पुणे | पुण्यात चितळे दुधाला विशेष मागणी आहे. चितळेचे ४ लाख लिटर दुध पुण्यामध्ये रोज वितरित होते. आत्ताच आलेल्या माहिती नुसार चितळे दुधाचे आजच्या दिवशी १००% वितरण झाले आहे. आंदोलकांची नजर चुकवून दूध पुण्याला पोच करण्यात चितळे दूध संघाला यश आले आहे. चितळे दुधाचे संकलन आणि प्रक्रिया सांगली जिल्ह्यातील पलूस या ठिकाणी होते. तेथून पुणे आणि मुंबईला हे दूध वितरित होते. दूध दरवाढ आंदोलनाचा फटका चितळे दूध संघाला ही बसला आहे. काल चितळेंचे ५०% दूध आंदोलकांनी अाडवून रस्त्यावर ओतून दिले होते. दुधाचा संप जर मिटला नाही तर दूधाची भीषण टंचाई येणाऱ्या काळात बघायला मिळणार आहे.
तुकोबांची पालखी सराटीहुन तर माऊलींची पालखी नातेपुत्याहून मार्गस्थ
अकलूज | संत तुकाराम महाराजांच्या पावलांना सराटी येथे नीरा स्नान घालण्यात आले आहे. नीरा स्नानानंतर पालखीने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. अकलूजमध्ये सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रारंगणात गोल रिंगण पार पडणार आहे. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी नातेपुते मुक्कामाहून मार्गस्थ झाली असून माऊलींच्या पालखीचे पहिले गोल रिंगण सदाशिवनगर या ठिकाणी दुपारी पार पडणार आहे.
रिंगण सोहळा पार पडल्यानंतर माऊलींची पालखी माळशिरस येथे मुक्कामी जाणार आहे तर तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज अकलूज येथेच मुक्काम असणार आहे.
सांगलीत झाली पोलिसाचीच हत्या
सांगली | पोलीस हवालदार समाधान मानटे यांचा अज्ञान इसमानी धारदार चाकूने भोकसून खून केला आहे. मानटे सांगलीत आपल्या मित्रांच्या सोबत हॉटेल रत्ना डिलक्स येथे जेवायला गेले असताना हा सगळा प्रकार घडला आहे. हल्लेखोरा सोबत दोन साथीदार होते त्यांनी चेहरे झाकल्याने त्यांची ओळख पटू शकली नाही. तसेच हा खुनाचा थरार सीसीटिव्ही कामेऱ्यात कैद झाला आहे. पोलीस हवालदार जेवण करून घरी परतत असताना हॉटेलच्या गेटवर हल्ले खोराने त्यांच्यावर चाकूने वार केल्याचे सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या चित्रफितीमध्ये स्पष्ट दिसते आहे.
पोलीस म्हणजे रक्षक अशी संज्ञा जरी असली तरी पोलीसांवर होणारे हल्ले महाराष्ट्राला नविन नाहीत. मुंबईत चौदा लोकांनी पोलिसांना डांबून ठेवल्याची घटना ताजी असतानाच सांगलीमध्ये हा पोलिसाचा खून व्यवस्थेला विचार करायला लावणारा आहे.
घटनेचा तपास युद्ध पातळीवर सुरू असून सांगली पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजू शेट्टींनी गुजरात मुंबई सीमेवर दिला ठिय्या
मुंबई | आज दूध आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. सलग तिसर्या दिवशीही आंदोलनात कमालीची सक्रियता बघायला मिळत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी स्वत: महाराष्ट्र गुजरात सीमेवर गुजरात मधील दूध अडवण्यासाठी ठिय्या देऊन बसले आहेत. गुजरातवरुन मुंबईकडे येणार्या दुधाच्या गाड्या माघारी पाठवण्यात आंदोलकांना यश आले आहे. गुजरातचे पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी दुध आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला होता. परंतू ऐनवेळी हार्दिकने काहीच सक्रियता न दाखवल्यामुळे खुद्द शेट्टी यांना गुजरातेतील दुध मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी महाराष्ट्र गुजरात सीमेवर ठीय्या मांडून बसावे लागले आहे.
तिसर्या दिवशी ही दुधाचे आंदोलन क्षमले नाही. कोल्हापूर जिल्ह्यात आज आंदोलन उग्र झाले आहे. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात १० पेक्षा अधिक टँकर फोडण्यात आले असून सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यातही आंदोलकांनी टँकर फोडून दूध रस्त्यावर ओतून दिले आहे. तर पुणे मुंबई महामार्गावर अज्ञात लोकांनी दुधाचे तीन टँकर फोडले आहेत. मुंबई पुण्यात आज दुधाची टंचाई जाणवणार आहे. तिसऱ्या दिवशी आंदोलक आक्रमक आहेत. सरकारने लवकर तोडगा काढावा असा सूर जण समन्यातून उमटतो आहे.
