कर्जत | विठ्ठलाचे दर्शन घेऊन घरी परतत असताना पाटेवाडी जवळ भाविकांची गाडी आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात पाच वारकरी भाविक जागीच ठार झाले आहेत. भाविकांची गाडी मध्यम वेगात होती पुढून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे.
पाच मृत व्यक्ती मध्ये एक शिक्षक आणि एक मुख्याध्यापकाचा समावेश आहे. मृत व्यक्ती मधील पाचवा लहान मुलगा होता. गंभीर जखमी झाला होता त्याला रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीचे मृतदेह कर्जतच्या शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत.
पुणे सोलापूर महामार्गावर ही असाच एक अपघात झाला असून त्यात ही सात वारकरी जखमी झाले आहेत. टेंभुर्णी येथील शासकिय रुग्णालयात जखमी वारकऱ्यांवर उपचार सुरू आहेत.
पाच वारकऱ्यांचा झाला मृत्यू
मातंग समाजाचा पुण्यात विराट मोर्चा
पुणे | दलित समाजावर राज्यात विविध ठिकाणी होत आलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर काल शनिवारी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मातंग विराट मोर्चा काढण्यात आला. सारसबागे जवळील अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला वंदन करून मोर्चाची सुरुवात झाली होती. मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्याचे निवेदन दिले आणि मोर्चाची सांगता करण्यात आली.
लातूर जिल्ह्यातील रुद्रवाडीत नवरदेव मारुतीच्या मंदिरात गेल्याने त्याला मारहाण करण्यात आली होती. तसेच जळगाव मध्ये मातंग समाजाच्या मुलांना नग्न करून मारहाण करण्यात आली होती. तर पुण्यात उमेश इंगळे या युवकाची हत्या करण्यात आली होती. या सर्व घटनांचा निषेध तसेच विविध मागण्याचे निवेदन मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
सर्व पक्षांच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला होता यात कॉग्रेस चे रमेश बागवे, अविनाश बागवे तसेच राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचा प्रमुख सहभाग होता.
जानवी कपूरने पहिल्याच दिवशी मोडले आलिया भटचे रेकॉर्ड
मुंबई | सैराटचा रिमेक असलेल्या धडक चित्रपटाने पहिल्या दिवशी दमदार कामगिरी करत ८ कोटी ७० हजार रुपयांची कमाई केली आहे. शशांक खेतान यांच्या दिग्दर्शनाने या चित्रपटाला चांगला आकार दिला असल्याचे बोलले जाते आहे. जानवी कपूरचा हा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाने आलीया भटच्या पहिल्या चित्रपटाचे रेकॉर्ड मोडले आहे. आलिया भट यांच्या टू स्टेट या चित्रपटाने ८ कोटींची कमाई केली होती. परंतु धडकने टू स्टेट ला ७५ लाखांनी पिछाडीवर टाकले आहे. धडक चित्रपट प्रदर्शित होण्या अगोदर हा अंदाज लावला जात होता की हा चित्रपट पहिल्या दिवशी ७ ते १० कोटींच्या दरम्यान कमाई करेल. हा अंदाज खरा ठरताना दिसत आहे. टू स्टेट चित्रपट करण जोहरने दिग्दर्शित केला होता तर धडक हा चित्रपट करण जोहरच्या चित्रपट कंपनीत तयार करण्यात आला आहे.
शुक्रवारी लोकसभेत मोदी सरकारवर अविश्वास ठराव मांडल्याने चित्रपटाची कमाई कमी झाल्याचे सिनेजगतात बोलले जाते आहे. रविवारी हा चित्रपट मोठी कमाई करेल असे बोलले जाते आहे.
विनायक मेटेंना मराठा आंदोलकांनी लावले हुसकावून
परळी | मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी परळीत छेडलेल्या ठिय्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. आज सायंकाळी विनायक मेटे आंदोलकांना भेटायला गेले आणि त्याठिकाणी भाषण करते वेळी आंदोलकांना भाषणाचे मुद्दे नपटल्याने आंदोलकांनी त्यांना तिथुल हुसकावून लावले आहे.
आंदोलकांना आक्रमक होत चालल्याने राज्याचे वातावरण तापत चालले आहे. आज राज्यात ठीक ठिकाणी एसटी बसला लक्ष करण्यात आले आहे तसेच औरंगाबाद, ठाणे,सोलापूर,बार्शी याठिकाणी चक्का जाम करण्यात आला होता.
