नवी दिल्ली | केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीत वाढ करण्यात आली आहे. आधी मिळणाऱ्या ६ हजार रुपयांवरुन ही शिष्यवृत्ती आता १२ हजार रुपये इतकी झाली आहे. केंद्र शासनाच्या मानव संसाधन मंत्रालयतर्फे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी ही योजना २००८ पासून राबविण्यात येते. त्याअंतर्गत ही शिष्यवृत्ती देण्यात येते. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी मिळणाऱ्या शिष्यवृत्ती मध्ये वाढ केल्याने याचा फायदा हा आर्थिक रित्या दुर्बल असणाऱ्या घटकातील शिकणाऱ्या व पुढे शिकण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना होणार आहे.
ज्युनिअर NTR च्या वडिलांचा भीषण अपघातात मृत्यू
नालगोंडा | दाक्षिणात्य चित्रपट सुपरस्टार ज्युनिअर NTR च्या वडिलांचा सकाळी झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. नेल्लोरवरुन हैदराबादला जाताना ही घटना घडली. नंदमुरी हरिकृष्ण हे आपल्या टोयोटा फॉर्च्युनर गाडीतून प्रवास करत होते. ओव्हरटेक करताना दुभाजकाला गाडी धडकल्याने अपघात झाला व गाडी पलटी होऊन हरिकृष्ण त्यातून बाहेर फेकले गेले. अपघातावेळी गाडीचा वेग तब्बल १५० किलोमीटर प्रतितास असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान या घटनेमुळे दाक्षिणात्य व भारतीय चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. नंदमुरी हरिकृष्णहे तेलगू देसम पार्टीचे आघाडीचे नेतेही होते.
राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त आज देशभर उत्साह
क्रीडानगरी | सुरज शेंडगे
राष्ट्रीय क्रीडा दिन हा भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून आपण साजरा करीत आहोत. भारताची क्रीडा संस्कृती वाढावी, त्यास प्रोत्साहन मिळावे तसेच देशाच्या कानाकोपऱ्यात खेळाची जागरुकता निर्माण व्हावी यासाठी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. या वर्षीच्या क्रीडादिनी आशियाई स्पर्धा चालू असून त्यात आपला देश चांगली कामगिरी करत असून आतापर्यंत ०९ सुवर्ण,१९ रौप्य व २२ ब्रॉन्झ एवढी पदके खेळाडूंनी पदरात पाडली आहेत.
मेजर ध्यानचंद सिंग यांच्याविषयी थोडक्यात माहिती – त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे २९ आॅगस्ट १९०५ रोजी झाला. ते भारतीय हॉकीचे नावाजलेले खेळाडू होते. त्यांचे मोठे भाऊ रूपसिंग हे सुद्धा हॉकीचे खेळाडू होते. ध्यानचंद यांचे वडिल सामेश्वर दत्त सिंग हे ब्रिटीश सैन्यात होते. ते सुध्दा सैन्यात हाॅकी खेळायचे. अशाप्रकारे ध्यानचंद यांना हॉकीचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाले. गोल करण्यातील त्यांच्या चपळाईमुळे त्यांना हाॅकीचे जादूगार म्हणून संबोधले जायचे. त्यांनी भारताला १९२८, १९३२ व १९३६ च्या आॅलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवून दिले.
ध्यानचंद यांनी आपला शेवटचा आंतराष्ट्रीय सामना १९४८ साली खेळला. त्यांनी आपल्या आंतराष्ट्रीय काराकीर्दीत ४०० पेक्षा अधिक गोल केले. मेजर ध्यानचंद यांना १९५६ मध्ये भारताचा प्रतिष्ठित नागरी सन्मान पद्मभूषण देऊन सम्मानित करण्यात आले. त्यांचा जन्मदिवस हा भारताचा राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून घोषित केला आहे. याच दिवशी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करणाऱ्या खेळाडुंना अर्जुन आणि द्रोणाचार्य हे राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. भारतीय ऑलिम्पिक संघाने ध्यानचंद यांना शताब्दी खेळाडू नावाने सन्मानित केले होते.
