Tuesday, December 9, 2025
Home Blog Page 6717

क्रिकेट स्टेडियमवरील सर्वात मोठा सोलर प्लांट ब्रेबॉर्न वर

breborn
breborn

मुंबई | जागतिक तापमानवाढीशी सामना करताना महत्वाच्या मानल्या गेलेल्या सौरऊर्जेच्या वापराबाबत लोक अधिक जागरूक होऊ लागले आहेत. महाराष्ट्र सरकारनेही यात पुढाकार घेऊन ब्रेबॉर्न स्टेडियमवर उभारल्या गेलेल्या सोलर प्लांटचे अनावरण सोमवारी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्लांटचे अनावरण करण्यात आले.

जगात असणाऱ्या सर्व क्रिकेट स्टेडियममधील हा सर्वात मोठा प्लांट आहे. याठिकाणी २२८० सोलर पॅनेल बसविण्यात आले असून याद्वारे ८२० किलोवॅट म्हणजेच तब्बल ११.५ लाख युनिट वीज दरवर्षी तयार करण्यात येणार आहे. वातावरणातील जवळपास ८२५ टन कार्बनचे प्रमाण यामुळे कमी होणार असून याचा मोठा फायदा जागतिक तापमानवाढीशी लढताना होणार असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

‘डीएमके’ मध्ये ‘स्टॅलिन’राज

stalin
stalin

चेन्नई | द्रविड मुनेत्र कळघमच्या अध्यक्षपदी एम के स्टॅलिन यांची निवड झाली आहे. एम करुणानिधी यांच्या मृत्यूनंतर रिकाम्या झालेल्या या जागेसाठी आज पक्षाची साधारण बैठक घेण्यात आली होती. त्यात हा निर्णय घेण्यात आला. स्टॅलिन हे पक्षाचे केवळ दुसरेच अध्यक्ष आहेत. याआधी करुणानिधी यांनी ४९ वर्ष अध्यक्ष म्हणून काम पाहिलं. मागील वर्षी स्टॅलिन यांची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी निवड झाली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर जयललिता आणि करुणानिधी यांच्या अनुपस्थितीत दोन्ही पक्ष कशी वाटचाल करतात हे पाहणं औत्सुक्याच ठरेल.

वीज वितरण कंपनीच्या उलट्या बोंबा

electricity
electricity

मुंबई | राज्यातील वीज वापराबाबत गळती आणि चोरीच्या प्रकरणाला आळा घालण्याऐवजी महावितरणने वीज नियामक मंडळाकडे वीजदरवाढीसाठी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर ३१ ऑगस्ट पर्यंत निकाल लागणे अपेक्षित असून निकाल लागला नाही तरी १५ सप्टेंबरपासून किमान ५ ते १०% वीजदरवाढ होण्याची शक्यता आहे. महावितरणाची ३० हजार ८४२ कोटी रुपयांची तूट भरुन काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. २०१५-१६ सालीच ५ वर्षांसाठी हा प्रस्ताव महावितरणने सादर केला होता. त्यावर काही निर्णय न झाल्याने जुलै महिन्यात पुन्हा फेरयाचिका दाखल करण्यात आली होती.

प्रामाणिक अधिकाऱ्यांशी भाजपचा ३६ चा आकडा

tukaram mundhe
tukaram mundhe

तुकाराम मुंढे यांच्यावर अविश्वास ठराव

नाशिक | महापालिकेत शिस्तीचे वातावरण, विकासकामांसाठी त्रिसूत्री रचना राबविण्यात पुढाकार घेणाऱ्या तुकाराम मुंढे यांच्या विरोधात भाजपने अविश्वास ठराव दाखल केला आहे. शिवसेनेची मालमत्ता करावरील सूट देण्याची अट मान्य झाल्यास ते तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ काम करतील. १ सप्टेंबर रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याबाबत निर्णय घेण्यात येईल. नेहमीप्रमाणे स्थानिक नागरिकांनीही प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची तयारी दाखवली आहे. नवी मुंबईत भाजप वगळता सर्व पक्षांनी मुंढेंविरोधातअविश्वास ठराव आणला होता. लोकाभिमुख कार्य करण्यात आघाडीवर असलेल्या मुंढेना हटविण्याचा प्रयत्न केल्यास सर्व राजकीय पक्षांविरोधात एकत्र येण्याचा ईशारा ग्राहक पंचायतीचे प्रमुख विलास देवळे यांनी दिला. शहर विकासासाठी मुंढेंसारख्या प्रशासकाची गरज असल्याचं मत सिडकोच्या संचालिका डॉ सरिता औरंगाबादकर यांनी व्यक्त केलं.