शरद पवारांनी राहुल गांधींचे केले कौतुक
मुंबई | राहुल गांधींनी काल लोकसभेत केलेले भाषण सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारे होते. तसेच राहुल गांधींनी मांडलेले मुद्देही उत्तम होते असे गौरव उद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवारां यांनी काढले आहेत. काळा पैसा आणण्यात सरकार अपयशी ठरले आहे. दिलेली अश्वासने पाळण्याचा सरकारला विसर पडला आहे. हाच लोकांचा असंतोष राहुल गांधींनी लोकसभेत बोलून दाखवला असे शरद पवार म्हणाले.
मुंबईमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसचे शिबीर चालू आहे त्या शिबिरात शरद पवार बोलत होते.
सगळं भाषण चांगले झाले पण डोळा मारायला नको होता – अजित पवार
राहुल गांधीनी लोकसभेत केलेले भाषण सरकारला विचार करायला लावणारे होते. सरकारच्या चुकांचे वाभाडे राहुल गांधींनी आपल्या भाषनातून काढले. तसेच मोदींना मिठी मारून कसलाच द्वेष मनात नसल्याचे दाखवले परंतु त्यांनी जागेवर बसल्यावर डोळा मारायला नको होता कारण त्यातून भाषणाचे गांभीर्य कमी झाले असे अजितदादा म्हणाले.राष्ट्रवादी कॉग्रेसच्या शिबिरात अजितदादा माध्यमांशी बोलत होते.
राहुल गांधींनी काल अविश्वासाच्या ठरावावर केलेल्या भाषणावर राजकीय वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.भाजपने राहुल गांधींवर सडाडून टीका केली असू शिवसेना आणि राष्ट्रवादी कडून कौतुक करण्यात येत आहे.
एसटी बसची झाली तोडफोड, मराठा आरक्षणाचे आंदोलन झाले तीव्र
परळी | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी परळीत ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे.तीन दिवस शांत असणारे आंदोलक आज तीव्र पवित्र्यात बघायला मिळाले. हिंगोली शहरात एसटी बस फोडण्यात आल्या तसेच बीड सोलापूर शहरात एसटी बसला लक्ष करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत ही आंदोलक तीव्र झाले होते. बार्शी मध्ये बसला आग लावण्याचा प्रकार घडला.
मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयीन कचाट्याय अडकला असून आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यासाठी न्यायालयाने तो मुद्दा राज्य मागासवर्गीय आयोगाकडे सोपवला आहे. आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने सरकार उदासीन असल्याचे मराठा समाजाच्या वतीने बोलले जात आहे.
परळी मधील ठिय्या दिलेल्या आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांकडून लेखी आश्वासनाची मागणी केली केली आहे. आज परळी सहित औरंगाबाद, लातूर, नवी मुंबई शहरात ही ठिय्या देण्यात आला आहे.आंदोलन दिवसेंदिवस उग्र होत जाण्याची शक्यता आहे. सरकारने यात जातीने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे.
दहशतवाद्यांनी कश्मीरमध्ये पोलीस अधिकाऱ्याला केले गायब
श्रीनगर | कश्मीर मध्ये दहशतवादी कार्यवाह्याचे पेव फुटले असून दहशतवाद्यांनी काल रात्री एका पोलीस अधिकाऱ्यास गायब केले आहे. मोहम्मद सलीम शाह असे त्या गायब केलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.काल रात्री उशिरा त्यांना त्यांच्या घरातून दहशतवाद्यांनी पकडून नेहले आहे.
गेल्या महिन्यात असेच लष्कराचे अधिकारी औरंगजेब यांना ही दहशतवाद्यांनी पकडून नेवून मारून टाकले होते.तसेच जावेद अहमद डार या पोलीस अधिकाऱ्याला ही असेच दहशतवाद्यांनी पकडून नेहले होते आणि नंतर त्या पोलीस अधिकाऱ्याची शव कुलगाव मध्ये सापडले होते.