दिग्विजय – नेपोलियन बोनापार्ट
ज्या माणसाच्या शब्दकोषात “अशक्य” नावाचा शब्दच नाही.असा दूर्दम्य इच्छाशक्ती असणारा माणूस म्हणून नेपोलियन बोनापार्टकडे पाहिलं जातं!!
आज आपण जगभर ज्या फ्रेंच राज्यक्रांतीचे दाखले देत असतो. त्या राज्यक्रांतीने राजेशाही नष्ट झाली आणि लोकशाही मूल्ये रुजली. खरं तर ही राज्यक्रांती फसली आणि या फसलेल्या राज्यक्रांतीमुळेच नेपोलियनला बळ मिळाले. एक दिवस त्याने फ्रान्सच्या गादीवर बसून स्वतः चा राज्याभिषेक केला.
नेपोलियनच्या बाबतीत आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो जन्माने फ्रेंच नव्हता. फ्रान्सच्या अंकित असणाऱ्या दक्षिणेतील कॉर्सिका बेटावरचा त्याचा जन्म. याच नेपोलियनच्या वडीलांनी आणि कॉर्सिकावासीयांनी फ्रेंचांच्या सत्तेविरोधात लढा दिला.त्याच कॉर्सिकाचा युवक एक दिवस बलाढ्य अशा फ्रान्सच्याच गादीवर बसला.
उंचीने बुटका,ज्याला घोड्यावर नीट मांड टाकता येत नाही, ज्याचा बंदूकीचा निशाणा अचूक नाही मात्र त्याची सैन्यवर भक्कम मांड आहे. त्याचा घोडा ऐन लढाईत सर्वांच्या पुढे असतो अशा नेपोलियनचे सैनिक आपल्या सेनापतीसाठी सूदूर रशियाची मोहीम असो वा इजिप्त,इटलीची मोहीम असो जीवावर उदार होऊन लढत असत.
नेपोलियनच्या वैयक्तिक महत्वकांक्षा प्रचंड असल्या तरी त्याने जनतेसाठी मोठे रस्ते,बागा,अनेक शैक्षणिक संस्था उभारणे अशी लोकोपयोगी कामे केलीच त्याचबरोबर अमिर उमरावांचे वर्चस्व कमी केले.
अशा नेपोलियनचं वैयक्तिक आयुष्यमात्र एका अर्थाने दुःखद होतं. पहिल्या प्रेयसीसाठी त्याने केलेला देशत्याग एकीकडे आणि सत्तेच्या जवळ जाण्यसाठी एका विधवा उमराव स्त्रीशी केलेला विवाह एकीकडे. ज्या नेपोलियनने फ्रान्सला महासत्ता बनवून जगात उभं केलं त्याच नेपोलियनच्या सख्या बहिणीने सत्तेसाठी त्याचा केलेला विश्वासघात एकीकडे. अशा प्रकारे निष्ठा,पराक्रम,महत्वकांक्षा फितुरी,विश्वासघात,प्रेम,विरह अशा रोमांचक गोष्टीने भरलेलं आयुष्य आणि अतिमहत्वकांक्षे पोटी आयुष्याची अखेरची वर्षे इंग्रजांच्या कैदेत सेंट हेलेना बेटावर काढताना खचितस त्याला अशक्य नावाचा शब्द शिवला असेल. त्याच्या मृत्यूनंतर 19 वर्षांनी त्याचं शव फ्रान्सला नेईपर्यंत त्यांच्या कबरीची देखभाल करणाऱ्या एका सैनिकाची निष्ठा उदारहरणा दाखल दिली जाते की त्याच्या सैन्यचा त्याच्यावर किती जीव होता.अशा नेपोलियन बद्दल तो साधा जनरल असताना बोलले जाई कि लवकरच त्याला संपूर्ण सैन्याचा ताबा द्यायला हवा. नाही तर तो स्वतः आपल्या हाताने तो घेईल. अशा महत्वाकांक्षी फ्रेंच नायकाच्या युध्द मोहीमा आशाच अशक्य ,अतर्क्य कोटीतल्या होत्या. त्याच्या लढाईतील सैन्य डावपेचांचा अभ्यास आजही जगभरातील सैनिकी शिक्षण संस्थामधे केला जातो.अशा नायकावर मराठीत लिहलेली ही कादंबरी त्याच्या कर्तृत्वाला न्याय देणारीच! तसेच अतिशय छान गुंतून जावे अशा शैलीत लिहली आहे.
