बीड | मराठ्यांना आरक्षण मिळावे या कारणासाठी बीड मध्ये एका तरुणाने आत्महत्या केली आहे. अभिजित देशमुख असे मयत तरुणाचे नाव असून त्याचे वय ३५ आहे. विज्ञान शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतलेला हा तरुण असून नोकरी नमिळाल्याने त्रस्त होता. त्याने घराजवळ झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवले. त्याने जीव देताना एक चिठ्ठी लिहली आहे. त्याने मराठ्याना आरक्षण मिळावे म्हणून आपण आपला जीव देत असल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे. दरम्यान या चिठ्ठीची पोलिस चौकशी केली जाईल असे संबंधित तपास अधिकाऱ्याने सांगितले आहे.
मराठा आरक्षणासाठी झालेली ही सातवी आत्महत्या असून सरकारने आरक्षणाच्या प्रक्रियेचा ठोस कार्यक्रम जाहीर करण्याचे निर्देश आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. मराठा आंदोलकांनी आरक्षण प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर करण्याचा २४ तासाचा ऑल्टीमेंटम सरकारला दिला आहे.
मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये एका तरुणाची आत्महत्या
आसाम एनआरसी मुद्यावर संसदेत मंथन, कॉग्रेसने दिली स्थगन प्रस्तावाची नोटीस
नवी दिल्ली | संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज नववा दिवस आहे. कॉग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे आणि अन्य दोन सदस्यांनी आसाम एनआरसी मुद्यावर स्थगन प्रस्तावाच्या नोटिसा दिल्या आहेत. तसेच तृणमूल कॉग्रेसने संसदीय काम काजाच्या नियम २६७ नुसार राज्यसभेत चर्चेची नोटीस दिली आहे. कालच्या दिवशी याच मुद्यावर राज्यसभा दिवस भरासाठी तहकूब करण्यात आली होती.
लोकसभेत प्रश्नउत्तरच्या तासातच सरकारला घेरण्यासाठी विरोधक सज्ज झाले होते. बीएसएफ आणि असाम राइफल्स तुकड्या रोहिंग्यांना सीमेवर अटकाव करण्यासाठी तैनात करण्यात आल्या असल्याचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत सांगितले.
पूर्वोत्तर सीमेकडून रोहिंग्याचे अर्कमन रोखण्यात सरकारने कडक पावले उचलली असून भारतात घुसलेल्या रोहिंग्याना मॅनमारमध्ये परत पसठवण्यासाठी तेथील सरकार बरोबर बोलणी चालू असल्याची माहिती किरण रिजिजू यांनी सदनाला दिली.
गुण वाढले, पण गुणवत्तेचं काय ? – राजेंन्द्र मोहिते
नमस्कार, मी राजेंद्र मोहिते, १२ वी अकाउंटन्सी चे क्लासेस घेतो. तेही ग्रामीण भागात. पोरं प्राज्ञ भाषेत गावंढळ म्हणावी अशीच. पुढच्या वर्षी क्लासचा रौप्यमहोत्सव होईल. माझे विद्यार्थी अनेक उच्च पदांवर काम करताहेत. दोन, तीन सीए आहेत, काही मोठमोठ्या कंपन्यांत आहेत, उद्योगांत वेगवेगळ्या क्षेत्रांत आहेत, देशाच्या सीमेवर आणि सीमेपलीकडेही आहेत. मी पोरांवर (पोरं म्हणजे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी) संस्कार करण्याचा माझ्या वकुबाप्रमाणे प्रयत्न केला, तो थोडाबहुत का होईना, पण यशस्वी झाल्याचं समाधान आज, मला मिळतंय खरं, पण पुढे मिळेल अशी गॅरंटी वाटत नाही.
पूर्वी साधी, फाटक्या फाटक्या पँटांतील मुलांची आणि सध्या सलवार कमीजच्या मुला-मुलींची जागा आता हाफ मॅनेला वुईथ जीन्स (दोघांनीही) घेतलीय. पूर्वी चालत किंवा सायकलवरून येणारी ही पोरं आता गाड्या ‘उडवत’ कलासवर येतात. (पूर्वीच्या शिकवणीची जागा आता क्लासनं घेतलीय म्हणा!) पिशव्यांची जागा आता ‘सॅक’ नी घेतलीय, डबा आता ‘टिफिन’झालाय, भाजी भाकरीच्या जाग्यावर आता नूडल्स आहेत. टाईमपास आठ आण्याच्या फुटण्याऐवजी एअरपॅक्ड कुरकुरे आलेत. पण ९ चा पाढा येत नाही, हेही तितकंच खरं. हातात असलेल्या फोनला ‘अँड्रॉईड पीस’ म्हणायचं हे त्यांना कळतं खरं पण त्या दोन्ही शब्दाचं स्पेल्लिंग नीट लिहिता येत नाही त्याला आपण काय म्हणणार, प्रगती की अधोगती?