रत्नाकर गुट्टे महाराष्ट्राचे निरव मोदी – धनंजय मुंडे
नागपूर | मराठवाड्यात लक्ष्मीपुत्र म्हणून प्रसिद्ध असणारे रत्नाकर गुट्टे हे महाराष्ट्राचे निरव मोदी असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केला आहे. रत्नाकर गुट्टे यांनी मराठवाड्यात २२कंपन्या नोंदवल्या आहेत आणि या कंपन्यांच्या नावे ५,४६२ कोटी रुपयांचे कर्ज उपसले आहे. रत्नाकर गुट्टे यांच्या जवळ असलेल्या कंपन्यांची एकूण किंमत ४८४ कोटी रुपये होत असताना एवढ्या तफावतीत कर्ज कसे मंजूर करण्यात आले असा सवाल धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केला आहे.
शेतकऱ्यांना हाताशी धरून त्यांच्या नावावर कर्ज लाटल्याचे आरोप गुट्टेवर करण्यात आले आहेत. मागील अधिवेशनात गुट्टेच्या विरोधात विधान परिषदेत आवाज उठवल्याने सरकार गुट्टेंवर एसआयटी नेमण्यात तयार झाले परंतु या तपासाची गती अतिशय मंद असल्याचे मुंडे म्हणाले.
गुट्टे यांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. अनपेक्षित रित्या या निवडणुकीत गुट्टेना पराभूत व्हावे लागले होते तर याठिकाणी धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय डॉ.मधुसूदन केंद्रे विजयी झाले होते. पुढील निवडणुकीत केंद्रेच विजयी व्हावे यासाठी धनंजय मुंडे रत्नाकर गुट्टे यांच्या मागे लागले असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते आहे.
रत्नाकर गुट्टे हे ना. पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.भाऊ बहिणीच्या शह काट शहाची किनार या आरोपांना असल्याचे नाकारता येत नाही.
जिओ आणि पतंजलीचे दूध येण्याची वाट बघू नका, दूध आंदोलनावर निर्णय घ्या – धनंजय मुंडे.
नागपूर | आज विधान परिषदेत दूध दरवाढीच्या आंदोलनावर चर्चा झाली. यावेळी बोलत असताना, ‘जिओ आणि पतंजलीच्या दुधाची वाट बघत बसू नका, दूध दर वाढीवर तोडगा काढा’ असे म्हणुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडें यांनी सरकारला चिमटा काढला आहे.
विधान परिषदेत दूध आंदोलनाचा विषय सुरू असताना धनंजय मुंडे यांनी सभागृहात उपस्थित दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना दूध दरवाढ आंदोलनावर उपाय सुचवले. दूध भुकटी वरील अनुदान दुप्पट करावे तसेच त्याची मुदत ४ महिन्यावरून सहा महिन्यांपर्यंत वाढवावी. सरकारने आंदोलनावर लवकर तोडगा काढावा अन्यथा दुधाचा प्रश्न भीषण होऊ शकतो. असे मुंडे यांनी म्हटले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने दुग्धविकास मंत्र्यांना दूध आंदोलनासंदर्भात फोन करून विचारणा केली म्हणून त्या शेतकऱ्यांच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली. ही घटना सभागृहात उल्लेखून धनंजय मुंडे यांनी गौप्यस्फोट घडवला.
पुण्यात झाली दुधाची टंचाई, मुंबईची दूध सेवा सुरळीत
पुणे | दुधाच्या आंदोलनाने मोठा पेट घेतला असून त्याच्या झळा राज्यातील मोठ्या शहरांना बसत आहेत. पुण्यात आज दुधाची टंचाई जाणवत असल्याने नागरीकांची गैरसोय झाली आहे. तर मुंबईतील दुध पुरवठा सुरळीत झाल्याने दुध सेवा सुरळीत सुरु आहे.
पुण्याला होणारा दुधाचा पुरवठा काल ठीक ठिकाणी रोखला गेल्याने आज दूध सेवेत खंड येऊन दुधाची टंचाई निर्माण झाली आहे. पुण्यात विशेष मागणी असणार्या चितळे दुधाचाही पुरवठा खंडित झाला आहे. तसेच पुण्यात सकाळी ९ वाजताच दुधाचा साठा समाप्त झाल्याचे चितळेच्या व्यवस्थापकांनी सांगितले आहे.