पुस्तक परिचय – प्रणव पाटील
पुस्तकाचे नाव – दिग्विजय
लेखक – भा.द.खेर, राजेन्द्र खेर
मेहता प्रकाशन
किंमत – ४५०/- रुपये फक्त
वकील व मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या अटक सत्राने खळबळ
लोकशाहीची वाटचाल अधिकारी हुकूमशाहीकडे? – विचारवंतांचा संतप्त सवाल
विशेष प्रतिनिधी | केंद्र सरकारतर्फे सरकारविरोधात बोलणाऱ्या, समाजातील दुभंगलेल्या घटकांसाठी काम करणाऱ्या समाजसेवक, वकील व कृतिशील कार्यकर्त्यांच्या धरपकडीचे सत्र सुरु झाले आहे.
समाजात दहशतीचं वातावरण बनवून ठेवण्यासाठी तसेच गट पाडण्यासाठी या प्रकारच्या कृतींचा आधार भाजप सरकारने घेतला आहे. काही माध्यमसमूह जे सरकारच्या जवळ आहेत, त्यांनीसुद्धा ठराविक घटकांना (मानवाधिकार कार्यकर्ते, नक्षली) लक्ष्य करुन त्यांचा देशाला धोका असल्याचं चित्र उभं केलं आहे. महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारितील पुणे पोलिसांतर्फे ही कारवाई केली जात असून सुधा भारद्वाज, गौतम नवलखा, अरुण परेरा, अनु भारद्वाज यांना अटक केल्याचं वृत्त समोर आलं आहे. झालेल्या प्रकाराबाबत आवाज उठवताना स्वामी अग्निवेश, तिस्ता सेटलवाड, शेहला रशिद, हरीश अय्यर, मोहित पांडे, नकुल सिंग सव्हाणी, नेहा दीक्षित यांनी एका पत्रावर सही करुन झालेली अटक ही राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं म्हटलं आहे. आनंद तेलतुंबडे यांच्याही घरावर छापा मारण्यात आला असून वर्षाच्या सुरवातीलाच झालेल्या कोरेगाव-भीमा दंगल प्रकरणाची ही कारवाई असल्याचं बोललं जातं आहे. ३१ डिसेंबरच्या २०१७ रोजी एल्गार परिषदेच्या माध्यमातून वातावरण बिघडवल्याचा आरोप या सर्वांवर केला जात आहे. तसेच राजीव गांधींप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट केला जात असल्याचं बोललं जात आहे.
नामवंत वकील आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांना अशा प्रकारे विनासुचना अटक करणं हे लोकशाहीला मारक असल्याचं मत रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केलं. आदिवासी हक्कांसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांना व पत्रकारांना अटक करुन इथल्या जमिनी भांडवलदार वर्गाच्या घशात घालण्याचा कुटील डाव सरकार खेळत असल्याचा आरोपही गुहा यांनी केला. आनंद तेलतुंबडे यांच्यासारख्या बुद्धिजीवी व्यक्तीच्या घरी छापे टाकून सामान्य लोकांमध्ये शहरी नक्षली नावाची भीती निर्माण करणं सुरू असल्याचंही ते म्हणाले.
वस्त्रोद्योग धोरणानुसार राज्यातील कापूस उत्पादक तालुके घोषित
मुंबई | आज वस्त्रोद्योग धोरण २०१८-२०२३ नुसार राज्यातील काही कापूस उत्पादक तालुके घोषित करण्यात आले आहेत. एखाद्या तालुक्यातील सहकारी सुतगिरणी स्थापन करण्यासाठी वार्षिक किमान ४८०० टन कापूस उत्पादन असणे आवश्यक असते.
या बाबीचा विचार करता भविष्यात यापुढे स्थापन होणारी सहकारी सुतगिरणी सक्षमपणे चालण्यासाठी ज्या तालुक्यात वार्षिक किमान ९६०० टन कापूस उत्पादन होत आहे, असेच तालुके यापुढे , “कापूस उत्पादन तालुके” म्हणून घोषित करण्यात येत आहेत. यासाठी १८ जिल्ह्यातील ११५ तालुक्यांची यामध्ये घोषणा करण्यात आली आहे.