मी फार जुन्या काळात जात नाही.पण माझे आई वडील दिडकी, पावकी चा पाढा सहज म्हणून दाखवायचे, अर्थात तो त्यांच्याएवढा मला येत नव्हता नव्हता आणि नाहीही. कारण ‘बीजगणित’ नावाचं भूत आमच्या मानगुटीवर कायम बसलेलं असायचं. (a+b) square = means what? उत्तर पुस्तकातील बघून लिहायचो खरा, पण प्रत्यक्ष व्यवहारात त्याचा उपयोग फक्त ‘डिग्री मिळून नोकरी आणि छोकरी’ साठी होतो, हा शोध खूप उशीरा (!) लागला. तीच गोष्ट भाषेची, संस्कृत बापजन्मात जमलं नाही, पुस्तकातल्या हिंदीपेक्षा सिनेमातली हिंदी जास्त कळायची. आपली वाटायची, अजूनही वाटते. इतिहास आवडायचा खरा पण त्यातल्या सनावळ्या पाठ करता करता गड किल्ले चढण्याइतकी दमछाक व्हायची. त्यातच इंग्रजीचं व्याकरण डोस्क्यावर बसलं पण डोक्यात काही गेलं नाही आणि भूमितीच्या बाबतीत तर वाटोळंच! पण आज बाजारात गेलं की कोणती वस्तू कितीला घ्यायची हे ग्यान माझ्या आईबापाने दिलं. आज हे ‘knowledge’ माझी मुलं त्यांच्या मम्मी पप्पांकडून घेऊ शकतात का?
मूळ प्रश्न असा आहे की ती बाजारात जातात का? ते तर बझारमध्ये जातात! तिथं सगळंच लेबल्ड (आणि या जंजाळात मी पप्पा आणि बायको मम्मी ) कधी झालो हे कळलंच नाही. माझा मुलगा इंग्रजी माध्यमातून शिकतो. मोठ्या दोन्ही मुली मराठी माध्यमातून शिकल्या. तर इंग्लीश मिडीयमचा मुलगा ज्यावेळी ९ वी चा निकाल लागून १० वीत गेला (दोन तीन महिन्यापूर्वीची गोष्ट) त्यावेळी कराडातील कलासवाल्यांचे फोन सुरू झाले.
अशाच एका ‘सरांनी’ मला फोन केला..
क्लासचे सर – अश्वमेध चे पप्पा का?
मी – होय, आपण कोण?
क्लासचे सर – मी xxxx कलासमधून बोलतोय ,xxxx सर
मी – हां बोला.
क्लासचे सर – अहो तुमचा मुलगा खुप छान आहे, तो दहावीत जाणार आहे, नववीला चांगले मार्क्स आहेत. अबाव 90%. त्याला थोडं मार्गदर्शन करायचं होतं.
मी – बरं. काय मार्गदर्शन करायचं आहे ?
क्लासचे सर – आम्ही कौन्सिलिंग घेतो, तुमचा मुलगा पुढे स्टार होईल, आमच्या fees नाममात्र आहेत. एकदा पाठवून तरी बघा.
मी – सर धन्यवाद. फक्त मला एक सांगा तुम्ही बाजारात गेला आणि कोबीचा दर ५ रूपये किलो असेल तर तीन पावशेरचे किती द्याल तुम्ही?
क्लासचे सर – अहो हा काय प्रश्न आहे?
मी – मग सांगा ना?
क्लासचे सर – थांबा. (please wait)… (फोन कट होतो)
आजपर्यंत त्या प्रश्नाचं उत्तर आलेलं नाही.
मग मला प्रकर्षाने प्रश्न पडतो की माझ्या पोरांची किंमत काय? लेबल्ड बझारची की रोकड्या बाजारची?
पोरगं बाजारात जायला पाहिजे…दुनियेच्या ओपन मार्केटमध्ये. तरच त्याला त्याची खरी किंमत (म्हणजे त्यानं स्वतःची लावलेली, त्याला लागलेली आणि लादलेली नव्हे!) कळेल. असं वाटायला लागलं. आणि तेच खरं आहे.