मुंबईत मात्र आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी दूध पुरवठा सुरळीत आहे.नागरिकांना दुधाचा पुरवठा व्यवस्थित होत आहे.राज्याच्या इतर शहरात दुधाचा पुरवठा कमी होत असताना मुंबईत होत असलेला दुधाचा पुरवठा आंदोलनाचे अपयश अधोरेखित करत आहे.
दूध हे रोजच्या आहारातील महत्वाचा घटक असल्याने दुधाचा प्रश्न लवकर सुटावा असे जनसमान्यातून बोलले जाते आहे.दूध आंदोलनावर येत्या काळात जर तोडगा निघाला नाही तर मोठी भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते.
वैद्यकीय शिक्षण प्रवेशाच्या लक्षवेधी वर विधान परिषदेत गदारोळ
नागपूर | वैद्यकीय शिक्षण प्रवेशावर आज विधान परिषदेत लक्षवेधी मांडण्यात आली. या लक्षवेधीवर बोलताना मराठवाड्यातील प्रवेशाच्या ७०/३० पॅटर्नचा उल्लेख झाला. विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी ७०/३० पॅटर्नवर लक्ष वेधले. चर्चा टोकाला भिडल्या मुळे विरोधक आमने सामने आले. शेवटी सभापतींच्या खुर्चीत असणारे माणिकराव ठाकरे यांनी विषय राखून ठेवत असल्याचे सांगत गदारोळ थांबवण्याचा प्रयत्न केला.
मराठवाड्यात फक्त ६ वैद्यकीय शिक्षण महाविद्यालये असल्याने मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची कबुली वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. तसेच ७०/३० पॅटर्न १९८५ पासून राज्यात अस्तित्वात आहे. खरंतर या पेटर्नतेला जेव्हा सुरु झाला तेव्हाच विरोध करायला पाहिजे होता. आज हा विषय माध्यमात झळकल्याने आपण चर्चेला आणत असाल तर हे योग्य नाही’ असे महाजन म्हणताच विरोधकांनी गदारोळ करण्यास सुरुवात केली.
राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हे उत्तर देण्यासाठी सक्षम नाहीत त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी येऊन यावर निवेदन द्यावे असे वक्तव्य विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी करताच वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजनच हौद्यात येऊन गदारोळ करू लागले. सत्ताधारी आणि विरोधक यांच्या गदारोळात सभापतींनी लक्षवेधी राखून ठेवल्याचे जाहीर केले.
शिव स्मारकावरून विधान सभेत अभूतपूर्व गदारोळ
नागपूर | विधान सभेत शिव स्मारकासंदर्भात निवेदन देते वेळी आज विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. शिवस्मारका मधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची खर्च कमी करण्यासाठी घटवल्याचा आरोप विरोधकांनी यावेळी केला आहे. जागतिक रेकॉर्ड मोडण्यासाठी पुतळ्याची उंची घटवून तलवारीची उंची वाढवण्यात येणार असल्याची नागरीकाट चर्चा सुरु आहे. त्या पार्श्वभुमीवर विरोधकांनी आज सरकारला धारेवर धरले.
मुख्यमंत्री सभागृहात निवेदन देत असताना विरोधाकांनी गोंधळ माजवला. जय भवानी जय शिवाजी आशा घोषणा देण्यात आल्या. तसेच अब्दुल सत्तारी (कॉग्रेस) आणि विजय भांबळे (राष्ट्रवादी) या आमदारांनी अध्यक्षांच्या समोरचा राजदंड पळवला. विरोधकांनी सभात्याग करून विधान भवनाच्या पायऱ्यांवर जय भवानी जय शिवाजी आशा घोषणा देण्यात आल्या.
दरम्यान मुख्यमंत्र्यानी विधानसभेत शिवस्मारका वरील निवेदनात, ‘शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कसल्याही प्रकारे कमी केली जाणार नाही. समुद्राच्या वातावरणात अधिक काळ टिकेल अशा मूर्तीचे निर्माण करण्यात येणार आहे.’ अशी भुमिका स्पष्ट केली.
आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांना महापूजा करू देणार नाही
मुंबई | मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीला विठ्ठलाची शासकीय महापूजा करू देणार नाही असा इशारा सकल मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. लाखोंचे मोर्चे काढून ही मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली निघत नसल्याने आम्ही अशा आंदोलनाचा निर्णय घेतला असल्याचे सकल मराठा क्रांती मोर्चाचे राघव गायकवाड यांनी माध्यमांनाशी बोलताना म्हटले आहे.
मुख्यमंत्री मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर कसल्याच हालचाली करत नसल्याने मराठा समाजात सरकारबद्दल असंतोष आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाने हा निर्णय घेतला आहे. सकल मराठा समाजाच्या बैठकीत आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांना शासकीय महापूजेला बसू न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.










