मुंबई : राज्यात प्लॅस्टिक बंदीच्या कडक अंमलबजावणी अंतर्गत महाराष्टातील ३०९ दूध संघांना राज्यसरकारने नोटिसा पाठवल्या आहेत. दूध संकलनासाठी आता प्लॅस्टिक कॅन वापरण्यास राज्य शासनाने मज्जाव केला आहे. दूध संघात प्लॅस्टिक कॅन वापरताना दिसल्यास त्या दूधसंघावर प्लॅस्टिक बंदीच्या अधिनियमात अंतर्गत कार्यवाही केली जाणार असल्याचे सरकारने पाठवलेल्या नोटीसमधे नमुद करण्यात आले आहे. प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयावर प्रशासन सक्तीने वागत असल्याचे दिसून येत आहे.
पाकिस्तानात हिंदू महिला निवडणुकीला उभी
कराची : पाकिस्तानमधे सध्या निवडणुकांचा माहोल आहे. सिंध प्रांताच्या विधानसभेच्या निवडणुका सध्या सुरू आहेत. २५ जुलै रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीत यावेळी पहिल्यांदाच हिंदू महिला उभी राहीली आहे. ३१ वर्षीय सुनीता परमार या थारपरकर जिल्ह्यातील सिंध विधानसभा मतदारसंघ पीएस-56 या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. सुनीता यांच्या अजेंड्यावर स्त्रियांचा शैक्षणिक स्तर उंचावणे व त्यांना आरोग्य सुविधा पुरवणे अादी मुद्दे आहेत. काही दिवसांपूर्वी पाकिस्तान मध्ये हिंदू दलित महिला कृष्णा कुमारी कोल्ही यांनी विद्यापीठाच्या सिनेटची निवडणूक जिंकली होती.
विधान सभेच्या सभागृहात झाला अंधार
नागपूर : आज महाराष्ट्र विधी मंडळात वीज पुरवठा न झाल्याने कामकाज बंद ठेवण्यात आले. विधी मंडळातील कामकाज विरोधकांच्या गदारोळाने नव्हे तर विधी मंडळ परिसरात वीज पुरवठा खंडीत झाल्याने बंद ठेवावे लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सरकारने हट्टाने नागपूरला अधिवेशन घेण्याचे ठरवले खरे परंतु अधिवेशनात सरकरची पुरती नामुश्की झाली आहे. सततच्या वीज खंडित होण्याने सभागृहातील कामकाज तहकूब करण्याचे प्रसंग आज दिवस भरात सतत घडत होते. वास्तविक पाहता ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे असून देखील आज विजेची अशी झालेली वाताहत राज्याला शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. मुसळधार पावसामुळे विधान भवनाच्या पायऱ्यांना पाणी लागले असून आमदार निवासातही पाणी शिरले आहे.
सर्वोच्च न्यायालयात आज समलिंगी संबंधावर सुनावणी
दिल्ली : भारतीय दंड संहितेचे कलम ३७७ नुसार समलिंगी संबंध बेकायदेशीर असून त्यास शिक्षेची तरतूद आहे. समलिंगी असणे हे नैसर्गिक असल्याचे अनेक वैद्यकीय चाचण्यांच्या अंती स्पष्ट झाले आहे. हाच धागा पकडून हमसफर ट्रस्टच्या अशोकराव कवि आणि आरिफ जफर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालय सदरील याचिकांवर आज एकत्रित सुनावणी देणार असल्याचे समजत आहे. १० जुलैपासून पाच न्यायाधीशांच्या न्यायपीठा समोर ही सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या.रोहिंग्टन आर नरीमन, न्या. ए एम खानविलकर, न्या.डी.वाई चंद्रचूड, न्या. इंदू मल्होत्रा या न्यायाधीशांचा न्यायपीठात समावेश असणार आहे. सर्वोच्च न्यायालय समलिंगी संबंधावर काय सुनावणी देणार यांची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना १० वर्षाचा तुरुंगवास
दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम नवाज यांना न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. सत्तेत असताना पदाचा गैर वापर करून पैशाचा गैरव्यवहार केल्याचा आरोप शरीफ यांच्यावर आहे. नवाज यांना दहा वर्ष तर मरियम याना ७ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पनामा पेपर लीक घोटाळ्यात अडकलेल्या नवाज शरीफ यांना घोटाळ्यात हात गुंतल्यामुळे पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पाकिस्तानच्या न्यायालयात शरीफ यांच्यावर खटला चालू होता. आज दिलेल्या निकालात शरीफ यांच्यावरील गुन्हा सिद्ध झाल्याचे न्यायालयाने म्हणले आहे. शरीफ यांनी पनामा कंपनीतमधे मोठ्या प्रमाणावर काळा पैसा गुंतवला असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
उपराजधानीला पाण्याचा वेढा
नागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरला पाण्याने वेढा दिला आहे. मागील दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पूरजन्य परिस्थिती बनली आहे. धोधो बरसणाऱ्या पावसाने शहराच्या सकल भागात पाणी साठले असून वाहतूकव्यवस्था कोलमडली आहे. पावसाळी अधिवेशनास आलेल्या आमदारांना त्रासास सामोरे जावे लागत आहे. साठलेल्या पाण्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागपूर विमानतळ परिसरात ही मोठ्या प्रमाणत पाणी साठले आहे. विधान भवन परिसरात ही पाणीच पाणी साठल्याने अधिवेशनाला आलेल्या आमदारांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
मिथुन चक्रबोर्ती यांचा मुलगा महाक्षयवर भोजपुरी अभिनेत्रीचा बलात्काराचा आरोप, उच्च न्यायालयाने फेटाळला अटकपूर्व जामिन
मुंबई : मिथुन चक्रबोर्ती यांचा मुलगा महाक्षय आणि पत्नी योगीता बली यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. बलात्कार, फसवणूक आणि गर्भपात करण्यास जबरदस्ती केल्याच्या प्रकरणामधे उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपुर्व जामिन फेटाळला आहे. दिल्लीस्थित भोजपूरी अभिनेत्रीने या दोघांविरोधात पोलीसांत तक्रार दाखल केली होती. दिल्लीच्या न्यायालयाने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे अादेश पोलीस प्रशासनाला दिले होते. त्यासंदर्भात महाक्षय यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिन मिळण्यासाठी अर्ज केला होता. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने महाक्षय यांचा जामिन अर्ज फेटाळला आहे.