मुस्लीम धर्माच्या लोकांनी पोलीस खात्यात सामील होऊ नये म्हणून दहशतवादी संघटनांनी यापूर्वी फतवे काढले आहेत.काल पकडून नेहलेल्या पोलीस अधिकाऱ्याची नुकतीच निवड झालेली होती आणि कठुआ शहरात प्रशिक्षण सुरू होते. प्रशिक्षार्थींना काही दिवसाची सुट्टी देण्यात आली होती म्हणून मोहम्मद घरी आले होते त्यावेळी ही घटना घडली.
रणबीर कपूर वर ५० लाखाच्या फसवणुकीचा खटला दाखल
पुणे | रणबीर कपूर या सिनेकलाकारावर कल्याणी नगरच्या शीतल सूर्यवंशी यांनी ५० लाखाची फसवणूक केल्याचा खटला दाखल केला आहे. पुण्याच्या दिवाणी न्यायालयात हा खटला सुरू आहे.
कल्याणी नगरच्या ट्रॅप टॉवर मध्ये रणबीर कपूरचे अपार्टमेंट आहे. हे अपार्टमेंट शीतल सूर्यवंशी यांना भाड्याने दिले आहे. भाडे २०१६ साली झाला आहे. पहिल्या वर्षी ४ लाख तर दुसऱ्या वर्षी ४ लाख २० हजार रुपये भाडे देण्याचे ठरले होते.परंतु रणबीर कपूर याने मुदतपूर्व भाडेकरार मोडला असल्याचा दावा शीतल सुर्यवंशी यांनी केला आहे. तसेच भाडे करारावेळी दिलेले २४ लाख ही अनामत रक्कम पण परत नदिल्याचे याचिकेत म्हटले आहे. रणबीर कपूर ने यावेळी भाडे करार मोडल्याने आपले कुटूंब बेघर झाले आहे त्यामुळे नुसकान भरपाई म्हणून ५०लाख मिळावे अशी मागणी शीतल सूर्यवंशी यांनी केले आहे.
रणबीर कपूर याने आपली भूमिका कोर्टात मांडली आहे त्यात त्याने असे म्हणले आहे की, दोन महिन्याचे भाडे तटवल्याने मी अनामत रक्कमेतून दोन महिन्याचे भाडे कापले आहे. तसेच मला भाडे करार मोडायचा नव्हता तर नव्याने त्यात काही किरकोळ बदल करायचे होते. कोर्टाने दोघांचे म्हणणे ऐकून घेतले आहे या खटल्याची पुढील सुनावणी २८ ऑगस्ट रोजी होणार आहे.
लेथ जोशी : जुन्या गोष्टींतील नवीन बदल
शनिवार विशेष
चित्रपट परिक्षण : लेथ जोशी
लेखक : अझीम अत्तार
माझ्या वडिलांना कंपनीत काम करून नुकतेच १ जुलै ला ३१ वर्षे पूर्ण झाले. ३१ वर्षे एका कंपनीत एका मशीनवर वर्कर म्हणून काम करणे ही तशी सोपी बाब नाही. ८७ च्या काळात पोरसवदा वयात चालू केलेलं काम एखादा माणूस सलग ३१ वर्षे करतो आणि अजूनही तोच उत्साह ठेवतो, हे माझ्यासारख्या चंचल आणि झटपट यश हवं असलेल्या तरुणाला नाही कळणार. किंबहुना मी बऱ्याचदा हा विचार करतो की आयुष्याच्या उमेदीच्या वर्षांत तेच ते काम करून कंटाळा बरं कसा आला नसेल, खासकरून जेव्हा मला दर २-३ वर्षांनी काहीतरी नवीन काम हवं असतं.
