पुणे : आध्यात्मिक गुरु दादा वासवानी यांचे पुणे येथे आज सकाळी निधन झाले आहे. वयाच्या ९९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुणे येथील साधू वासवानी मिशनचे ते आध्यात्मिक प्रमुख होते. दादा वासवानी यांनी शाकाहारीचा नेहमीच पुस्कार केला. प्राण्यांच्या हक्कांसाठी ते कार्यरत होते. त्यांनी आजवर एकुण १५० हून अधिक पुस्तके लिहीली आहेत. आध्यात्मावरती त्यांनी जगभर व्याख्याने दिली आहेत. त्यांचे पार्थीव दर्शानाकरता साधु वासवानी मिशन, पुणे येथे ठेवण्यात येणार आहे.
….नाहीतर ताजमहाल उद्ध्वस्त करा – सर्वोच्च न्यायालय
दिल्ली : ‘तुम्ही ताजमहालाकडे लक्ष दिलेलं नाही. ताजमहालचं संवर्धन करण्याची तुमची इच्छाशक्तीच दिसत नाही. तुम्हाला ताजमहालाचा संभाळ करता येत नसेल तर तसं सांगा, ‘आम्ही त्याला टाळं ठोकू किंवा तुम्ही तो उद्ध्वस्त करा’ अशा कडक शब्दात आज सर्वोच्च न्यायालयाने केन्द्र सरकार व भारतीय पुरातत्व विभागाला सुनावलं आहे. ताजमहालाच्या संवर्धनाच्या संदर्भातील एका खटल्यावर सुनावणी देताना न्यायालयाने ही टीपणी केली आहे.
‘तुम्ही ताजमहालाकडे नीट लक्ष दिलं असतं तर तुमची परकीय गंगाजळीची समस्या सुटली असती. तुमच्या हेळसांडीमुळे देशाचं किती नुकसान झालंय तुम्हाला माहित आहे का?’ असा सवालही न्यायालयानं यावेळी उपस्थित केला आहे. न्या. दीपक आणि न्या. मदन लोकुर यांच्या खंडपीठानं ही सुनावणी दिली आहे. ताजमहालाच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी केंन्द्र सरकारने कोणती पावले उचलली आहेत त्याबद्दलची माहीती केंन्द्र सरकारने देण्याचे निर्देश यावेळी न्यायालयाने दिले आहेत.
ज्ञानोबांची पालखी जेजुरीत दाखल.माऊलीच्या पालखी पालखीवर भंडाऱ्याची मुक्त उधळण
जेजुरी : आज ३९ किलोमीटरचा पल्ला पाई चालून माऊलींची पालखी जेजुरीत जाऊन पोहचली आहे. जेजुरीच्या वेशी पासूनच माऊलीच्या पालखीवर भांडाऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली. अनेक वर्षाची या मागे परंपरा असल्याचे बोलले जाते. माऊलीच्या चांदीच्या रथावर सोनेरी भंडारा उधळल्याने सोन्याचा झाल्याची अनुभूती वैष्णवांनी अनुभवली. पालखीचा जेजुरीत आज मुक्काम असणार आहे. माऊलीच्या मुक्कामासाठी जेरुरीकरांनी जय्यत तयारी केली असून वैष्णवांच्या सेवेसाठी जेजुरीकर तण मन धन अर्पण करत आहेत.
माऊलींच्या पालखी वरील भांडाऱ्याची उधळण शैव आणि वैष्णवांचे मिलन मानले जाते.
पाकिस्तानात आवमी नॅशनल पार्टीचे नेते हारुन बिलौर यांची भर सभेत हत्या
पेशावर : पेशावरच्या याकातूत भागात आवमी नॅशनल पार्टीचे नेते हारुन बिलौर यांची भर सभेत हत्या करण्यात आली आहे. अज्ञात अतिरेक्यांनी भर सभेत स्फोट घडवून हारुन बिलौर यांची हत्या केली आहे. बिलौर पाकिस्तानातील आवमी नॅशनल पार्टीचे मुख्य नेते होते. पक्षाच्या सभेसाठी ते पेशावरला गेले असता अतिरेक्यांनी त्यांना ठार केले आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री पेशावर येथे पक्षाची बैठक आयोजीत करण्यात आली होती. बैठकीचे रूपांतर छोटेखानी सभेत झाले. साधारण ३०० लोक सभेला आले होते. सभा सुरु असताना अचानक मोठा आवाज झाला आणि सर्वत्र पळापळ सुरू झाली. दरम्यान पक्षाचे नेते हारून बिल्लौर यांना कोणीतरी खाली कोसळताना पाहिले. अतिरेक्यांनी भर सभेत स्फोट घडवून बिलौर यांची हत्या केली. त्यानंतर बिल्लौर यांना तातडीने लेडी रीडिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू रुग्नालयात डाॅक्टरांनी बिल्लौर यांचा मृत्यु झाला असल्याचे घोषीत केले.
