Wednesday, September 10, 2025
Home Blog Page 6712

स्वप्नांचा राजकुमार

images
images

हल्लीचं कॉलेज जीवन इतकं रोमँटिक झालंय, की तिथूनच आयुष्याचा जोडीदार मिळतो की काय? अशी धास्ती बऱ्याच कुटुंबियांना लागून राहिलेली असते. लग्नाळू मुला-मुलींनाही मनापासून काही गोष्टी या अशाच असाव्यात असं वाटत. अशातच विचार करण्याचं स्वातंत्र्य असलेली मुलगी, तिच्या खऱ्या राजकुमाराकडून काय अपेक्षा ठेवते हे वाचणं मजेशीरच ठरेल..

त्यानं मला हवं तसंच नसावं,
पण तो जसा आहे तसाच मला हवाहवासा वाटावा…!!

फक्त त्यानंच माझ्यासाठी स्वतःमध्ये बदल करावेत असंही नकोय मला,
मी सुद्धा कुणासाठी तरी स्वतःमध्ये बदल करावेत असा हवा…!!!

शंभर टक्के परफेक्ट तर कुणीच नसतं , तोही नसावा….!!!

त्यालाही असाव्यात काही वाईट सवयी…मलाही आहेत. पण हे जाणून घ्यावं आम्ही दोघांनीही पूर्णपणे.

तो स्वार्थी नसावा…
माणसं जोडून ठेवणारा असावा…
माणसांची, त्यांनी केलेल्या मदतीची आयुष्यभर जाण ठेवणारा…
माणसांत रमणारा असावा…!!
फक्त माझ्यात नव्हे तर इतरही माणसांत , गोष्टींत, घटनांमध्ये तो वेगळेपण शोधणारा असावा….!!!

त्याच्या कामाचा, कर्तृत्वाचा त्याला गर्व नसावा….पण मला अभिमान वाटावा….!!!

लोक त्याच्या विचारांबद्दल, कामाबद्दल त्याचं कौतुक करतील असा हवा….!!!
सर्व वयोगटातल्या लोकांशी सहजपणे संवाद साधू शकणारा, सतत हसतमुख असणारा, स्वतःच्या विचारांवर, मतांवर ठाम असणारा, पण तितकाच दुसऱ्याच्या मतांचा आदर करणारा, स्वतःच्या कामावर प्रेम करणारा, त्यात आनंद शोधणारा, छोट्या छोट्या गोष्टींमुळे खुश होणारा, थोडासा इमोशनल, हळवा असा आणि हो मला सहन करू शकणारा असावा….!!!

फार नाहीत अपेक्षा….!
इतकंच…!!

विभावरी नकाते, इचलकरंजी

केरळच्या उभारणीसाठी १०,५०० कोटींची गरज – मुख्यमंत्री विजयन

Thumbnail
Thumbnail

तिरुअनंतपूरम | मागील १५ दिवसांपासून केरळमधील भीषण झालेली पूरस्थिती पावसाचा जोर ओसरल्यामुळे कमी होत आहे. दैनंदिन कामकाज हळुहळू पूर्वपदावर येत आहे. केरळच्या उभारणीसाठी व आपद्ग्रस्तांना मदतीसाठी १० हजार ५०० कोटी रुपयांची मदत आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री पी विजयन यांनी सांगितले आहे. यातील २६०० कोटी रुपये केंद्राने द्यावेत असंही विजयन म्हणाले. जवळपास १ लाख घराचं व १० हजार किलोमीटर रस्त्याचं या आपत्तीत नुकसान झालं आहे.

दरम्यान मदतीसाठी विविध स्तरांतून मोठ्या प्रमाणावर पुढाकार येत आहे. सुशांत सिंग राजपूत याने १ कोटी, अहमदनगर मधील देहविक्रय करणाऱ्या महिलांनी ५० हजार रुपयांची मदत दिली आहे. विविध सामाजिक संघटनाही या कामात पुढाकार घेताना दिसत आहेत. केंद्राने मात्र देशांतर्गत पातळीवरच या प्रश्नाची सोडवणूक करण्याला प्राधान्य दिलं असून परकीय मदत स्वीकारण्यास तूर्त नकार दिला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं निधन

Gurudas Kamat
Gurudas Kamat

नवी दिल्ली । काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार गुरुदास कामत यांचे आज सकाळी दिल्ली येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. चाणक्यपुरीतील प्रायमस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबई काँग्रेसच्या उभारणीत त्यांचं महत्वाचं योगदान राहिलं होतं. सोनिया गांधी व राहुल गांधी यांचे ते निकटवर्ती मानले जात. महाराष्ट्रानंतर काँग्रेसने त्यांच्यावर राजस्थान, गुजरात, दीव-दमण या राज्यांची जबाबदारी दिली होती.

