इस्लामाबाद | दक्षिण आशियातील देशांनी स्थापन केलेल्या सार्क परिषदेच्या कार्यक्रमाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केले जाईल, असे वक्तव्य पाकच्या विदेश विभागाचे प्रवक्ते मोहम्मद फैझल यांनी केले आहे. इस्लामाबाद येथे पत्रकारांशी बोलताना सदर माहिती दिली आहे.
सार्क परिषदेचे आयोजन दर दोन वर्षांनी केले जाते. यंदा ही परिषद डिसेंबरच्या अखेरच्या सप्ताहात होण्याची शक्यता आहे. भारताने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादाला खतपाणी घालण्याचे आपले धोरण सोडत नाही, तोपर्यंत त्या देशाशी कोणत्याही पातळीवर चर्चा न करण्याचा निर्धार भारताने केला आहे.
यापूर्वी 2016 मध्ये पाकमध्ये सार्क परिषद आयोजन करण्यात आले होते. मात्र उरी येथील सेनातळावर पाकच्या दहशतवाद्यांनी हल्ला केल्याने भारताने या परिषदेवर बहिष्कार टाकला होता. त्याचप्रमाणे भूतान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांनीही परिषदेचे आमंत्रण नाकारले होते. त्यामुळे ती रद्द करण्यात आली होती.