लंडन । कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने आता युरोपात विशेषकरून ब्रिटनमध्ये थैमान घातलं आहे. कोरोनाचा हा प्रकोप लक्षात घेता पुढील किमान १० वर्ष तरी कोरोनाचा विषाणू आपल्यासोबत राहील, असं महत्वपूर्ण विधान BioNTech चे सीईओ उगुर साहिन यांनी केलं आहे. कोरोना व्हायरस संदर्भातील एका व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये साहिन यांना कोरोनाच्या डेडलाइनबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. “आपल्याला ‘न्यू नॉर्मल’ची परिभाषा समजून घेण्याची गरज आहे. पुढील १० वर्षतरी कोरोनाचा विषाणू आपल्यासोबत राहणार आहे”, असं साहिन म्हणाले.
BioNTech ची कोरोनावरील लस अमेरिकेच्या दिग्गज फायझर कंपनीच्या संयुक्त विद्यमाने विकसीत करण्यात आली आहे. या लशीला सध्या ४५ हून अधिक देशांमध्ये सार्वजनिक वापरासाठी मंजुरी देखील देण्यात आली आहे. ब्रिटन आणि अमेरिका या देशांचाही यात समावेश आहे. ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवरही येत्या ६ आठवड्यांमध्ये लस तयार होऊ शकते, असंही साहिन यांनी सांगितलं आहे.
“मेसेंजर टेक्नोलॉजीची सर्वात सुंदर गोष्टी अशी आहे की यामाध्यमातून आपल्याला थेट लशीवर काम करता येतं. यातून लशीची कॉपी तयार करणं सहज शक्य होतं. त्यामुळे फक्त ६ आठवड्यांमध्ये आपण नवी लस तयार करू शकतो”, असं साहिन म्हणाले. ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवरही फायझरची लस परिणामकारक ठरेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. ब्रिटनमध्ये जेव्हापासून कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची उत्पत्ती झाली आहे. तेव्हापासून आठवड्यातील सर्वाधिक मृत्यूंची नोंद ब्रिटनमध्ये होत आहे. त्यामुळे भारत, अमेरिकासहीत इतर सर्व देशांना घाम फुटला आहे.
बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’