विद्यार्थी चळवळीमधील कामाच्या अनुभवाचा फायदा त्यांना एनएसयुआयच्या विस्तारामध्ये झाला. त्यांची ४ वेळा लोकसभेच्या खासदारपदी निवड झाली होती. युपीए २ च्या मंत्रिमंडळात त्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री व दूरसंचार मंत्री म्हणूनही काम केले होते. मागील काही वर्षांत संजय निरुपम यांच्याशी त्यांचे असलेले वाद चर्चेचा विषय होते.

जीवनपट –
१९८०– महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसचे सरचिटणीस
१९८४ – महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसचे अध्यक्ष
१९८४, १९९१, १९९८ आणि २००४ – ईशान्य मुंबई मतदारसंघातून लोकसभेवर
२००९– मध्येही मुंबईतील लोकसभेच्या उत्तर पश्चिम मतदारसंघातून खासदार
२००९ ते २०११ – आघाडी सरकारमध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री पदी वर्णी
२०१४ – लोकसभा निवडणुकीत पराभव
२०१७– काँग्रेस पासून अलिप्त, सर्व पदांचा राजीनामा.

मानवकेंद्री धर्माचे शिलेदार | पुस्तक परिक्षण #४

saba nakvi book
saba nakvi book

पुस्तकाचे नाव – सलोख्याचे प्रदेश : शोध सहिष्णू भारताचा

परिक्षण घनशाम येनगे

पुस्तकाची सुरूवात करताना लेखिकेने इंग्रजीमधील एक वाक्य वापरले आहे. “’we are like islands in the sea, seprate on the surface but connected in the deep’’ या वाक्यातच या पुस्तकाची ओळख आहे. भारतातील विविधतेतील एकतेचे दर्शन दाखवण्यासाठी या वाक्याचा आधार लेखिकेने घेतला आहे. या एकमय व सहिष्णु भारताचा शोध या पुस्तकाच्या पानापानात आढळेल.

भारत हा अनेक जाती, धर्म, वंश, भाषा सामाऊन घेणारा देश आहे. जगातील जवळपास प्रत्येक धर्माचे अस्तित्व भारतात आढळते. या परंपरांकडे पाहिल्यानंतर भारत नावाची ५००० वर्षांची परंपरा लक्षात येते व भारतातील सांस्कृतिक एकात्मतेची ओळख होते. सबा नक्वी या सुप्रसिद्ध पत्रकर्तीने भारतभर फिरून आजवर अज्ञात असलेले सलोख्याचे प्रदेश या पुस्तकाद्वारे सर्वांसमोर आणले आहेत. चहुबाजुंनी धार्मिक कट्टरतेचा रेटा वाढत असताना मानवतेला महत्त्व देणार्‍या अनेक संयुक्त धार्मिक परंपरा सांभाळणार्‍या भारतीयांची ही काहणी आहे.

काय आहे या पुस्तकात? तर पुरीच्या भगवान जगन्नाथाचा मुस्लिम भक्त ‘सालबेग’ याची कहाणी आहे. अयोध्येच्या ‘सुंदरभवन राममंदिराचे’ मुस्लिम व्यवस्थापक ‘अन्सार हुसेन’ यांची कहाणी आहे. पश्‍चिम बंगालमधील ‘सुंदरबन’ परिसरातील ‘बोनबीबीदेवी’ ही काहीशी अज्ञात अशी, मुर्तिपुजा न मानणार्‍या मुस्लिम समाजाची देवी आणि तिचे हिंदु – मुस्लिम भाविक यांची कहाणी आहे. ‘मुहर्रम’ साजरा करणारी आंध्र व तेलंगणातील हिंदु सार्वजनिक मंडळे, सर्वधर्मीयांच्या नवसाला पावणारी तमिळनाडूच्या ‘नागपट्टिनम’ येथील ‘वेलंकणी चर्च’मधील देवी एकाच वास्तुत दर्गा आणि मंदिर असं हिंदु – मुस्लिम धार्मिक परंपरांना सामावुन घेणारं कर्नाटकातील ‘तीनथानी’ येथील देवस्थान ही आणि अशी अनेक उदाहरणं आणि कहाण्या रिपोर्ताज स्वरूपात या पुस्तकात आहेत.