पाकिस्तानात सध्या सार्वत्रिक निवडणुका सुरू आहेत. त्यात हारून बिल्लौर यांची ‘आवम नॅशनल पार्टी’ ही मुख्य तीन राष्ट्रीय पार्ट्यापैकी एक आहे. निवडणुकीच्या या घोडदौडीत हारून बिल्लौर हे पेशावरला आले होते पण तेथेच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. त्यांच्या सह हल्ल्यात अन्य १४ लोक मारले गेले आहेत. तसेच ६५ लोक गंभीर जखमी झाले आहेत.
हारून बिल्लौर यांचे वडील बशीर अहमद बिल्लौर हे सुध्दा आवमी नॅशनल पार्टीचे राष्ट्रीय नेते होते. त्यांचा ही तालिबान दहशतवादी संघटनेने असाच भर सभेवर हल्ला करून खून केला होता. बाप आणि मुलाला एकसारखेच मरण आले ही दुर्दैवी दुर्मिळ घटना आहे.
संजू मोडू शकतो अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड. कमाई जाणार ३००कोटीच्या घरात
मुंबई : २९ जून रोजी पूर्ण देश भर प्रदर्शित झालेल्या संजू चित्रपटाने बॉक्सऑफिसवर कल्ला उडवून दिला आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी ३४ कोटी रुपयांची कमाई केली तर पहिल्या रविवारी चित्रपटाने ४६ कोटी रुपये कमावले आहेत. संजू प्रदर्शित होण्याअगोदर प्रचारा पेक्षा अपप्रचार खूप करण्यात आला पण लोकांनी कसलीही अस्पृश्यता नबाळता कलाकृतीला मनस्वी दाद दिल्याचे चित्रपटाची कमाई सांगते आहे. संजू चित्रपट खरोखर संजय दत्तची बायोग्राफी आहे का कल्पनेचा आधार घेतला आहे या बद्दल संभ्रम असला तरी लोक चित्रपटास पसंद करत आहेत. चित्रपटाची कमाई काल मंगळवार अखेर २६५.४८ कोटी रुपये झाली असून रविवार पर्यंत हा आकडा ३००कोटी पर्यंत जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास संजू अनेक चित्रपटाचे रेकॉर्ड मोडेल. सिने क्षेत्रात संजू चित्रपटाबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे तर रणबीर कपूर यांच्या अभिनयाचे तोंड भरून कौतुक केले जाते आहे.
पंढरपूरात वसतिगृह अधीक्षकाने केला सात मुलींचा विनयभंग
पंढरपूर : दक्षिण काशी आणि लाखो वारकऱ्यांचे श्रध्दा स्थान म्हणुन पंढरपूर ओळखले जाते. पण याच पवित्र स्थळी एक लज्जास्पद बाब घडली आहे. भक्ती नगरी सोबत पंढरीची शिक्षण नगरी म्हणूनही ओळख आहे. याचाच विचार करून राज्य शासनाने समाज कल्याण खात्याचे शासकीय मुलींचे वसतिगृह उभारले. वसतिगृहचा अधिक्षक संदीप प्रभाकर देशपांडे याने मुलींचा विनयभंग केल्याची बाब उजेडात आली आहे. वसतिगृहात शिक्षणासाठी आलेल्या मुलींचे लैगिंक शोषण करून त्यांना वाच्यता करू नये म्हणून धमकवण्याचा प्रकार संदीप देशपांडे करत होता. जीवे मारण्याच्या आणि वसतिगृहातून हाकलून देण्याच्या धमक्या या वसतिगृह अधीक्षकाने दिल्याची कबुली वसतिगृहातील पीडित मुलींनी केली आहे. आरोपीस पंढरपूर पोलिसांनी अटक केली असून या बाबत ते अधिक तपास करत आहेत.
तुकोबांची पालखी वरवंड तर ज्ञानोबांची पालखी जेरुरी कडे मार्गस्थ
जेजुरी : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी यवत वरून वरवंडच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरीच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे.
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आजचा टप्पा मोठा असून त्याची लांबी ४४ किलो मीटर आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आजचा टप्पा ३९ किलो मीटरचा आहे.
