स्वच्छतेच्या सर्वेक्षणात पाचगणी नगरपालिकेची १४ व्या स्थानी घसरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

महाबळेश्वर प्रतिनिधी | मागील काही वर्षांमध्ये देशात स्वच्छतेचा डंका गाजवणाऱ्या पाचगणी नगरपालिकेची यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षणात मात्र घसरण झाली आहे. मागील काही वर्षांत अव्वल क्रमांकावर असणाऱ्या पाचगणी नगरपालिकेची यंदा १४ व्या स्थानी घसरण झाली आहे. पाचगणी नगरपालिकेची स्वच्छतेच्या बाबतीत झालेली घसरण पालिकेच्या कारभाराबाबात प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे.

पाचगणी नगरपालिकेची स्वच्छतेच्या बाबतीत घसरण होण्याची कारणं काय आहेत याबाबत आता सर्वसामान्यांमध्ये चर्चा व्हायला लागली आहे. नगरसेवकांनी मागील यशात गुरफटून जाऊन यंदा कामाकडे दुर्लक्ष केलं का? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. पाचगणी नगरपालिकेत नगराध्यक्षांच्या गटाविरोधात विरोधकांनी पूर्णपणे बांधणी केली. पाचगणीच्या बहुतांश नगरसेवकांनी स्वार्थाचं राजकारण करत शहराच्या नावलौकिकाला बाधा येईल असे कुरघोडीचे राजकारण केले. याचाच फटका पाचगणी शहराच्या स्वच्छतेला बसला आहे. सर्वसामान्य जनतेने जगात नावलैाकीक असलेल्या गिरीस्थान नगरपालिकेच्या सदस्यांना आपल्या भागाच्या सर्वांगीण विकासाकरिता निवडून दिलं आहे. मात्र एकमेकांची जिरवाजिरवी करण्यात मश्गुल असलेल्या नगरसेवकांनी पाचगणीची अवस्था पुन्हा खराब करुन टाकली आहे.

पाचगणी शहराच्या प्रथम नागरिक लक्ष्मी कऱ्हाडकर यांना यश टिकवता आलेलं नाही हेच सध्याच्या परिस्थितीत दिसून आलं आहे. नगरसेवकांची साथ नसेल तर कामगिरीवर परिणाम होणार हेच यानिमित्ताने दिसून आलं आहे. डिजिटल कचरा डब्बा निर्मूलन, सॅनिटरी पॅड मशीन्स, अद्ययावत कचरा निर्मुलन पद्धती, भारत स्वच्छ पॉईंट, ई टाॅयलेटस अशा अनेक बाबींवर पाचगणी नगरपालिकेने दरम्यानच्या काळात कोट्यावधी रुपयांची उधळण केली. मात्र हे सगळं करुनही स्वच्छतेची अवस्था मात्र “फटा पोस्टर निकला झिरो“ अशी झाली आहे. पाचगणी शहरातील नगरसेवक आणि नगराध्यक्षा पाचगणीचा नावलौकीक अबाधित ठेवण्याकरीता कमी पडले असल्याची सल सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये दिसत आहे. पाचगणी नगरपालिकेची स्वच्छतेत झालेली घसरण व नगरपालिकेच्या अवाढव्य विकास योजना याचं समीकरण नक्की कोणासाठी व कशासाठी असं विचारण्याची वेळ पाचगणीत येऊन ठेपली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”