जेव्हा जेव्हा आमच्या घरात त्यांच्या कामाचा उल्लेख येतो, तेव्हा तेव्हा ते आम्हाला बड्या उमेदीने त्यांचं काम समजावून सांगतात. म्हणजे इंजिन वाॅल्व ला स्ट्रेटनिंग मशिन मध्ये ठेवल्यानंतर कसं त्याचं स्टेम आणि हेड, रोलर ने बरोबर शेप मध्ये येतात आणि तो तापलेला इंजिन वाॅल्व पुढच्या प्रोसेसिंगसाठी दुसऱ्या मशीन कडे पाठवला जातो. कुठल्या कुठल्या कंपनीकडून त्यांना आॅर्डर्स येतात आणि त्यांची मशीन किती भारी काम करते, हे सगळं ऐकताना मला दिनू आठवतो, “टेक्नॉलॉजी अशी अशी बदलतीए. कामं करायला लोक असे रोबोट बनवताहेत, जे बिघडले की स्वतःच स्वतःला रिपेअर करतील. आणि काये लेथ बिथ. ”
‘लेथ जोशी’ या ‘मंगेश जोशी’ दिग्दर्शित मराठी चित्रपटातील सरळमार्गी, मितभाषी जोशी (चित्तरंजन गिरी) एका छोट्या प्रोडक्शन कंपनीत काम करत असतात. दिनू (ओम भूतकर) हा त्यांचा हरहुन्नरी, इलेक्ट्रोनिक गॅझेट्सशी लिलया खेळणारा मुलगा. जोशींनी तब्बल ३५ वर्षे लेथ मशीन वर काम केलंय आणि आता अॅटोमेशन आल्यामुळे मालकाने त्यांचं Manual Production Workshop बंद करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता घरी बसलेल्या जोशींना दुसरं काम शोधायची पाळी येते आणि लेथशिवाय दुसरं काही काम येत नसल्यामुळे आणि मुळात लेथ हाच प्रकार हळूहळू कालबाह्य होत असल्या कारणाने त्यांची कुचंबणा होते. जोशींची परिस्थिती तशी जेमतेमच. घरात मुलगा दिनू, आंधळी आई आणि बायको. बायको बाहेरून स्वयंपाकाच्या, फराळाच्या आॅर्डर्स घेऊन घराला हातभार लावत असते. चित्रपटात कुटुंबाचं आणि परस्परांतील नात्याचं अतिशय बारीक आणि नेमकं सादरीकरण करण्यात आलेलं आहे .
‘सेवा चौहान’ यांनी साकारलेली आंधळी आजी, जिला टीव्ही पाहण्याची (ऐकण्याची) खूप आवड आहे. तिचा सुनेवरती सारखा राग काढणं, देवाचा जप करणं, दिनूचं सारखं येता-जाता आपल्या आजीची चेष्टा करणं, आईची आपली आॅर्डर्स पूर्ण करायची रोजची धडपड, त्यांचं एकत्र बसून Serials पाहणं, मुलाचं आपल्या नकळत सिगारेट ओढणं, गाडी चालवायला शिकणं आणि हे कळाल्यावर आश्चर्यात पडलेला बाप. या साऱ्या गोष्टी त्या कुटुंबाची हलकीफुलकी वातावरण निर्मिती करतात.
परंतु चित्रपटाचा मुख्य आशय हा ‘बदल’ आहे. प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने होणारा बदल. मग ते काम असो, घर वा गोष्टींकडे पाहण्याची आपली दृष्टी. आणि हाच बदल जेव्हा वेगाने होतो आणि त्याला प्रगती हे नाव दिलं जातं, तेव्हा त्या बदलांशी जुळवून घेताना उडणारी तारांबळ. या सर्व गोष्टी लेथ जोशी चित्रपटात अतिशय प्रतिकात्मक पद्धतीने टिपल्या गेल्या आहेत.
मग ते कणीक मळण्याचं फुड प्रोसेसर असो, जपाचं मशीन असो, ग्रहशांतीला केलेलं चायनीज वा घेतलेली नवीन कार…आपल्या दैनंदिन आयुष्यातल्या सगळ्या गोष्टींना हाच नियम लागू होतो आणि माणूस नकळत या बदलांना सामावून घेतो .
या अविरत आणि महत्वाकांक्षेने धावणाऱ्या जगात ‘जोशी’ हे समाजाचा तो भाग अधोरेखित करतात, ज्याने आयुष्यभर एक ठराविक प्रकारचं काम केलंय आणि या क्षणोक्षणी बदलणाऱ्या जगाच्या पावलावर पाऊल ठेवून धावणं त्यांना जमलं नाहीए. (असे जोशी आपल्याला काही तरुणांत पण दिसतात, ज्यांना उर फुटेस्तोवर धावायचं नाहीए किंवा जगाच्या वेगात बदलता येत नाहीए). पण मग त्यांना शिंदे साहेबांचं वाक्य चपखल बसतं, “कसंय जोशी, आजच्या काळात अपग्रेड होणं फार महत्वाचं आहे. नाहीतर बाहेर फेकले जाऊ आपण”.
