नवी दिल्ली वृत्तसंस्था: पाकिस्तानच्या ताब्यात असणाऱ्या कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात आता मोठा निर्णय पाकिस्तानने घेतल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना पाकिस्तान द्वारे दिल्या गेलेल्या शिक्षेविरोधात कोणत्याही उच्च न्यायालयात अपील करण्याची परवानगी दिली आहे. पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय बहुमताने मान्य केला आहे. पाकिस्तानी माध्यमांच्या हवाल्याने एएनआयनं याबाबतचे वृत्त दिले आहे.
मे महिन्याच्या सुरुवातीच्या काळात कुलभूषण जाधव यांना फाशीच्या शिक्षेची सुनावणी करत पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने भारताला या प्रकरणात कायदेशीर कारवाईत सहकार्य करायला सांगितलं होतं. त्याच वेळी असं सांगण्यात आलं होतं की न्यायालयात हजर होणे म्हणजे सार्वभौमत्वातील सूट नाही. इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या तीन सदस्यांच्या खंडपीठाने बुधवारी पाकिस्तानच्या कायदा व न्याय मंत्रालयाच्या याचिकेवर सुनावणी सुरू केली. यात जाधव यांच्यासाठी वकील नेमण्याची मागणी करण्यात आली आहे.
कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलातून निवृत्त झाले. इराणमध्ये ते व्यवसायाच्या निमित्ताने गेले होते. त्यांना पाकिस्तानने हेरगिरीसाठी देशात प्रवेश केल्याप्रकरणी अटक केली होती. मात्र कुलभूषण यांनी पाकिस्तानच्या लष्करी कोर्टात असं सांगितलं की त्यांना इराणमधून अपहरण करून पाकिस्तान मध्ये आणले आणि खोट्या आरोपात अटक केली. पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने कुलभूषण जाधव यांचा आरोप फेटाळला आणि त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली. लष्करी कोर्टाच्या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी कुलभूषण जाधव यांच्या वतीने भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. हे प्रकरण २०१७ सालापासून सुरू आहे.