धार्मिक सहिष्णुतेची आणि सहअस्तित्वाची ही उदाहरणे पाहिल्यानंतर आपल्याला भारताचा अभिमान वाटतो. सबा नक्वी यांचे ‘’सलोख्याचे प्रदेश : शोध सहिष्णु भारताचा’’ हे पुस्तक वाचताना प्रकर्षाने लक्षात येणारी गोष्ट म्हणजे ६ डिसेम्बर १९९२ आधीचा भारत आणि ६ डिसेम्बर १९९२ नंतरचा भारत यात असणारा सांस्कृतिक फरक. या घटनेने धर्मनिरपेक्ष सहिष्णु भारताचा पाया उखडला जाण्याची प्रक्रिया सुरु झाली. संमिश्र सांस्कृतिक परंपरा असणारे समाज मुलतत्ववादी विचारांकडे ओढले गेले. सूफी आणि भक्ती परंपरांना आव्हान मिळू लागले. दोन समाजामध्ये एक प्रकारची दरी निर्माण केली. याच वेळी आलेल्या उदारीकरण पर्वाने शहरीकरणाला चालना दिली, समाजात सुबत्ता आली पण या आर्थिक स्वावलंबनाने, तंत्रज्ञान प्रगतिमुळे मोकळा वेळ मिळू लागला व एकमेकांवर अवलंबुन असणार्‍या समाजात द्वेष निर्माण झाला. अनेक ठिकाणी मिश्र हिंदू-मुस्लिम संस्कृती चा असणारा प्रभाव शुद्धिकरणाच्या नावाखाली कमी होऊ लागला. या पुस्तकात अशी कित्येक उदाहरणे आहेत ज्यात धर्माच्या ऐवजी त्या त्या विशिष्ट प्रदेशातील प्रथा, परंपरा, संस्कृती व कृषी-ग्रामीण अर्थव्यवस्था ही जास्त प्रभावी होती. पण आता त्याचा प्रभाव ओसरत चालला आहे. लोकांना आपली धार्मिक ओळख ही जास्त महत्वाची वाटत आहे. बाबरी मशीद-रामजन्मभूमि घटनेचे खुप सुक्ष्म परिणाम झाले आहेत. फाळणी पेक्षाही जास्त नुकसान या घटनेने केले आहे असे माझे मत झाले आहे. दुर्दैवाने या घटनेवर संशोधनात्मक लिखाण फार कमी झाले आहे. आजही फाळणीवर पुस्तके लिहिली जातात पण या गंभीर घटनेवर तसे सोईस्कर मौन पाळले जाते. आनंद पटवर्धन यांच्या ‘राम के नाम’ आणि ‘पिता, पुत्र और धर्मयुद्ध’ या २ डॉक्यूमेंट्री मात्र या प्रश्नांची गुंतागुंत समजावून सांगण्यात यशस्वी ठरल्या आहेत. भारत म्हणजे विरोधभासांचा, एकाच वेळी अनेक विचारधारांचे अस्तित्व मान्य करणारा अन् बरेच गोंधळ सामावून घेणारा देश आहे, कोणतीही गोष्ट इथे पूर्ण सत्य म्हणून पाहता येत नाही. याचा वेध धर्माच्या दृष्टिकोनातून हे पुस्तक घेते. मात्र हिंदुत्ववादी राजकारण उभारीला आल्यानंतर म्हणजे धर्माला राजकीय चष्म्यातुन पाहिले जाऊ लागल्याने झालेल्या नुकसानीचा आणि संभाव्य धोक्याचा इशारा देते.

पुस्तकाचे अजुन एक वैशिष्ट म्हणजे इथल्या धर्मनिरपेक्ष लोकपरंपरांचा घेतलेला वेध लोकसंगीत हे राजस्थानचे अभिन्न अंग आहे. या लोकसंगीताचा मुख्य आधार म्हणजे राजस्थानातील ‘लंगा’ आणि ‘मांगणियार’ हे मुस्लिम कलाकार परंतु ते गाणी गातात मात्र प्रामुख्याने हिंदु देव- देवतांची या समाजांसोबतच स्वतः ला अर्जुनाचे वंशज मानणार्‍या राजस्थानातील मुस्लिम ‘मेओ’ समाजाचेही वर्णन या पुस्तकात आढळले हे वाचून सर्व मुस्लिम समाज एकसंध आहे असे मानणार्‍यांचे डोळे नक्कीच उघडतील.