राजेंन्द्र मोहीते
(लेखक कराड तालुक्यामधील रेठरे गावात अकांउंटचे क्लासेस घेतात)
महिलांचा जन्म फक्त लग्नासाठी आणि पुरुषांच्या सुखासाठी नसतो – सर्वोच्च न्यायालय
दिल्ली | दाऊदी बोहरा मुस्लिम समाजातील खतना या प्रथेवर सर्वोच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उभे केले आहे. खतना प्रथेविरोधातील याचिकेवर सुनावणी देताना सर्वोच्च न्यायालयाने ‘महिलांचा जन्म फक्त लग्नासाठी आणि पुरुषांच्या सुखासाठी नसतो’ असे म्हणुन खडे बोल सुनावले आहेत. खतना प्रथेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून सदर प्रथा बंद करण्यात यावी अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.
खतना प्रथेविरोधात बोहरा समाजातील महिला काही बोलण्यास बहुदा तयार होत नाहीत. विषय संवेदनशील आणि नाजूक असल्याने आजवर कोणीही यावर विशेष आवाज उठवला नव्हता. परंतु आता याच समाजातील महिलांनी एकत्र येऊन खतना प्रथेविरोधार आवाज उठवण्यास सुरवात केली आहे. आरिफा जोहरी नावाची एक तरुण पत्रकार याचे नेतृत्व करत असून आपल्या मोहीमेला त्यांनी सहीयो (मैत्रिण) असे नाव दिले आहे.
काय आहे खतना प्रथा ?
मुस्लिम समाजात ज्याप्रमाणे विशिष्ट वयात मुलांच्या गुप्तांगाचा भाग कापला जातो त्याचप्रमाणे दाऊदी बोहरा समाजात विशिष्ट वयात महिलांच्या गुप्तांगाचा भाग कापण्याची प्रथा आहे. या अनिष्ट प्रथेलाच खतना असे म्हटले जाते. साधारण सात – आठ वय झाले की दाऊदी बोहरा समाजात मुलींच्या जननांग कापले जाते. यावेळी त्या महिलांना प्रचंड त्रास होतो. काही वेळा काहीजणी यातून आजारी ही पडतात.
आसामच्या एनआरसी मुद्द्यावर राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब
नवी दिल्ली | आसाम राज्यातील गुसखोरी रोखण्यासाठी स्थापित केलेल्या राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (एनआरसी) या संस्थेचा दुसरा आणि अंतिम मसुदा आज प्रकाशित होणार होता. या मुद्द्यावर कॉग्रेस, सपा, तृणमूल कॉग्रेसच्या सदस्यांनी तुफान गदारोळ केल्याने राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली.
राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना सदन भरण्यापूर्वी काही सदस्य भेटले आणि सदनात आसामच्या एनआरसी मुद्द्यावर चर्चा घडवण्याची आणि सरकारने आपली बाजू मांडण्याची विनंती केली. राज्यसभेचे कामकाज सुरू होताच कॉग्रेस, सपा, तृणमूल कॉग्रेसच्या सदस्यांनी गोंधळ सुरू केला. अध्यक्ष नायडू यांनी सदनात आसामच्या मुद्द्यावर चर्चा व्हावी ही माझी ही इच्छा आहे असे सांगितले तसेच सदनात गृह मंत्री उपस्थित आहेत. मी त्यांना या मुद्द्यावर स्पष्टीकरण द्यायला सांगतो तरी देखील या तीन पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ थांबवला नाही. चार वेळा तहकूबी देऊन सुध्दा गदारोळ न थांबल्याने राज्यसभा २ वाजता दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली.
मेहुल चोकसीच्या मुसक्या अवळण्यासाठी भारत सज्ज
नवी दिल्ली | पंजाब नॅशनल बँक कर्ज घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मेहुल चोकसी सध्या फरार आहे. मेहुल चोकसी सध्या एंटीगुआ देशात आहे. तो एंटीगुआमध्ये असल्याची बातमी मिळताच भारताने त्याला अटक करण्याच्या सूचना तेथील प्रशासनाला दिल्या आहेत.
मेहुल चोकसी हा निरव मोदीचा मामा असून दोघांवर पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्याचा आरोप आहे. हा घोटाळा समोर आल्यापासून दोघेही फरार आहेत. काही दिवसापूर्वी चोकसी कैरिबियाई द्वीप समुहामध्ये असल्याची बातमी भारतीय गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती. त्यानंतर लगेचच चोकसी ने एंटीगुआ देशाचे नागरिकत्व स्वीकारल्याचे वृत्त माध्यमातून झळकले होते. त्याआधीच भारताने त्याच्या अटकेसाठी हालचाली सुरू केल्या होत्या.
