औरंगाबाद – लॉकडाऊनमुळे गेल्या दीड वर्षांपासून लावलेल्या निर्बंधांमुळे, रेस्टॉरंट बंद-चालू करण्यात येत आहेत. यामुळे आमचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून आतापर्यंत सर्वकाही अनलॉक केले आहे. सर्वांना वेळ वाढवून देण्यात येत आहे. आम्ही वर्षाकाठी लाखो रुपयांचा महसूल देऊनही पूर्णवेळ देण्यात आलेला नाही. यामुळे आता हॉटेल बार रात्री साडे ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यासाठी परवानगी देण्याची मागणी, जिल्हा हॉटेल व रेस्टाॅरंट ऑनर्स असोसिएशनतर्फे करण्यात आली. तसेच येत्या दोन दिवसांत यावर निर्णय न झाल्यास, हॉटेल लॉक करून त्यांची चावी जिल्हा प्रशासनाकडे देणार असल्याच इशाराही असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आला.
यावेळी जिल्हा हॉटेल व रेस्टाॅरंट ऑनर्स असोसिएशनचे सचिव किशोर शेट्टी म्हणाले की, लॉकडाऊन आणि ब्रेक द चेन अंतर्गत नवीन नियमावली नुसार गेल्या एक ते दीड वर्षांपासून विविध निर्बंध हॉटेल व रेस्टाॅरंट चालकांवर लादण्यात येत आहे. यामुळे आमचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, जवळपास चार ते साडेचार हजार कामगारांची नोकरी यामुळे गेली. आम्ही आतापर्यंत शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करीत आहोत. यापुढे सर्व खबरदारी घेत आम्ही हॉटेल चालविणार आहोत. हॉटेल रेस्टाॅरंटला केवळ रात्री ८ वाजेपर्यंत वेळ देण्यात आला आहे. हा वेळ नियमितपणे वाढवून देण्यात यावा.
यासह दरवर्षी आम्ही परवान्यासाठी साडेसहा लाख रुपये वार्षिक फिस भरतो. त्यास सवलत देण्यात यावीत. यासह वीजबील, पाणीपट्टी आणि मालमत्ता करातही सवलत देण्यात यावीत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी पाटील, जयराम सोळुंके, सुरेश लालवाणी, प्रकाश शेट्टी, रमेश तेलाने यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.