भाषा आणि जात हे दोन घटक धार्मिक अस्मितांना वरचढ ठरले आहेत. अशी दोन उदाहरणे लेखिकेने पुस्तकात सांगीतली आहेत. भाषेचे उदाहरण देताना पश्‍चिम बंगालमधील समाजाचे निरिक्षण करून लेखिकेने निष्कर्ष काढला आहे. की बंगालमधील धार्मिक तणावाचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे. याचे कारण देताना लेखिकेने तिथे दिर्घ काळ टिकलेल्या कम्युनिस्ट राजवटीसोबतच तिथल्या धर्मापेक्षा बंगाली भाषेच्या आधारावर बेतलेल्या सांस्कृतिक अस्मितेला जबाबदार धरले आहे. जातीचे उदाहरण सांगताना तमिळनाडू आणि केरळच्या दक्षिण भागात असणार्‍या ‘नाडर’ समाजाचे उदाहरण दिले आहे. हा ‘नाडर’ समाज ख्रिश्‍चन आणि हिंदू या दोन्ही धर्मात आढळतो पण एकसंध ‘नाडर’ समाजात धार्मिक भिन्नतेला फारसे स्थान नाही. हिंदू आणि ख्रिश्‍चन नाडर समाजात सर्रास विवाह होतात. एकाच नाडर कुटुंबात हिंदू आणि ख्रिश्‍चन अशा दोन्ही धर्माचे सदस्य असल्याची अनेक उदाहरणे आहेत.
हे पुस्तक अशा अनेक सहिष्णू परंपरांची ओळख करून देते आणि परंपरा जपल्या तरच भारत नावाचा देश टिकेल नाही तर धार्मिक कट्टरतेच्या आगीत होरपळून जाईल याची जाणीवही करून देते.

पुस्तकाचे नाव – सलोख्याचे प्रदेश : शोध सहिष्णू भारताचा
लेखिका – सबा नक्वी
अनुवाद – प्रमोद मुजुमदार
प्रकाशक – समकालीन प्रकाशन पुणे
पानांची संख्या – १८४
किंमत – २०० रुपये

अंनिस व मुस्लिम सत्यशोधक मंडळातर्फे ईदनिमित्त रक्तदान सप्ताह

Eid Special
Eid Special

पुणे | आजच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता सर्व धर्मियांनी धार्मिक सण अधिकाधिक समाजाभिमुख व मानवतावादी करणे हे धर्माकडे अधिक व्यापक दृष्टीने पाहण्याचे लक्षण आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि मुस्लीम सत्यशोधक मंडळ यांच्यातर्फे “बकरी ईद” निमित्त पशूची कुर्बानी देण्याच्या प्रथेला विधायक पर्याय म्हणून दि. २२ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०१८ या कालावधीत “राज्यव्यापी रक्तदान सप्ताह” अभियान राबविला जाणार आहे. धर्माने सांगितलेल्या मानवी मूल्यांमध्ये “त्याग” हे महत्वाचे मूल्य आहे. ईस्लाम धर्मात ही उच्च ध्येय सिध्द करण्यासाठी “कुर्बानी” किंवा सर्वस्वाचा त्याग करण्याची शिकवण आहे. या त्याग आणि बलिदानाचे प्रतीक म्हणून ‘ईद-उल-अजहा’ (बकरी ईद) चा सण इस्लाम धर्मियांमध्ये साजरा केला जातो. या निमित्ताने बकरे अथवा इतर प्राण्यांची कुर्बानी देण्याची प्रथाही पाळली जाते. या प्रथेला पर्याय देण्याचा प्रयत्न यानिमित्ताने होत आहे.

मुस्लीम बांधवासमवेत जाती-धर्मा पलीकडे मानवतेसाठी या राज्यव्यापी रक्तदान अभियानात सहभागी होण्याचं आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रा. शमसुद्दीन तांबोळी व अंनिसचे विविध उपक्रम विभाग कार्यवाह अनिल करवीर,उल्हास ठाकूर यांनी केलं आहे.