नानार प्रकल्पग्रस्तांचे आज नागपूरात आंदोलन
नागपूर : नानार प्रकल्पग्रस्तांचे आज नागपूरमध्ये आंदोलन आहे. प्रकल्प येण्याने होणारी भीषणता आणि पर्यावरणाच्या हाणीकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्त करत आहेत. कोकणवासीयांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे आणि या खेळाला आमचा विरोध आहे असे प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे आहे.
आज दुपारी बाराच्या सुमारास २०० प्रकल्पग्रस्त नागपूरच्या यशवंत स्टेडियम वर जमणार असल्याची माहीती आहे. नानार प्रकल्पाविरोधात ते नागपूरात आंदोलन करणार आहेत. या प्रकल्पग्रस्तांनी विधानभवनावर मोर्चा काढण्यासाठी परवानगी मागितली होती परंतु सुरक्षेचे कारण देत त्यांना पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली. प्रकल्पग्रस्त दोन वाजण्याच्या सुमारास पत्रकार परिषद घेणार आहेत. तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याची ही इच्छा व्यक्त केली आहे.
दरम्यान काल विधानसभेत नानार प्रकल्पा संदर्भात लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती. यावर मुख्यमंत्र्यांनी सरकारची बाजू मांडली. आज विधान परिषदेत उदयोग मंत्री सुभाष देसाई नानार संदर्भात निवेदन मांडणार आहेत.
मुंबईत मुसळधार पाऊस, डोंबिवलीत दोन युवक गेले वाहून
मुंबई : मुंबईचा पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. अशातच लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. लोकांना दूध आणि भाजीपाला मिळणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे मुंबईकरांना प्रचंड समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. रस्त्यांवर ठिकठिकानी पाणीची डबकी साचली आहेत. अशातच डोंबिवलीमधे दोन युवक वाहून गेले असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हर्षद जीनकर हा २४ वर्षीय युवक नाल्यात पडला आणि त्याला वाचवण्यासाठी मित्र नाल्यात उतरला असता दोघेही वाहून गेल्याची घटना काल डोंबीवलीत घडली आहे. अग्निशमन दलाचे जवान ह्या दोघांचा शोध घेत आहेत. तसेच आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवानही घटनास्थळी दाखल होण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानातील पहिल्या शीख पोलीस अधिकार्याला राहत्या घरातून हाकलले
लाहोर : पाकिस्तानमधे सध्या शिख धर्मियांना मोठ्या प्रमाणात टार्गेट केले जात आहे. पाकिस्तानातील शिख धर्मियांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार पाकिस्तानातील पहिला शीख पोलीस अधिकारी गुलाब सिंग याला त्याच्या राहत्या घरातून जबरदस्ती बाहेर हाकलण्यात आले आहे. विषेश म्हणजे असे करण्यामागे पाकिस्तानचे पोलीस खातेच असल्याचे बोलले जात आहे. यावेळी पाकिस्तान पोलीसांनी सिंग यांच्याशी असभ्य वर्तन केले असल्याचे समजत आहे.
लाहोर मधील डेरा चहल परिसरात राहणार्या सिंग यांच्या राहत्या घरात सोमवारी पोलीस आले होते. त्यांनी सिंग यांना त्यांच्या राहत्या घरातून कुटूंबासहीत जबरदस्तीने बाहेर काढले तसेच त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. यादरम्यानचा पोलीसांसोबतच्या झटापटीचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला असून पाकिस्तान पोलीसांवर टिकेची झोड उठत आहे. ‘चोर – डाकूंसोबत जसे वागितले जाते तसेच पाकिस्तान पोलीस माझ्यासोबत वागले. कसलीही नोटीस अथवा पुर्वकल्पना न देता मला जबरदस्तीने घर खाली करायला लावले’ असे सिंग यांनी म्हटले आहे. ‘मला माझ्या घरातून बाहेरपर्यंत लोळवत आणण्यात आले, माझ्या डोक्यावरची पगडी काढून टाकण्यात आली तसेच माझे केस विस्कटले गेले.’ असेही सिंग यांनी म्हटले आहे. ‘मी १९૪७ सालापासून इथे राहतो आहे, मला घर रिकामे करण्याकरता दहा मिनिटे तरी द्या’ अशी विनवणी करुन सुद्धा माझे कोणीच एकले नाही असे सिंग यांनी एका व्हिडिओत म्हटले आहे. याप्रकरणामुळे पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांचे प्रश्न पुन्हाएकदा एरणीवर आले आहेत.










