गांधीनगर । सीमेनंतर आता पाकिस्तानने भारताविरोधात समुद्र किनारी भागात कारवाई केली आहे. रविवारी पाकिस्तानी नौसैनिकांनी एका भारतीय बोटीसह 6 भारतीय मच्छिमारांचे अपहरण केले. यादरम्यान पाकिस्तानकडूनही अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याची माहिती मच्छिमारांनी दिली आहे. यामध्ये एका मच्छिमाराचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. ही घटना IMBL जवळ घडल्याचे सांगण्यात येत आहे.
पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एका मच्छिमाराचा मृत्यू झाला असून या गोळीबारात अनेक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. टीव्ही रिपोर्ट्सनुसार, जखमींना उपचारासाठी द्वारका येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.पाकिस्तानने सीमा भागात असे कृत्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. सागरी सीमेवरही पाकिस्तान अशा कारवाया करत असतो. गेल्या वर्षी एप्रिलमध्येही पाकिस्तानी नौसैनिकांनी गुजरातच्या सागरी भागात सागरी सीमेजवळ दोन बोटींवर गोळीबार केला होता. त्यावेळीही बोटीत 8 जण होते. त्यानंतर या गोळीबारात उत्तर प्रदेशातील एक व्यक्ती जखमी झाला. तेव्हाही या दोन्ही बोटी द्वारकेतील समुद्र परिसरातच होत्या. मात्र, द्वारकाचे SP म्हणाले की,” या बोटींनी सागरी हद्द ओलांडली असावी, त्यानंतर पाकिस्तानी मरीनने त्यांच्यावर गोळीबार केला असेल.”
या संदर्भात मच्छिमारांनी त्यांच्या रेडिओ संचावरून भारतीय तटरक्षक दलाला संपूर्ण माहितीही दिली होती. यानंतर भारताने हे प्रकरण पाकिस्तानी समकक्षांसमोर मांडले. नंतर पाकिस्तानच्या मरीनने दोन बोटी ताब्यात घेतल्याची पुष्टी केली. यानंतर चर्चेनंतर त्यांना भारतात परत आणण्यात आले.