———————————————-

पुणे (रक्तदान शिबिर)

बुधवार दि २२ ऑगस्ट २०१८

सकाळी ११ ते दुपारी २, बॅरिस्टर नाथ पै सभागृह, राष्ट्र सेवा दल, साने गुरुजी स्मारक, पर्वती पायथा, पुणे

संपर्क – ९८२२६७९३९१ – शमशुद्दीन तांबोळी

पिंपरी-चिंचवड येथील बांधवांनी कुर्बानी टाळून त्याऐवजी त्यासाठीचे पैसे केरळ पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचे ठरवले आहे.

कोल्हापूर (रक्तदान)

बुधवार दि २२ ऑगस्ट २०१८

दुपारी ३ वाजता स्थळ – जीवनधारा ब्लड बँक, राजारामपुरी ७ वी गल्ली, कोल्हापूर

बुमराहच्या दणक्यांनी इंग्रज घायाळ

cricket
cricket

तिसऱ्या कसोटीत विजयापासून भारत फक्त एक पाऊल दूर

नॉटिंगहम, इंग्लंड| भारत व इंग्लंड दरम्यान सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात सांघिक खेळाचं उत्तम प्रदर्शन घडवत भारतीय संघ विजयाच्या जवळ पोहचला आहे. पहिल्या डावातील १६८ धावांच्या मजबूत आघाडीवर भारताच्या दुसऱ्या डावातील ३५२ धावांनी कळस रचला. विजयासाठी ५२१ धावांच लक्ष घेऊन उतरलेल्या इंग्लंड संघाला सुरुवातीलाच दणके देण्याचं काम ईशांत शर्मा,जसप्रीत बुमराह व मोहम्मद शामी यांनी केलं. ४ बाद ६२ अशा भीषण अवस्थेतून संघाला बाहेर काढण्याच काम जॉस बटलर व बेन स्टोक्स यांनी केलं.

दुसऱ्या डावातील आपला पहिलाच चेंडू खेळणाऱ्या जॉनी बेअरस्टोचा बुमराहने त्रिफळा उडविला तो क्षण

बेन स्टोक्सने ६२ तर जॉस बटलरने १०६ धावांची खेळी करत भारताचा विजय लांबविला. दिवसाच्या दुपारच्या सत्रात हतबल वाटणारी भारतीय गोलंदाजी नवा चेंडू घेतल्यानंतर अधिक बहरली. जसप्रीत बुमराहने अप्रतिम स्पेल टाकत भारताचा विजय दृष्टीक्षेपात आणला. चौथ्या दिवसअखेर इंग्लंड संघाच्या ९ गडी बाद ३११ धावा झाल्या असून पाचव्या दिवशी त्यांना अजून २१० धावांची आवश्यकता आहे. भारतातर्फे हार्दिक पांड्याने पहिल्या डावात तर जसप्रीत बुमराहने दुसऱ्या डावात इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत पाठवण्याची किमया केली आहे. शेवटच्या दिवशी भारत किती लवकर विजय मिळवतो याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

व्हेज खिमा

Maharashtrian food reciepes
Maharashtrian food reciepes

खिमा म्हणलं की नॉनव्हेज मटणाच्या खिम्याचीच आठवण होते परंतु सध्या श्रावण महिना सुरु असल्याने अनेक घरांमध्ये मांसाहार वर्ज असतो म्हणून आम्ही तुमच्या साठी व्हेज खिम्याची रेसिपी घेऊन आलो आहोत.

व्हेज खिम्यासाठी लागणारे साहित्य
१.गाजर, काकडी , फ्लॉवर, कोबी, बटाटा या भाज्या समप्रमाणात
२.टोमॅटो पल्प अर्धी वाटी
३.आले लसूण पेस्ट
४.हिरव्या मिरचीची पेस्ट
५.अर्धा वाटी दही
६.गरम मसाला
७.एक बारीक चिरलेला कांदा
८.चवी नुसार मीठ

कृती

एका कढईत फोडणीसाठी तेल घ्यावे. त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा.कांदा तेलात सोनेरी झाल्या नंतर त्यात आले लसूण पेस्ट घालावी. हिरव्या मिरचीची पेस्ट दोन चमचे घालून नंतर टोमॅटो पल्प, दही आणि गरम मसाला घालावा. गाजर, काकडी, फ्लॉवर, कोबी, फरसबी, बटाटा या भाज्या स्वच्छ धुवून चिरून फोडणीच्या ग्रेव्हीत घालून घ्याव्या चवी नुसार मीठ घालून भाज्या चांगल्या शिजवाव्यात. भाज्या शिजल्या नंतर खिमा पराठे अथवा पुरी सोबत सर्व्ह करावा.

कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने विध्यार्थी भारावले

upsc mpsc guidance
upsc mpsc guidance

पुणे | “ना आयुष्याची शाश्वती, ना कामाचा गौरव” ही थीम असलेला कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा मार्गदर्शनपर कार्यक्रम फर्ग्युसन महाविद्यालयातील ‘कर्तव्य’ – civil services aspirants club व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या तर्फे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास भारतीय पोलीस सेवेतील दोन अधिकारी बोलावण्यात आले होते. प्रसाद अक्कनोरु व ज्योती प्रियासिंग यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

पोलीस अधिकारी प्रसाद अक्कनोरु यांनी स्पर्धा परिक्षेसाठी सुरवात व तयारी कशी करावी, कोणती पुस्तके, कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ह्या गोष्टीवर मोलाचे मार्गदर्शन केले. तर ज्योती प्रिया सिंग यांनी भारतीय सेवेमधील त्यांचे अनुभव व नवीन पिढीसमोरील आव्हाने या वर बोलताना विद्यार्थ्यांना कसे आपण संविधानाचे पालन करत देशाची सेवा करावी व खऱ्या अर्थाने जीवनात समाधानी राहावे व देशाबद्दलची, आपल्या समाजाची तसेच आई वडिलांची जाणीव ठेवून खऱ्या अर्थाने कार्य तत्पर राहावे, याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला फर्ग्युसन महाविदयलायचे प्राचार्य डॉ. रवींद्रसिंह परदेशी यांनी ‘कर्तव्य’टीम ला शुभेच्छा दिल्या. ह्या प्रेरणादायी कार्यकम यांची श्रृंखला अशीच चालू रहावी, त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल दाभाडे याने केले तर सूत्रसंचालन अस्मिता या विद्यार्थीने केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

निनाम गावात बिबट्याची दहशत

satara news
satara news

सातारा | शहरापासून अवघ्या २२ की.मी. अंतरावर असलेल्या निनाम गावात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. गावालगतच्या ऊसाच्या शेतात बिबट्याने तळ ठोकला असून गावकर्‍यांमधे त्याची एकच दहशत पसरली आहे. निनाम-कुसवडे रस्त्यावर लेंडा नावाच्या शिवारात बिबट्याचा वावर असल्याचे गावकरी सांगत आहेत.

आत्ता पर्यंत बिबट्याने गावातील ४ कुत्री आणि दोन शेळ्या फस्त केल्या आहेत. सध्या शेतीचे काम चालू असल्यामुळे गावकर्‍यांना कामात अडथळा येत आहे. चार दोघांना बिबट्या दिसल्याने गावकर्‍यांनी त्यांचा चांगलाच धसका घेतला आहे.

यासंबधी गावकर्यांनी वनविभागाकडे तक्रार केली असून गाव परिसरात वनविभागाकडून दोन वनरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. वनविभाग बिबट्याला पकडण्यासाठी साफळा रचण्याच्या तयारीत आहे.

डाॅ. नरेंन्द्र दाभोळकर खून खटल्यातील आरोपी श्रीकांत पांगारकर ला २८ आॅगस्ट पर्यंत एटीएस कस्टडी

Thumbnail
Thumbnail

मुंबई | डाॅ. नरेंन्द्र दाभोळकर खून खटल्यातील संशयीत आरोपी श्रीकांत पांगारकर याला मुंबई कोर्टाने २८ आॅगस्ट पर्यंत एटीएस कस्टडी सुनावली आहे. रविवारी संध्याकाळी पांगारकर याला एटीएस ने जालना येथून अटक केली होती. पांगारकर हे जालना चे शिवसेनेचे माजी नगरसेवक असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

नालासोपारा येथून वैभव राऊत, शरद कोसळकर, सुधन्वा गोंधलेकर यांना यापूर्वी अटल करण्यात आली होती. नालासोपारा येथील तपासात पांगारकर यांचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले होते. त्यावरुन शनिवारी एटीएस पथकाने पांगारकर याला चौकशीसाठी बोलावून घेतले होते. पांगारकर याचे हिंदूत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याला रविवारी एटीएस ने अटक केली.