काय आहे प्रकरण?
दिल्लीस्थित भोजपूरी अभिनेत्रीने मिथुन चक्रबोर्ती यांचा मुलगा महाक्षय याच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. मागील चार वर्षांपासून ते दोघे रिलेशनशीपमधे असल्याचे तिने म्हणले आहे. दरम्यानच्या काळात महाक्षय याने तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे. शारिरीक संबंधामुळे प्रेग्नंट असताना जबरदस्तीने गर्भपात करायला लावल्याचा आरोपही त्या स्त्रीने केला आहे. याप्रकरणात मिथुन चक्रबोर्ती यांची पत्नी योगीता बली याही दोषी असल्याचं तक्रारीत नमुद केले आहे. दिल्ली पोलीसांकडे सदरिल तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर महाक्षय यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपुर्व जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु उच्च न्यायालयाने जामिन फेटाळल असल्याचे समोर आले आहे. येत्या ७ जुलै रोजी महाक्षय यांचा विवाहसोहळा असून आता याप्रकरणामुळे विवाहसोहळ्यास अडचण येण्याची शक्यता अाहे.
महादेव जानकरांनी भाजपची उमेदवारी डावलली
नागपूर : राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते व राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी भाजपचे उमेदवार होण्यास इन्कार केला आहे. भाजपाची उमेदवारी डावलून त्यांनी विधानपरिषदेची निवडणूक रासपाचे उमेदवार म्हणुन लढवण्याचे निश्चित केले आहे. जानकर रासपाच्या उमेदवारीवर ठाम राहील्याने भाजपाला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलै रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. आज उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. नारायन राणे, विनायक मेटे आदींपाठोपाठ जानकर यांनी भाजपची उमेदवारी घेऊन विधानपरिषदेवर जावे यासाठी मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस तसेच अन्य वरिष्ठ नेते प्रयत्न करत होते. परंतु सर्वांचे प्रयत्न हाणून पाडत महादेव जानकर यांनी स्वत:च्या राष्ट्रीय समाज पक्षाची उमेदवारी घेऊनच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाच्या पृथ्वीराज देशमुख यांनी अतिरिक्त उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांनी अर्ज मागे घेतल्यास सर्व ११ सदस्यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे.
राज्य क्रिकेट बोर्डाच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगीती
दिल्ली : बीसीसीआयच्या अंतरिम संविधानावर सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य क्रिकेट बोर्डाच्या निवडणुका रोखून धरत त्यावर स्थगिती आणत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले आहे. बीसीसीआयचे प्रशासन शिस्तबद्ध करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा विचार असून राज्य क्रिकेट बोर्डाच्या निवडणूकांचा निकाल राखून ठेवल्याचे न्यायालयाने निकालादरम्यान सुनावले आहे.
पाऊले चालती पंढरीची वाट..
देहू : जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज पंढरीकडे प्रस्थान झाले आहे. लाखो वारकऱ्यांच्या साक्षीने टाळमृदुगाच्या गजरात पंढरीकडे प्रस्थान ठेवले आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला साडे तीनशे वर्षाची परंपरा असून संत तुकाराम महाराजांचे कनिष्ठ पुत्र श्री नारायण महाराज हे या पालखी सोहळ्याचे उद्गाते आहेत. संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा आजचा पहिला मुक्काम आहे. हा मुक्काम इनामदार वाड्यात असणार आहे. परंपरागत पहिला मुक्काम झाल्यानंतर पालखी उद्या आकुर्डी येथे मुक्कामासाठी प्रस्थान करणार आहे. दरम्यान वैष्णवांचा मांदियाळी संतांच्या पालख्या सोबत पंढरपूरकडे वारीत सहभागी होण्यासाठी ऐकवटतली आहे.