पालिका प्रशासनातील अनावश्यक खर्चाला मुंढेंनी चाप लावला आहे, त्यामुळे कामकाजात सुसूत्रता येऊन सकारात्मक बदलही दिसून आले आहेत. त्यामुळे त्यांची गरज आहे असं मत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमेर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी व्यक्त केलं.

रोटरी क्लब ऑफ़ हेरिटेज नॉन गॅस कुकिंग स्पर्धेच आयोजन

cooking
cooking

पुणे | घरात आईच्या स्वंयपाककामात मदत करणाऱ्या मुला-मुलींची नेहमी लगबग सुरु असते. त्यांनाही शेफची आवड़ निर्माण व्हावी म्हणून स्वतंत्र कुकिंग स्पर्धेच आयोजन रोटरी क्लबने केलं आहे. लिटल मास्टर शेफ या नावाने घेतली जाणारी ही स्पर्धा ८ ते १४ वयोगटातील लहान मुलांसाठी ही स्पर्धा आहे. नॉन गॅस कुकिंग म्हणजे गॅस न वापरता करता येणाऱ्या पदार्थाची स्पर्धा २ गटात होणार असल्याची माहिती रोटरी हेरिटेजचे अध्यक्ष मोहन चौबळ, सचिव हर्षद बावनकर, दीपा बारटक्के यांनी दिली. या स्पर्धेसाठी आतापर्यंत विविध शाळामधील ८० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून मुंबईतील प्रसिद्ध शेफ तुषार प्रीती देशमुख या स्पर्धेचे विजेते निवडणार आहेत. ही स्पर्धा आम्ही प्रथमच आयोजित करत आहोत.
या स्पर्धेच आयोजन दिनांक १ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते ५ यावेळेत करण्यात आले आहे. नाव नोंदणी सुरु असुन नोंदणीसाठी ९५५२५४४९६८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. तसेच या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रति विद्यार्थी २०० रूपये शुल्क आकारण्यात येणार असल्याची माहितीही संयोजकांनी दिली.

आशियाई स्पर्धा – भारतासाठी संमिश्र दिवस

neeraj chopra
neeraj chopra

सिंधू अंतिम फेरीत, नीरज चोप्राला भालाफेकीत सुवर्ण

जकार्ता | आशियाई स्पर्धेचा नववा दिवस भारतासाठी संमिश्र राहिला. कांस्यपदक, रौप्यपदक आणि सुवर्णपदक मिळविण्यात भारतीय खेळाडू यशस्वी ठरले. नीरज चोप्रा याने भालाफेकीत ८८.०६ मीटर फेक घेत सुवर्णपदक पटकावले. ही फेक घेत त्याने स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. १९८२ साली गुरतेज सिंग याने जिंकलेल्या कांस्यपदकानंतर भालाफेकीत भारताचे हे पहिलेच पदक ठरले.

महिलांच्या ३००० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत सुधा सिंग हिने कांस्यपदक पटकावले. धरून अय्यासामी याने पुरुषांच्या ४०० मीटर हर्डल क्रीडाप्रकारात कांस्यपदक पटकावले. जपानच्या जागतिक क्रमवारीत २ नंबरला असणाऱ्या अकाने यामागुचीवर उपांत्य फेरीत विजय मिळवत पी.व्ही.सिंधू हिने अंतिम फेरीत धडक मारली. दुसरीकडे उपांत्य फेरीत पराभूत झाल्याने भारताच्या साईना नेहवालला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. तिला तैवानच्या ताई तझु यिंगने पराभवाचा धक्का दिला.

पी.व्ही.सिंधू बॅडमिंटनच्या अंतिम फेरीत

महिलांच्या लांब उडी स्पर्धेत नीना वरकिलने उत्तम कामगिरीसह रौप्यपदक मिळवले. नवव्या दिवसखेर भारताची पदकसंख्या ४१ झाली असून टेबल टेनिस, बॅडमिंटन, अॅथलेटिक्स या क्रीडाप्रकारातून आणखी पदके अपेक्षित आहेत.