नगर वाचनालायतर्फे सांगलीत गीत गायन स्पर्धा
सांगली | सांगली जिल्हा नगर वाचनालयाच्या वतीने मराठी गीत गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा महिला व पुरुष या गटात होतील. वय वर्षे २० पूर्ण असणा-या स्पर्धकांस यामध्ये भाग घेता येईल. स्पर्धेचं स्वरुप मराठी भाषेतून असेल.
स्पर्धक गाण्याच्या मागील संगीत वापरुन गाऊ शकतात. स्पर्धेसाठी प्रवेश फी २५ रुपये असून यासाठीची नावनोंदणी नगरवाचनालयात किंवा फोनवरुनही करू शकता. नावनोंदणीची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट आहे. स्पर्धा शनिवार १ सप्टेंबर २०१८ रोजी असून स्पर्धकांनी दुपारी २.१५ पर्यंत उपस्थित राहायचे आहे. अधिकाधिक नागरिकांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन वाचनालायतर्फे करण्यात आले आहे.
स्थानिकांसाठी संपर्क –
‘पाटणकर स्नॅक्स पॉईंट’, अश्विनी हाईट्स, महाबळ भवन समोर, सांगली.
संपर्क क्रमांक – ९०२८८१७४००
सिंधूची रुपेरी तर मनजितसिंगची सोनेरी कामगिरी
जकार्ता | आशियाई स्पर्धेच्या १० व्या दिवशी भारताने दिमाखदार कामगिरी केली. तिरंदाजीमध्ये महिला व पुरुषांच्या संघाने रौप्यपदकाची कमाई केली. टेबल टेनिसमध्ये भारताने पहिल्यांदाच पदकाची कमाई केली. जपानकडून पराभव झाल्याने भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. अॅथलेटिक्स मध्ये ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत मनजितसिंग याने सुवर्णपदकाची कमाई केली तर याच स्पर्धेत जिन्सन जॉन्सन याने रौप्यपदक मिळवले.
हॉकीमध्येही भारताने श्रीलंकेचा २०-० ने दारुण पराभव करत पुढील फेरीत धडक मारली. अॅथलेटिक्स मध्येच सुरुवात चुकीची झाल्याने हिमा दासला स्पर्धेबाहेर पडावे लागले. द्युती चंदने मात्र २०० मीटर स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला. पी.व्ही.सिंधू बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभूत झाल्याने आणखी एका सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले. यावर्षी झालेल्या पाचही स्पर्धांच्या अंतिम सामन्यात सिंधूला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तरीही तिने मिळवलेले यश हे प्रत्येक भारतीयाला प्रेरणादायी असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही व्यक्त केली. आजच्या दिवसात भारताने १ सुवर्ण, ४ रौप्य व १ कांस्यपदकाची कमाई केली.
तेज अप्लिकेशन आजपासून ‘गूगल – पे’ नावाने ओळखले जाणार
तंत्रज्ञानविश्व | डिजीटल इंडियासाठी गूगलने विकसित केलेल्या ‘Tez’ या अँप्लिकेशनचे लोकप्रिय नाव आजपासून G-Pay असे असणार आहे. यातील इतर फंक्शनमध्ये कुठल्याही स्वरुपातील बदल करण्यात आलेले नसून सद्यस्थितीत फक्त नावामध्ये बदल केलेला आहे. पैशांची देवाणघेवाण, वेगवेगळ्या प्रकारचे रिचार्ज आणि इतर आर्थिक उलाढालींसाठी अत्यंत उपयुक्त असे हे अँप आहे.
वनाज ते सिविल कोर्ट पुणे मेट्रोचे काम प्रगतीपथावर
पुणे | पुणे मेट्रोच्या मार्गिका २ वनाज ते सिविल कोर्टचे काम प्रगती पथावर असून आनंद नगर येथे लाँचिंग गर्डरची उभारणी अखेरच्या टप्प्यात आहे. यासाठीच्या खांबांची पायाभरणी मोरे विद्यालय पर्यंत पोहचली आहे.
तर कृष्णा हॉस्पिटल जवळील खांबांवर कॅप घातले जात आहेत. सध्या ह्या भागातील कामे प्रगती पथावर असून वाहन चालवतांना कृपया प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत.










