नवी दिल्ली । १९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आणि कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार हनीफ टायगरला भारताकडे सोपवण्यास ब्रिटनने नकार दिला आहे. ब्रिटनच्या या निर्णयानंतर भारत पुन्हा एकदा प्रत्यार्पण अर्ज करू शकतो. मुंबईतील बॉम्बस्फोट, दहशतवादी कारवायांचा कट रचणे आदीसह इतर प्रकरणांमध्ये हनीफ टायगर आरोपी असून भारताला तो हवा आहे. हनीफ टायगरला हनीफ मोम्मद उमेरजी पटेल या नावाने ओळखले जाते.
भारतीय गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीच्या आधारे हनीफला २०१० मध्ये ब्रिटनमध्ये स्थानिक पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर भारतीय अधिकाऱ्यांनी प्रत्यार्पण वॉरंटही मिळवले. मात्र, हनीफने त्याविरोधात कोर्टात धाव घेतली. मात्र, हनीफची याचिका कोर्टाने २०१३ मध्ये फेटाळली. त्यानंतर हे प्रकरण ब्रिटनच्या गृहसचिवांकडे गेले. अनेक वर्ष सुनावणी झाल्यानंतर २०१९ मध्ये हनीफच्या प्रत्यापर्णला ब्रिटनने नकार दिला.
दरम्यान, भारत सरकार पुन्हा एकदा ब्रिटन सरकारकडे हनीफ टायगरच्या प्रत्यार्पणाची मागणी करू शकतो. मात्र, हनीफ पुन्हा स्थानिक कोर्टात जामीन अर्ज दाखल करू शकतो. हनीफला भारताला सोपवण्याच्या प्रस्तावाला ब्रिटनमधील पाकिस्तानी वंशाचे नेते साजिद जावेद यांनी आडकाठी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”