राज्यातील काही जिल्ह्यांना अतिरिक्त निधी

agri
agri

मुंबई | आरोग्य, पोषण आहार, शिक्षण, कृषि, जलसंधारण, आर्थिक समावेशन, कौशल्य विकास आणि मूळ पायाभूत सुविधा या क्षेत्रातील विविध विकासांच्या कामासाठी नंदूरबार, गडचिरोली, वाशिम आणि उस्मानाबाद या चार जिल्ह्यांना मुख्यमंत्री यांनी १२१ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी आज जाहिर केला.

या चार आकांक्षित जिल्ह्यांमधील विकास कामांच्या प्रगतीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. या बैठकीला राज्यमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव दिनेशकुमार जैन व इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता.

क्रिकेटच्या पहिल्या देवाचा वाढदिवस – भाग २

Don Bradman
Don Bradman

एकंदरीत आढावा घेतला असता डॉनच्या कसोटी कारकिर्दीची सुरवात तितकी चांगली झाली नव्हती. पहिल्या कसोटीत दोन्ही डावात मिळून १९ धावा केल्यामुळे दुसऱ्या कसोटीत त्याला डच्चू देण्यात आला होता. तिसऱ्या कसोटीत मात्र एक खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यामुळे डॉनला संधी मिळाली आणि याच संधीचे त्याने सोने केले. या कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने शतक केले अन हे त्याचे सर्वात कमी वयातील शतक होते. या मालिकेत ऑस्ट्रेलिया सपाटून मार खात होती, पण डॉन त्याची खेळी सुधारतच निघाला होता. ठराविक कालावधीने संघाचे कर्णधारपदही त्याच्याकडे आले. कर्णधारपदानंतरच्या काही सामन्यात त्याचा खेळ अपेक्षेप्रमाणे होत नव्हता. त्यावेळत्याने कर्णधारपद सोडावं, अशाही सूचना देण्यात आल्या. पण नेहमीप्रमाणे शांत राहत त्याने यावरही मार्ग काढला. भारताविरुद्ध त्याने खेळलेल्या ५ सामन्यांत ७१५ धावा काढल्या. आणि याच दौऱ्यात प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आपल्या शतकांच शतकही पूर्ण केलं. एखाद्या ब्रिटिश खेळाडूंव्यतिरिक्त असं करणारा तो पहिलाच फलंदाज होता. उसळत्या चेंडूंचा सामना करण्यासाठी त्याने खास लांब दांडा असलेल्या उंची बॅट बनवून घेतल्या होत्या. निवृत्तीपर्यंत त्याच्या नावावर तब्बल २ डझन विश्वविक्रमांची नोंद झाली होती. ज्यातील बरेच अजून अबाधित असून, जे मोडले गेले त्यालाही बराच कालावधी जावा लागला.

bradman
bradman

इंग्लंड संघाविरुद्ध त्याने सर्वाधिक ५०२८ धावा काढल्या. कोणत्याही एका संघाविरुद्ध इतक्या धावा करणं अजूनही कुणाला शक्य झालं नाही. १९३८ हे साल त्याच्यासाठी सर्वाधिक सातत्याच ठरलं. याशिवाय १९३९-४० लाही डॉनने धावांचा रतीब घातला. दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंड संघाचा पराभव डॉन ब्रॅडमनच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने केला आणि द इनव्हिन्सीबल अशी आपली ओळख निर्माण केली. १९४० ला रॉयल ऑस्ट्रेलियन एअर फोर्सलाही तो रुजु झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान त्यांना कामाच्या विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या. त्यावेळी त्याची नेमणूक व्हिक्टोरिया प्रांतातील एका सैनिकी शाळेत शारीरिक शिक्षण देण्यासाठी झाली. पुढे १९४५ साली झालेल्या दुखपतीत त्याच्या एका बोटाची संवेदना कमी झाली त्यामुळे तेथील कामावरही परिणाम झाला. तरीही त्याच्या खेळावरील प्रेमापोटी आणि कामातील निष्ठेमुळे ऑस्ट्रेलियन नियामक मंडळाने त्याचा करार सुरू ठेवला. पुढे १९४८ साली इंग्लंडविरुद्धच शेवटची कसोटी खेळून तो निवृत्त झाला.

