हॅलो महाराष्ट ऑनलाईन Palana Yojana । राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने मागच्या वर्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. परंतु सरकारने या योजनेतून नोकरदार महिला, इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिला आणि इतर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना वगळायला सुरुवात केली आहे. त्यामुळे बहुतांश महिलांचा हिरमोड होत आहे. आता राज्य सरकार नोकरदार महिलांसाठी नवीन योजना आणणार आहे. पाळणा योजना असं या योजनेचे नाव असून या योजनेच्या माध्यमातून नोकरदार मातांच्या मुलांच्या संगोपनाची जबाबदारी आता सरकार उचलणार आहे. महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबविली जाणार आहे. हि योजना नेमकं कसं काम करेल? याबाबत सविस्तर जाणून घेऊया.
पाळणा योजनेच्या (Palana Yojana) माध्यमातून पहिल्या टप्प्यात राज्यात 345 पाळणा केंद्रे सुरू होणार आहेत. यासाठी मिशन शक्ती अंतर्गत केंद्र व राज्य शासन अनुक्रमे 60:40 या हिश्शाने निधी उपलब्ध करून देणार आहे. राज्य सरकारच्या 13 ऑक्टोबर 2024 रोजीच्या निर्णयानुसार या योजनेची अंमलबजावणी होणार आहे. या योजनेमुळे कामगार व नोकरदार महिलांना मोठा दिलासा मिळणार असून मुलांच्या संगोपनासाठी सुरक्षित व दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे.
कशी असेल कार्यपद्धती : Palana Yojana
पाळणा योजनेअंतर्गत महिन्यातील 26 दिवस व दररोज 7.5 तास पाळणा सुरु राहील.
एका पाळण्यात जास्तीत जास्त 25 मुलांची व्यवस्था करण्यात येईल.
कमीत कमी बारावी उत्तीर्ण प्रशिक्षित सेविका आणि कमीत कमी दहावी उत्तीर्ण मदतनीस ची नेमणूक करण्यात येईल.
यासाठी सदर उमेदवारांचे वय 20 ते 45 वर्षे दरम्यान असावं…. महत्वाची बाब म्हणजे स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
जिल्हास्तरीय समितीमार्फत पारदर्शक निवड प्रक्रिया असेल. Palana Yojana
वैशिष्टये –
नोकरी करणाऱ्या मातांच्या 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील मुलांसाठी देखभाल सुविधा व डे केअर सुविधा
3 वर्षांखालील मुलांसाठी पूर्व उद्दीपन (Stimulation) तर 3 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी पूर्व शालेय शिक्षण.
मुलांसाठी सकस आहार – सकाळचा नाश्ता, दुपारचे गरम जेवण आणि संध्याकाळचा पौष्टिक नाश्ता (दूध/अंडी/केळी).
मुलांना पूरक पोषण आहार देण्यात येईल. आरोग्य तपासणी, लसीकरण, वाढीचे नियमित निरीक्षण होईल.
वीज, पाणी, बालस्नेही शौचालय आदी सर्व मूलभूत सोयीसुविधांसह मुलांसाठी सुरक्षित वातावरण तयार केलं जाईल.