चित्रपटातील दिनू हा सर्व नवनिर्मितीतील आणि सळसळत्या तरुणांचं प्रतिनिधित्व करतो, ज्यांचा वेळच मुळी नवनवीन गेझेट्स शिकण्यात आणि त्यांना अपग्रेड करण्यात जातो. या पिढीला जुन्या गोष्टींना कवटाळणे आणि एखाद्या ठिकाणी निवांत थांबणे, असल्या टाईमपास गोष्टींसाठी वेळच नाहीए. ती नेहमी नवीन च्या शोधात पळत राहते. आणि सौ. जोशी (अश्विनी गिरी) या त्या आहेत ज्यांना नवनवीन गोष्टींचं कुतूहल आणि आकर्षण आहे. मग त्या दैनंदिन वापरातल्या वस्तू असोत वा राहणीमान, ते नेहमी या बदलांकडे नकळत ओढले जातात .
चित्रपटातील चित्रीकरणाचा वेळ, हा अभ्यासाचा अजून एक विषय. जेव्हा जेव्हा जोशी आणि त्यांचं पूर्वापार चालत आलेलं राहणीमान याभोवती कॅमेरा फिरतो, तो खूप संथ असतो. याउलट जेव्हा जेव्हा दिनू पडद्यावर येतो आणि काळानुरूप बदललेल्या गोष्टी येतात, तेव्हा तेव्हा कॅमेरा पटपट फिरतो. जुनं आणि नवीन, पूर्वापार चालत आलेलं आणि जगाच्या वेगानुसार अपग्रेड झालेलं यांतला विरोधाभास आपल्याला प्रत्येक फ्रेम मधून स्पष्ट दिसतो .
आणि जोशींची हतबलता अजूनच केविलवाणी आणि खरी वाटते जेव्हा त्यांचा सहकारी म्हणतो , “बास झालं जोशी . या जगाच्या वेगाशी आपला निभाव नाही लागणार आता”.
चित्रपटात संगीताचा वापर तसा कमी आहे, मात्र आपल्या दैनंदिन वापरातल्या वस्तूंचा आवाज चपखलपणे वापरून परिणामकारक मांडणी झाली आहे. ‘चित्तरंजन गिरी’ हे पूर्ण चित्रपटभर शांत, संयत, गंभीर वावरतात . त्यांची हळू चालणारी सायकल त्यांच्या आयुष्यातला संथपणा दर्शवते .
परंतु नेहमी गंभीर असणाऱ्या जोशींबद्दल जेव्हा त्यांचे मालक “हे आमचे लेथ जोशी. कलाकार आहेत कलाकार” असं म्हणतात. तेव्हा आपल्या जोशी आडनावासोबत लावलेलं लेथ त्यांना सर्व दुःख विसरायला लावतं, त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारं निर्मळ हास्य पूर्ण चित्रपटभर पुरून उरतं आणि त्यांची सायकल वेगाने धावू लागते.

अझिम अत्तार
(लेखक चित्रपट अभ्यासक असून साॅफ्टवेअर इंजिनिअर आहेत)
गोतस्करीच्या संशया वरून एकाची हत्या
रामगड (राजस्थान)| गाईची तस्करी करत असल्याच्या संशयावरून राजस्थान मधील रामगड जवळील लालवंडी गावात जमावाने एका व्यक्तीची हत्या केली आहे. अकबर खान असे मृताचे नाव असून तो हरियाणा राज्यातील कोलगावचा रहिवाशी आहे. दोन गाई घेऊन जात असताना गोरक्षकांच्या जमावाने त्याच्या वर हल्ला केला आणि या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी ९ च्या सुमारास घडली आहे. केंद्रात मोदी सरकार आल्या पासून देशात गोरक्षकांचा सुळसुळाट माजला आहे. देशात आजपर्यंत गोतस्करीच्या संशयावरून ५० हुन अधिक हत्या झाल्या आहेत.
दरम्यान राजस्थानचे गृहमंत्री गुलाबचंद कटारिया यांनी दोषींवर कडक कार्यवाही करण्यात येईल आणि पीडितास योग्य न्याय मिळवून दिला जाईल असे म्हटले आहे. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे.