images
bradman

एकूण खेळविश्वाचा आढावा घेतला असता, सर्व क्रीडा प्रकारांत उठावदर्शक असं काम डोनाल्ड ब्रॅडमन याने केलं होतं. त्याची फलंदाजीतील ९९.९४ ही सरासरी केवळ अशक्यप्राय गोष्ट मानली जाते. १९४८ सालीच ब्रिटिश जनतेत विन्स्टन चर्चिल इतकी लोकप्रियता मिळवणारा तो पहिला परदेशी व्यक्ती होता. इतर लोकप्रिय खेळाडूंच्या स्टँडर्ड डेव्हिएशनशी तुलना केली असता डॉन हा ब्राझीलच्या फुटबॉलपटू पेलेंपेक्षा कितीतरी आघाडीवर होता. त्याच्या आयुष्यतील पुढच्या प्रवासात त्याने प्रशासक म्हणून उत्तम भूमिका बजावली. सचिन तेंडुलकर व शेन वॉर्न हे त्याचे आवडते खेळाडू राहिले. २००० साली न्यूमोनिया झाल्याने त्याची तब्येत खालवली आणि यातच फेब्रुवारी २००१ साली त्याचं निधन झालं. १९९६ साली ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या हॉल ऑफ फेममध्ये, २००० साली शतकातील सर्वोत्तम विस्डेन खेळाडू आणि २००९ साली आयसीसीच्या हॉल ऑफ फेम मधील खेळाडू म्हणून डॉन ब्रॅडमनची निवड केली गेली. त्याच्या मृत्यूपूर्वी ३ वर्ष आधीच त्याच्या नावाने पोस्टाचे तिकीट ऑस्ट्रेलिया सरकारने काढले होते. त्याच्या नावाने गौरवल जाणं हेही कित्येकांना अभिमानास्पद वाटतं. ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्ह वॉने श्रीलांकन फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनला गोलंदाजीतील डॉन ब्रॅडमन म्हणून गौरविले. डॉन ब्रॅडमनवर गाणी आणि चरित्रपटही निघाले. तसेच भव्यदिव्य असे संग्रहालयही उभारण्यात आले.

भारतासारख्या देशातील सचिन तेंडुलकरनामक खेळाडू ज्यावेळी अब्जावधी लोकांच्या गळ्यातील ताईत होतो, तेव्हा त्याच्या प्रेरणास्थानाला जाणून घेऊन लोकांसमोर मांडण्यातही वेगळीच मज्जा आहे. देशोदेशीच्या सीमा ओलांडून खेळभावनेने एकत्र यायला शिकवणाऱ्या अन त्यानिमित्ताने प्रेरणास्थान बनलेल्या सर डॉन ब्रॅडमन यांना ११० व्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक सदिच्छा

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या बोधचिन्ह व घोषवाक्याचे अनावरण

lokseva
lokseva

मुंबई | नागरिकांना पारदर्शक,गतिमान आणि कालबद्ध सेवा देण्यासाठी पारित केलेल्या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या बोधचिन्ह व घोषवाक्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज अनावरण झाले.

लोकसेवा हक्क कायद्याच्या लोकप्रियतेसाठी घेण्यात आलेल्या बोधचिन्ह स्पर्धेत नरेश अग्रवाल यांच्या बोधचिन्हाची तर उत्कृष्ट घोषवाक्य स्पर्धेत हेमंत कानडे यांच्या घोषवाक्याची निवड करण्यात आली. यावेळी या दोघा स्पर्धकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रत्येकी २५ हजारांचे पारितोषिक देण्यात आले. या प्रसंगी मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधिन क्षत्रिय, प्रधान सचिव भूषण गगराणी, एसव्हीआर श्रीनिवास आदी उपस्थित होते.

पुण्यात पुस्तक दहीहंडीचे आयोजन

initiative
initiative

पुणे | राष्ट्रीय एकात्मता जपण्यासाठी अनेक संस्था नानाविध कार्यक्रमाचे आयोजन करत असतात. परंतु वंदे मातरम संघटनेने आणि फीनिक्स फाउंडेशन यांनी दरवर्षी प्रमाणे पुस्तक दहीहंडीचे आयोजन करत राष्ट्रीय एकात्मता जपली आहे. सर परशुरामभाऊ महाविद्यालय येथे जुने पुस्तक स्विकारण्याच्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. गडचिरोली जिल्ह्यात या उपक्रमाअंतर्गत आजपर्यंत ३३ ग्रथालये उभारण्यात आली आहेत, वंदे मातरम संघटनेचे या कार्यक्रमाचे १४ वे वर्ष आहे. जुनी व सर्व प्रकारची शैक्षणिक, वैनिक पुस्तकांचा स्वीकार या वेळी घेण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष वैभव वाघ व प्रदेश कार्याध्यक्ष सचिन जामगे यानी दिली.
१ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता या पुस्तकी दहीहंडी संपन्न होणार आहे.