चोकसीने स्वतः आपण एंटीगुआचे नागरिक बनल्याचे जवळच्या व्यक्तींना सूचित केले होते. चोकसी एंटीगुआचा नागरिक बनून १३०देशात आपला व्यापार वाढवू इच्छित आहे. तसेच या १३० देशाशी एंटीगुआचे सलोख्याचे संबंध असल्याने तो या १३० देशात मुक्त पर्यटन करू इच्छित आहे. परंतु भारताने चोकसीचे जल स्थळ आणि वायू मार्ग रोखून त्याला अटक करण्याची सूचना एंटीगुआ प्रशासनाला दिली आहे.
त्या काळीज हेलावणाऱ्या घटनेला ४ वर्ष पूर्ण
पुणे | माळीण दुर्घटनेला आज ४ वर्षे पूर्ण झाली.३० जुलै २०१४ ची रात्र माळीणवासियांसाठी काळी रात्र ठरली होती. संपूर्ण गाव भूस्खलनच्या ढीगाऱ्याखाली येऊन शेकडो लोकांचा बळी गेला होता. काहींचे पुनर्वसन झाले तर कोणाच नाही. गावातील बरेचसे प्रश्न आजही दुर्लक्षित आहेत. आज माळीणवासियांच्या मनात त्या घटना ताज्या आहेत.
माळीण मध्ये मृताचे स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी पंचक्रोशीतील लोक आजच्या दिवशी माळीण मध्ये एकत्र जमतात.
बाळासाहेब सावंत दापोली कृषी विद्यापीठात शोकसभा
दापोली : आंबेनळी अपघातग्रस्तांना आज दापोली कृषी विद्यापीठाने श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभा घेतली. आपल्या सहकाऱ्यांना श्रद्धांजली वाहताना अनेकांना अश्रु अनावर झाले. शोकसभेतून सहकाऱ्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. तसेच काळजावर दगड ठेऊन विद्यापीठाच्या कामकाजाला सुरुवात करत असल्याचे कर्मचारी वर्गाकडून सांगण्यात आले.
२८ जुलै रोजी दुपारी बाराच्या सुमारास आंबेनळी घाटात मिनी बसचा अपघात झाला होता त्यात ३० व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला होता तर एका व्यक्तीने गाडी तून उडी घेतल्याने तो बचावला होता.एकाच वेळी ३० व्यक्ती ठार झाल्याने दापोली शहरावर शोककळा पसरली होती.
मराठा आरक्षणाचा अजुन एक बळी; रेल्वेखाली केली आत्महत्या
औरंगाबाद | मराठा आरक्षणासाठी अजुन एका युवकाने रेल्वेखाली आत्महत्या केली आहे. प्रमोद होरे पाटील अस या युवकाच नाव आहे. मध्यरात्री २:३० वाजता प्रमोदने फेसबुकवर आत्महत्येची पोस्ट लिहून पहाटे ४ च्या दरम्यान मुकुंदवाडी रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याच उघड़ झाले आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात प्रमोदचा सक्रिय सहभाग होता. प्रमोद च्या आत्महत्येने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. तसेच आंदोलनाला तीव्रता आली आहे.
आंदोलकांनी संयम बाळगावा आरक्षणासाठी आत्महत्या करणे इतर समाज बांधवांना दुःख देणारे आहे म्हणून या मार्गाचा अवलंब करू नका असे आवाहन परवा दिवशी छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले होते. तरीही आत्महत्येचे प्रकार थांबत नाहीत एकंदरीत आरक्षणाचा प्रश्न अधिकच गंभीर होत चालला आहे.
मराठा समाजाची आज महाराष्ट्र बंदची हाक
पुणे | मराठा आरक्षणासाठी गेल्या दहा दिवसांपासून महाराष्ट्रभर ठिकठिकाणी आंदोलन सुरु असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २८ तारखेला झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत मागासवर्गीय अहवाल महिन्याभरात येईल अस म्हटले होते. मात्र तरीही अहवाल येईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.
सकल मराठा समाजाच्या वतीने आज महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आली आहे. यामधे प्रामुख्याने सोलापुर , नांदेड, नाशिक आदी जिल्ह्यांचा विशेष सहभाग आहे. ठिकठिकाणी कार्यकर्ते महामार्ग अडवून व टायर जाळून निषेध व्यक्त करत आहेत. मराठा आरक्षणाच्या मागण्यासहित आंदोलकांच्या वरचे गुन्हे मागे घेण्याची मागणी जोर धरत आहे.