरातील नागरिक जिथे कुठे असतील तिथे पूर्ण सन्मानाने उभे राहून भारताचा राष्ट्रगान म्हणतील. कोविड -१९ चा पार्श्वभूमी मोठ्या समूह मध्ये राष्ट्रगान संभव नसल्यामुळे नागरिकांना आव्हान आहे की त्याने #JanGanMan हा हैशटॅग वापरुन सोशल मीडिया वर त्यांचा व त्यांचा कुटुंबाचं राष्ट्रगान गाण्याचा व्हिडिओ पोस्ट करावा. ह्या व्हिडिओज कडून किती लोकं ह्या उपक्रमात सामील झाले ह्याची कल्पना मिळेल. तर सर्व नागरिकांना मनपा आयुक्त व प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय ह्यांचा आवाहन आहे की त्यांनी जास्ती जास्त संख्येत सहभाग नोंदवून ह्या उपक्रमाला यशस्वी करावे.