कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड:- कराड तालुक्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाग्रस्त रूग्णांची अधिक सोय व्हावी या उद्देशाने कृष्णा हॉस्पिटलने ऑक्सिजन बेड वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हॉस्पिटलच्या माध्यमातून वाठार येथील कृष्णा फौंडेशन कॅम्पस येथे 70 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे आता लवकरच कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून जवळपास एकूण 500 कोरोनाग्रस्त रुग्णांची सोय होणार आहे.
कोरोनामुक्तीच्या लढ्यात कृष्णा हॉस्पिटलने सुरवातीपासूनच मोठे योगदान दिले आहे. सुरवातीला 60 बेडचा कोविड वार्ड तयार करण्यात आला. पण जिल्ह्यात जसजशी रुग्णसंख्या वाढू लागली तसतशी बेडची संख्या वाढवत नेत 400 करण्यात आली. आजअखेर कृष्णा हॉस्पिटलमधून 1295 रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात आले आहे.
दरम्यान कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आणि त्यातही ऑक्सिजन बेडची वाढती गरज लक्षात घेऊन, कृष्णा हॉस्पिटलने ऑक्सिजन बेड वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय वाठार येथील कृष्णा फौंडेशन कॅम्पस येथे देखील सर्व अत्याधुनिक सुविधांनी युक्त असणारे 70 बेडचे कोविड केअर सेंटर कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरू करण्यात येणार आहे. यामुळे अधिकाधिक कोरोनाग्रस्त रुग्णांना उपचारासाठी सामावून घेणे शक्य होणार असल्याचे कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी सांगितले.
कृष्णा हॉस्पिटलने जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार सुरू केलेली ‘कोविड-19 ओपीडी’ पूर्णवेळ कार्यरत राहणार असून, याठिकाणी कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांचे वर्गीकरण केले जाणार आहे. म्हणजेच ऑक्सिजनची गरज भासणारे रुग्ण, तसेच लक्षणे नसलेले पण बाधा झालेले असे रुग्ण की ज्यांच्यावर घरीच उपचार करणे शक्य होईल, असे रुग्णांचे वर्गीकरण करून, त्यांना योग्य त्या उपचारसुविधा तातडीने पुरविण्याची सोय केली जाणार आहे.
याचबरोबर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना डिस्चार्जनंतरही मार्गदर्शन करण्यासाठी पोस्ट कोविड 19 ओपीडी सुरू करण्यात येणार असून, याठिकाणी जे रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत त्यांनाही योग्य मार्गदर्शन केले जाणार असल्याचे, डॉ. भोसले यांनी सांगितले आहे.